घरी किंवा ऑफिसमध्ये आपण कुठेही असलो तरी नाश्ता केल्यानंतर चहा पितो. नाश्ता केल्यानंतर चहा पिणं हे इतकं कॉमन आहे, की अनेक जणांना नाश्ता केल्यावर चहा घेतला नाही, तर नाश्ता पुर्ण झाला आहे असं वाटत नाही. पण असं करणं आरोग्यासाठी खूपच घातक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार जेव्हा दोन विरूद्ध प्रकारचे अन्न आपण एकानंतर एक खातो, तेव्हा ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. असे केल्याने या दोन्ही अन्नांचे लाभ आपल्याला होत तर नाहीतच पण त्याचा विपरित परिणाम मात्र काही काळाने जाणवायला लागतो.
नाश्ता नंतर चहा घेतला तर...
नाश्ता हे सकाळचे आपले पहिले अन्न असते. जवळपास ८ ते १० तासांच्या मोठ्या गॅपनंतर आपण अन्न घेत असतो. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला योग्य पोषण मिळण्याची मोठी गरज असते. हे पोषण नाश्त्यातून मिळते. म्हणूनच नाश्ता हा नेहमी सकस, पौष्टिक असावा, असे सांगितले जाते. तसेच नाश्ता भरपेट करणंही गरजेचं असतं. जेव्हा आपण नाश्ता करतो तेव्हा ८ ते १० तासानंतर ॲक्टिव्ह झालेली आपली पचनसंस्था मोठ्या प्रयत्नाने नाश्ता पचविण्याचे काम करते. पण शरीरात ही प्रक्रिया सुरू असतानाच जर आपण चहा घेतला तर मात्र पचन संस्थेला मोठा अडथळा निर्माण होतो.
चहामध्ये असणारे फेनोलिक पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही. पचन चांगले झाले नाही, तर आपण जे खाल्ले आहे त्या पदार्थातील पोषकमुल्ये रक्तपेशींमध्ये मिसळत नाहीत आणि त्याचा लाभ शरीराला मिळत नाही. त्यामुळे नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय घातकच आहे.
हे देखील लक्षात घ्या...
पोहे, इडली, डोसे, भजी्, वडापाव, ब्रेड असे पदार्थ खाल्ल्याने अनेक जणांना ॲसिडिटी वाढण्याचा त्रास होतो. त्यामुळे अशा व्यक्तींना असे पदार्थ खाल्ल्यावर चहा घेणे अतिशय त्रासदायक ठरू शकते. यामुळे पचन तर व्यवस्थित होत नाहीच पण त्यासोबतच ॲसिडीटी, डोकेदुखी, मायग्रेन असा त्रासही जाणवू शकतो किंवा भविष्यात असे त्रास उग्र रूप धारण करू शकतात.
चहा घ्यायचाच असेल तर..
नाश्ता केल्यानंतर चहा घेण्याची खूपच इच्छा असेल तर आपण नेहमी करतो तसा दूध आणि पाणी टाकून चहा करू नये. अशा चहाऐवजी तुम्ही डिकॉशन टी, ग्रीन टी, हर्बल टी असे पर्याय निवडू शकता. अद्रक किसून जर कोरा चहा म्हणजेच दूध न टाकलेला चहा घेतला तर अद्रकातून आपल्याला ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पचनासाठी उपयुक्त असणारे घटक मिळतात. त्यामुळे नाश्ता केल्यानंतर जर चहा प्यायचाच असेल, तर चहाचे असे पर्याय निवडावेत.