शुभा प्रभू साटम
सूप म्हटलं की ते हिवाळ्यात गरमागरम असेच पिण्याचे असते असा समज आहे,पण काही सूप आहेत ती गारच प्यायची असतात, उन्हाळ्यात खाण्याची इच्छा नसते ,नुसते सरबत तरी किती पिणार? ताक सारखं नको, लस्सी म्हटली की साखर आली, मग वजनाचे आकडे दिसतात. थोड्याफार फरकाने असे सगळ्यांचे होते, काहीतरी चटकदार चमचमीत खायचे आहे पण नक्की काय ते समजत नाही,आणि खरं तर उकड्यात किचनमध्ये जाणे हे पण दिव्य ठरते. त्यात आता जे कोरोना रुग्ण किंवा त्यातून बरे झाले आहेत त्यांनी सूप प्यावे असेही तज्ज्ञ सांगतात. मात्र उन्हाळ्यात गरम सूप कसं पिणार? त्यावर उत्तर हे खास सूप. जे थंडगार असतं.आज आपण जो प्रकार बघणार आहोत तो स्पेन मधील पदार्थ आहे,तेथील पारंपरिक सूप,जे थंडगार असते आणि मस्त मसालेदार पण, मुख्य म्हणजे करायला अगदी सोपे, गझपाचो सूप,हे सूप अन्य सूप असतात तसे घोटलेले अथवा एकसंध नसून त्यात भाज्यांचे तुकडे असतात,म्हणजे चावून पिण्याचा अथवा पिऊन चावण्याचा प्रकार.
मस्त थंडगार गझपाचो
साहित्यमोठाले लालबुंद टोमॅटो 5 ते 6कांदा 1 मोठा(यात लाल कांदा असतो आपण आपला नेहमीचा वापरू)शिमला मिरची कोणतीही रंगाची,लाल मिळाली तर उत्तम.4 टोमॅटोचा रस (नसेल तर चक्क केचप वापरा.) अर्धी वाटी तिखट हवं तर हिरवी मिरचीव्हिनेगरमीठ मिरपूड साखरऑलिव्ह तेल अथवा आपलं नेहमीचपारंपरिक पद्धतीत काहीवेळा ठराविक मद्य वापरतात जी आपण टाळणार आहोत. त्याचप्रमाणे भिजवलेला ब्रेड पण असतो ,तो आवडीप्रमाणे ठरवावा,दाट पणासाठी तो घालतात.हे सूप उकळवायचे नाहीये मात्र.
कृती
टोमॅटो. कांदा. शिमला. लसूण, मिरच्या सर्व जाड कापून घ्या.हे सर्व साहित्य प्रोसेसर मध्ये घालून त्यात तेल घालून दोनदा फिरवून घ्या, लक्षात असूद्या की हे वाटायचं नाहीये,तर त्यानंतर केचप /रस,व्हिनेगर ,साखर मीठ सर्व घालून फक्त एकदा फिरवा. शेवटाला भिजवलेला ब्रेड घालून एक फेरा घ्या.भाज्या टोमॅटो यांचे तुकडे असले पाहिजेत. आता हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून गार करा,आणि नंतर गार्लिक टोस्ट सोबत द्या,अत्यन्त चवदार लागतं. यात तुम्ही पुढील गोष्टी आवडीप्रमाणे घालू शकता.उकडलेला राजमा,मका.
एका अर्थी हे जेवणच ठरते. सोबत काही फळं असली की मस्त मेनू. एखाद्या दिवशी हा गझपाचो नक्की करून पाहा.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)