कडुनिंब आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आयुर्वेदानुसार कडुनिंबाच्या झाडाचा प्रत्येक भाग्य आरोग्यासाठी, सौंदर्यासाठी उपयुक्त आहे. कडुनिंबाच्या झाडाची साल, पानं यासोबतच कडुनिंबाची फुलं देखील आरोग्यास फायदेशीर आहे. आपल्या आहारातून कडुनिंबाची फुलं पोटात गेल्यास ती उपचारासारखी अनेक समस्यांवर काम करतात. कडुनिंबाच्या फुलांमुळे वजन कमी होतं. चरबी वेगानं घटते. चयापचय क्रिया वाढून वजन घटण्यास मदत होते. नैसर्गिक पध्दतीनं वजन कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या फुलांचा उपयोग होतो.
Image: Google
कडुनिंबाच्या फुलातील गुणधर्मांमुळे शरीरातील पित्त दोष कमी होतो. कफाचं प्रमाण कमी होतं. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कडुनिंबाच्या फुलांमुळे आतड्यांची शुध्दी होते. केसांचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारत. त्वचेतील विषारी घटक बाहेर पडून त्वचा स्वच्छ होते. कडुनिंबाच्या फुलांचं सेवन केल्यानं पोटातील जंत मरतात.
कडुनिंबाची फुलं सेवन करण्याची एक रुचकर पध्दत प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली आहे. त्यांनी कडुनिंबाच्या फुलांचं पारंपरिक पध्दतीचं सरबत कसं करावं, त्याचे फायदे काय हे सांगणारा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ऋजुता दिवेकर सांगतात की आरोग्य सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण नवनवीन उपाय शोधत असतो. पण या धडपडीत आपल्या पूर्वजांनी शोधलेले पारंपरिक उपाय मात्र विस्मृतीत जातात. असाच एक विस्मृतीत गेलेला पदार्थ म्हणजे कडुनिंबाच्या फुलांचं चविष्ट आणि पौष्टिक सरबत.
Image: Google
चैत्राच्या महिन्यात कडुनिंबाच्या झाडाला पांढऱ्या बारीक फुलांचा बहर येतो. दिसायला अतिशय नाजूक आणि रेखीव दिसणारी ही फुलं सेवन करणं अतिशय फायदेशीर असतं. कडुनिंबाच्या फुलांचा हा बहर केवळ चैत्रात असतो. या काळात किमान 3-4 वेळा कडुनिंबाच्या फुलांचं हे सरबत प्यायला हवं. कडुनिंबाच्या फुलांचं सरबत कसं करावं याची रेसिपीही ऋजुता दिवेकर यांनी सांगितली आहे.
Image: Google
कडुनिंबाच्या फुलांचं सरबत
कडुनिंबाच्या फुलांचं सरबत करण्यासाठी 2 ग्लास पाणी, गुळाचा मोठा खडा, अर्धी कैरी, थोडं किसलेलं आलं, चिमूटभर मीठ, 2-3 मिरे आणि 1 छोटा चमचा कडुनिंबाची फुलं घ्यावी. सरबत करताना कडुनिंबाची फुलं निवडून बाजूला ठेवावी. पाण्यात गुळाचा खडा घालून तो विरघळून घ्यावा. मिरे वाटून त्याची पूड करुन घ्यावी. कैरीच्या बारीक फोडी कराव्यात.
पाण्यात गुळ विरघळला की पाणी ग्लासात घ्यावं. या पाण्यात कडुनिंबाची फुलं, किसलेलं आलं आणि कैरीच्या फोडी घालाव्यात. मिऱ्याची पूड आणि मीठ घालून सरबत चांगलं हलवून घ्यावं. शीत गुणधर्माचं हे सरबत पिऊन तोंडाला स्वाद येतो आणि उन्हाच्या काहिलीत जीवाला शांतता मिळते. कडुनिंबाचं सरबत हे भारतात हैद्राबाद येथे प्रामुख्यानं केलं जातं. चैत्राचा महिना संपायला अजून काही दिवस आहे. तोपर्यंत चविष्ट आणि पौष्टिक कडुनिंबाच्या फुलांच्या सरबताचा आस्वाद अवश्य घ्या.