Join us  

थंडीच्या दिवसांत आवर्जून खायला हवी ही १ सिझनल भाजी; तज्ज्ञ सांगतात ३ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 12:22 PM

Health Benefits of Radish In Winter Season : या भाजीमुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि तब्येत चांगली राहण्यासही फायदा होतो.

ठळक मुद्देअनेकांना गॅसेस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी भेडसावतात. थंडीच्या दिवसांत तब्येत चांगली ठेवायची तर १ भाजी आवर्जून खायला हवी असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात.

थंडीचा काळ म्हणजे तब्येत कमावण्याचा आणि आरोग्य उत्तम ठेवण्याचा काळ. या काळात वर्षभरासाठी ऊर्जा जमा करायची असल्याने आपण भरपूर व्यायाम करायला हवा आणि चांगले खायला हवे असे आपण ऐकतो. पण थंडीच्या काळात आहारात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा याबाबत आपल्याला योग्य ती माहिती असायला हवी. थंडीच्या दिवसांत बाजारात फळं, भाज्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीच्या उपलब्ध असतात. त्यामुळे या काळात पालेभाज्या, सॅलेड, फळभाज्या, कंदमुळे, सर्व प्रकारची फळे या गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा (Health Benefits of Radish In Winter Season). 

(Image : Google)

थंडीच्या दिवसांत तब्येत चांगली ठेवायची तर १ भाजी आवर्जून खायला हवी असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्या सतत काही ना काही उपयुक्त गोष्टी शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या भाजीमुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि तब्येत चांगली राहण्यासही फायदा होतो. आता ही भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल, तर तो म्हणजे मुळा. मुळ्यामध्ये मोठ्या संख्येत औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून ते कॅन्सरपर्यंतच्या अनेक तक्रारी दूर होण्यास मदत होते. पाहूयात मुळ्याचे शरीराला होणारे फायदे...

१. कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत

मुळ्यामध्ये असणारे घटक हे विविध प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव करण्यास उपयुक्त ठरतात. मुळ्यातील घटक आणि पाण्याचा एकत्र आल्यास ज्या घटकांची निर्मिती होते त्यामुळे ट्युमरची निर्मिती होण्यापासून अटकाव होतो. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते. 

२. डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर 

शरीरातील ग्लुकोज वाढले तरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मुळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. मुळ्यामध्ये असणारे घटक डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याने या रुग्णांनीही आवर्जून आहारात मुळ्याचा समावेश करायला हवा. 

३. अपचनाच्या तक्रारीसाठी उपयुक्त 

अनेकांना गॅसेस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी भेडसावतात. मुळ्यामध्ये फायबर्स असल्याने यांसारख्या पचनाच्या तक्रारींवर ही भाजी खाणे अतिशय फायदेशीर ठरत असल्याचे लवनीत बत्रा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्यांना या तक्रारी भेडसावतात त्यांनी आहारात आवर्जून मुळ्याचा समावेश करावा असे त्या सांगतात. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सभाज्याआहार योजना