लहान मुलांनीच काय, पण मोठ्या माणसांनीही दररोज नियमितपणे दूध घेतले पाहिजे, हे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहेत. आरोग्यासाठी दूध पिणे किती चांगले आहे, हे आपल्याला माहिती असते. पण दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयी मात्र कधीच फार काही सांगितले जात नाही. त्यामुळेच तर दूध घेताना बऱ्याच जणांकडून काही चुका वारंवार होतात. याचा परिणाम म्हणजे नियमितपणे दूध घेऊनही आरोग्याला त्याचा म्हणावा तसा लाभ मिळत नाही. तुम्हीही दूध घेताना या चूका करत नाही ना?
का प्यावे दररोज दूध?दुधात भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरते. दूधामध्ये ए, के, बी-१२ ही जीवनसत्वे तसेच थायामिन, फॉस्फरस, सोडियम आणि पोटॅशियम यासारखी खनिजे असतात. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याने दररोज दूध घेणे अतिशय आवश्यक आहे.
दूध पिताना 'या' चुका टाळा१. जेवणानंतर दूध नकाेरात्री जेवल्यानंतर अनेक जणांना दूध पिण्याची सवय असते. ही सवय चुकीची आहे. कारण दूध हे पचायला जड असते. जेवण झाल्यानंतर शरीराला दूध पचवणे अवघड जाते. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. म्हणूनच जेवणाच्या नंतर किमान दिड तास दूध नको. जेवणानंतर दूध घ्यायचे असल्यास अगदी पोटभर जेवू नये. थोडे पोट रिकामे ठेवावे.
२. दुधासोबत मीठ नकोदूधामध्ये पोळी कुस्करून त्यात साखरेऐवजी मीठ घालून खाण्याची सवय अनेक जणांना असते. तसेच दूध- भात खाताना सुद्धा अनेक जण त्यात मीठ घालतात. पण दूध आणि मीठ हे विरूद्ध अन्न आहे. त्यामुळे ते कधीही एकत्र खाऊ नये. तसेच दूध प्यायच्या एक तास आधी आणि प्यायल्यानंतर एक तास आंबट आणि खारट पदार्थ खाऊ नयेत.
३. दुधासोबत कांदे, वांगे, मांसाहार नकोदूध आणि कांदे किंवा वांगे ही एक विरूद्ध अन्नाची जोडी आहे. त्यामुळे हे दूध आणि कांदे किंवा दूध आणि वांगे कधीही एकत्र करून खाऊ नयेत. यामुळे त्वचारोग निर्माण होतात. तसेच मासे खाताना किंवा मांसाहार करताना त्यासोबत कधीही दूध घेऊ नका. यामुळेही त्वचाविकार होतात तसेच पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात.
४. म्हशीच्या दुधाऐवजी गाईचे दूध प्याज्यांना कफ होण्याचा त्रास असतो, त्यांनी म्हशीच्या दुधाऐवजी गायीचे दूध घ्यावे. गाईच्या दुधात कॅल्शियम, प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन ई, झिंक भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे प्रतिकारशक्ती वाढते.
५. थंड दूध पिऊ नकाथंड दूध कधीही पिऊ नये. दूध गरम करूनच प्यावे. थंड दूध पचण्यास जास्त जड असते. त्यामुळे पोट बिघडणे, अपचन, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोट गुबारणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. फ्रिजमधील थंडगार दूध तर अजिबात घेऊ नये. शक्यतो दूधात साखर न टाकता ते प्यावे. यामुळे अधिक फायदा मिळतो.