Join us  

गुलाबजल चेहऱ्याला लावता, पण घरी बनवलेलं गुलाबजल पिऊन पाहिले आहे? गुलाबजल पिण्याचे 4 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 3:09 PM

गुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटकांचा लाभ आरोग्यास मिळण्यासाठी गुलाबजल पिणं फायद्याचं. घरी तयार केलेलं गुलाबजल प्याल्याने होतात 4 फायदे

ठळक मुद्देगुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटकांचा लाभ आरोग्यास मिळण्यासाठी गुलाबजल पिणं महत्त्वाचं.घरच्याघरी गुलाबजल तयार करुन ते प्याल्यास  शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.जिवाणुसंसर्गाशी लढण्याची क्षमता गुलाबजलात असते.

सौंदर्य वाढवण्यासाठी घरच्या घरी केल्या जाणाऱ्या उपायात गुलाब पाण्याचा उपयोग केला जातो. गुलाबपाणी चेहऱ्यास लावल्यानं त्वचा स्वच्छ होण्यासोबतच मऊ मुलायम होते. गुलाबाच्या फुलात असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचा निरोगी राखण्यासोबतच आरोग्य चांगले राखण्यासही गुलाबाचा उपयोग होतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये दाह आणि सूज विरोधी, बुरशी विरोधी, हानिकारक सूक्ष्म जिवाणूविरोधी घटक असतात. तसेच त्यात क जीवनसत्वही भरपूर प्रमाणात असतं. हे घटक आरोग्य निरोगी राखण्यासाठी महत्वाचे ठरतात.

Image: Google

गुलाबपाण्याचा उपयोग चेहऱ्यावर लावण्यासाठी करतात हे आपणास माहित आहे. पण गुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटकांचा लाभ आरोग्यास  मिळण्यासाठी गुलाब पाणी प्याल्यास ते फायदेशीर ठरतं. घरच्याघरी गुलाब पाणी तयार करुन ते प्याल्यास ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Image : Google

घरच्याघरी गुलाबपाणी कसं तयार करावं?

गुलाबपाणी तयार करण्यासाठी 8-10 ताजी गुलाबाची फुलं घ्यावीत. गुलाबाच्या  पाकळ्या वेगळ्या करुन त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. मोठ्या पातेल्यात पाणी घ्याव्ं. ते चांगलं उकळावं. पाणी उकळल्यानंतर धुतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या गरम पाण्यात घालाव्यात. पातेल्यावर झाकण ठेवावं. गॅसची आच मंद करुन पाणी 15-20 मिनिटं गॅसवर ठेवावं.  पाण्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करावा. पाणी थंडं होवू द्यावं. थंडं झाल्यावर हे पाणी गाळून प्यावं.

Image: Google

गुलाबजल पिण्याचे फायदे

1. गुलाबाच्या पाकळ्यातील पोषक घटकांमुळे पचनव्यवस्था मजबूत होते. गुलाबपाण्यापासून तयार केलेला हर्बल टी प्याल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. पचन व्यवस्थित होतं. 

2. घशात जळजळणं, घसा खाजणं या घशाच्या तक्रारी जिवाणु संसर्गामुळे होतात. हा संसर्ग घालवण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग होतो. गुलाबपाण्यात जिवाणूविरोधीगुणधर्म असल्यानं घसा व्यवस्थित होतो. 

Image: Google

3. मानसिक ताणतणाव जास्त असल्यास गुलाबपाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गुलाबपाण्यात फेनोलिक्स नावाचा घटक असतो. हा घटक औदासिन्य ( डिप्रेशन) आजारात निर्माण होणारा ताण तणाव दूर करतो. म्हणूनच मानसिक ताणतणाव असलेल्यांनी गुलाबजल प्याल्यास ताण दूर होतो. 

4. गुलाबजल प्याल्याने पित्ताशय आणि यकृत स्वच्छ होतं. पित्त  स्त्राव चांगला स्त्रवतो .श्वसननलिकेशी संबंधित संसर्ग बरा करण्याची क्षमता गुलाबजलात असते. गुलाबपाण्याचा हर्बल  चहा प्याल्याने श्वसननलिका सुदृढ होते. 

टॅग्स :आरोग्यआहार योजना