कोविड काळात रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढविण्यासाठी अनेक जणांची गुळवेलीचा वापर केला होता. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात गुळवेलीची मागणी खूप जास्त वाढली होती. त्यानंतर गुळवेल खाणं आरोग्यासाठी आपण म्हणतो तेवढं सुरक्षित नाही, अशीही चर्चा सुरू झाली होती. म्हणूनच तर आयुष मंत्रालयाने गुळवेल खाणं चांगलं की आरोग्यासाठी धोकादायक हे सांगून या विषयाला आता पुर्णविराम दिला आहे. त्यामुळे तुमच्याही मनात गुळवेलीबाबत काही संभ्रम असेल तर आयुष मंत्रालयाचा हा सल्ला नक्की वाचा.
गुळवेल यकृतावर वाईट परिणाम करते हा दावा आयुष मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. याविषयीचा कोणातही ठोस पुरावा उपलब्ध नाही. याउलट गुळवेलसंबंधी जो काही अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार तरी गुळवेलीचा यकृतावर कोणताही विषारी परिणाम होत नाही, हे सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा वापर आयुर्वेदात आणि पारंपरिक वैद्यक शास्त्रात मोठ्या प्रमाणावर केला जायचा. एवढेच नाही तर COVID-19 काळातही गुळवेलीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. त्यामुळे गुळवेलसारखी औषधी वनस्पती विषारी असू शकत नाही, असं आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. फक्त त्याचं सेवन किती प्रमाणात करावं, याचा सल्ला एकदा तज्ज्ञांकडून अवश्य घ्यावा.
गुळवेल खाण्याचे फायदे (benefits of giloy or gulvel)
- गुळवेल ही आरोग्यासाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे गुळवेलीला अमृत वेल म्हणूनही ओळखले जाते.
- गुळवेलचा उपयोग करून वात, पित्त आणि कफ दोषांवर उपचार केले जातात.
- मुख्यत: या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत.
- अशक्तपणा, कावीळ, पोटात जंत होणे, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मुळव्याध, संधिवात अशा आजारांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतलेले गुळवेलीचे औषध प्रभावी ठरते.
- गुळवेलीतील पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांनाही गुळवेल घेण्याचा सल्ला दिला जातो.
- दम्याचा त्रास किंवा श्वसनासंबंधीचे विकार दुर करण्यासाठी गुळवेल घ्यावी, परंतू यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- तज्ज्ञांच्या मते गुळवेलीत असणारे इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्म डोळ्यांच्या विविध आजारांवर प्रभावी ठरतात.