चहा खूप प्यायल्याने शांत झोप लागत नाही, असं आपण नेहमीच ऐकतो. चहामध्ये असणारे काही घटक शरीरात उर्जा निर्माण करतात. त्यामुळे एन्झायटी (anxiety) वाढते. त्यामुळे रात्री तर शक्यतो चहा पिणे टाळलेच पाहिजे, असं आपण नेहमीच ऐकतो. पण स्लीप टी (sleep tea) नावाचा चहाचा एक प्रकार सध्या चांगलाच गाजतो आहे. हा चहा चक्क झोपेचा चहा म्हणून ओळखला जातो. जर तुम्हाला शांत झोप येत नसेल, रात्री वारंवार झोपमोड होत असेल किंवा रात्री लवकर झोप लागत नसेल, तर हा स्लीप टी (What is Chamomile Tea and its benefits?) पिणे फायदेशीर ठरते. म्हणूनच तर बघू या की स्लीप टी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
स्लीप टी म्हणजे काय?
स्लीप टी म्हणजे कॅमोमाईल या फुलाचा चहा Chamomile. कॅमोमाईल हर्बल टी म्हणून हा चहा ओळखला जातो. स्पॅनिश मँझानिला टी म्हणूनही हा चहा ओळखला जातो. हिंदी भाषेत त्याला कैमोमाइल असं म्हणतात. ही फुलं प्रामुख्याने जर्मनी आणि रोममध्ये सापडतात. या फुलांमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे हा चहा अतिशय आरोग्यदायी मानला जातो. या चहामध्ये नैसर्गिक स्वरुपातलं कॅफेन असतं, असंही सांगितलं जातं. तसेच कार्बाेहायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, फॉलिक ॲसिड तसेच व्हिटॅमिन ए देखील या चहामध्ये मोठ्या प्रमाणात असते.
या चहाला स्लीप टी का म्हणतात?
१. कॅमोमाईल फुलांमध्ये असणारे काही घटक अनिद्रेचा त्रास दूर करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या चहाला स्लीप टी म्हणून ओळखले जाते.
२. या चहामध्ये ॲपिजेनिन हा घटक असतो. तो शरीर आणि मन रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
३. स्नायूंना आलेला थकवा घालविण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो.
४. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी हा चहा घेतला तर शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होण्यासाठी मदत होते, शांत झोप लागते. त्यामुळे स्लीप टी म्हणून हा चहा ओळखला जातो.