ड्रॅगन फ्रुट हे एक विदेशी फळ. पुर्वी हे फळ केवळ अमेरिकेतच उत्पादित व्हायचे. पण आता मात्र भारतात आणि महाराष्ट्रातही काही प्रांतात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जाते. या फळाचे आरोग्याला होणारे लाभ प्रचंड आहेत. त्यामुळेच या फळाला सुपर फुड म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी या फळाला पिताया असेही म्हणतात. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम अशी खनिजे या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय ॲण्टीऑक्सिडंट्सही खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हे फळ निश्चितच सुपरफुड आहे.
सध्या या फळाबाबत असे सांगितले जाते की, डेंग्यू झाल्यावर हे फळ खाणे खूप फायदेशीर ठरते. डेंग्यू झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे प्लेटलेट्स वाढतात, असे सल्ले हल्ली बऱ्याच प्रमाणात ऐकू येत आहेत. पण तज्ज्ञ सांगतात की, ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढते, पण त्यामुळे प्लेटलेट्स खरोखरच वाढतात की नाही, हा अजूनही एक संशोधनाचा विषय आहे.
ड्रॅगन फ्रुट खाण्याचा मोठा फायदा
ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे फळ अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे हे फळ नियमितपणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येणे, शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे डेंग्यू झाल्यावरही खरोखरच प्लेटलेट्स वाढण्यासाठी ड्रॅगन फ्रुट खाणे उपयुक्त ठरते की नाही, हे माहित नसले तरी अशक्तपणा कमी होण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ड्रॅगन फ्रुट अवश्य खावे.
ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे
१. ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणावर Lycopene असते. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
२. ड्रॅगन फ्रुटमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे पचनाच्या समस्या सोडविण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरते.
३. उत्तम वेटलॉस डाएट म्हणून ड्रॅगन फ्रुट ओळखले जाते.
४. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, साखरमध्ये होणारा चढ- उतार नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील ड्रॅगन फ्रुट उपयुक्त ठरते.
५. सौंदर्य वाढविणे, त्वचेवरील सुरकुत्या कमी करणे, यासाठी देखील ड्रॅगन फ्रुट मदत करते.
६. या फळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना किंवा गर्भवती महिलांनाही ड्रॅगन फ्रुट नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.