Join us  

उपवासाच्या दिवशी सारखी भूक लागतेय? पौष्टिक रताळे खा, उपवासाच्या दिवशीचे 'बेस्ट डाएट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 1:01 PM

उपवासाच्या दिवशी पोट भरतच नाही. वारंवार भूक लागल्यासारखी वाटते ना? मग अशावेळी पौष्टिक रताळे खाण्यावर भर द्या. रताळ्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक गुणधर्मांमुळे ते उपवासाच्या दिवशीचे एक बेस्ट डाएट आहे. 

ठळक मुद्देरताळे वजन वाढविण्यासाठी नाही, तर वजन कमी करण्यासाठी मदत करतात. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीही रताळे फायदेशीर ठरतात. 

रताळ्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. असे असले तरी बहुतांश लोक केवळ आषाढी एकादशीच्या दिवशीच रताळे खाताना दिसतात. उपवासाच्या दिवशी रताळे हा एक उत्तम आहार असून एरवीही उपवास नसतानाही रताळे खावेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात. रताळे पचनास अत्यंत हलके असतात. रताळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात आणि नैसर्गिक साखरही उपलब्ध असते. त्यामुळे अधिक काळ एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी रताळ्याचा खूप उपयोग होतो. एकदा पोटभर रताळे खाल्ले की लवकर भुकदेखील लागत नाही. 

photo- google

रताळ्याचे फायदे१. रताळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे ज्यांना उपवासाच्या दिवशी वारंवार भूक लागते किंवा उपवासामुळे अशक्तपणा जाणवतो, अशा लोकांनी उपवासाला आवर्जून रताळी खावीत.

२. रताळ्यामुळे वजन वाढते, असा एक गैरसमज आहे. रताळे वजन वाढविण्यासाठी नाही, तर वजन कमी करण्यासाठी मदत करतात. रताळे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी दुप्पट खाणे टाळायचे असेल, तर नाश्त्याला रताळे अवश्य खा.

३. रताळ्यामध्ये खूप जास्त फायबर्स असतात. त्यामुळे पचनासंबंधीचे त्रास किंवा बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर असते.

 

४. रताळ्यामधे बीटा कॅरेटीन तसेच व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी, दृष्टीदोष कमी करण्यासाठी मोठ्या माणसांनी तर रताळी खायलाच हवीत आणि लहान मुलांनाही आवर्जून द्यायला हवी. 

५. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी रताळे उपयुक्त ठरतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळे खावेत.

६. रताळ्यांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. शरीरात पाण्याची मात्रा संतुलित प्रमाणात ठेवून शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त आहे. 

 

७. रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात. त्यामुळे ॲण्टीएजिंग फॅक्टर म्हणून रताळे खाणे उपयुक्त आहे. रताळ्यांमध्ये असणारे बीटा कॅरेटिन केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. 

८. रताळ्यांमध्ये फॉलिक ॲसिड असते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी रताळे अतिशय गुणकारी आहेत.

 

९. रताळ्यांमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, लोह, प्रोटिन्स यांचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी रताळे खाण्यास प्राधान्य द्यावे. 

१०. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीही रताळे फायदेशीर ठरतात.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यपौष्टिक आहार