आता कुठे मार्च महिनाच सुरु आहे, पण तरीही सगळीकडेच सध्या उन्हाचा कडाका (summer season) भयानक वाढला आहे. दुपारच्या वेळी बाहेर जाणं आणि उन्हाचा सामना करणं खरोखरंच जीवावर येत आहे. पण तरीही आपल्या कामानुसार, गरजेनुसार उन्हात जावंच लागतं, कामं उरकावीच लागतात. अशावेळी ऊन लागून आजारी पडण्याची खूप शक्यता असते. म्हणूनच तर उन्हात जावं लागलं तरी ऊन (heat stroke) बाधू नये, यासाठी या दिवसांमध्ये कांदा सतत हाताशी ठेवा...
एरवी कच्चा कांदा खायला अनेक जण नकार देतात. कारण त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. पण उन्हाळ्यात मात्र काेशिंबीर किंवा सॅलड या माध्यमातून थोडा हा हाेईना पण कच्चा कांदा आवर्जून पोटात जायला हवा. एवढंच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांत कांद्याचा रस त्वचेसाठी आणि शरीरासाठीही अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळेच तर उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आणि हिटस्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी कांदा कसा उपयुक्त ठरतो, त्याविषयीची ही माहिती.
उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा खाण्याचा उपयोग...(Benefits of eating onion in summer)१. कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणारे डिहायड्रेशन टाळण्यासाठी कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.२. कांदा थंड असतो. त्यामुळे ज्या लोकांना दररोज उन्हात जावे लागते, त्यांनी उन्हाळ्यात दरराेज रात्री झोपताना तळपायला कांद्याचा रस लावावा. यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. ३. उन्हाळ्यामध्ये अनेक जणांना रक्तदाब कमी होण्याचा त्रास होतो. अशा लोकांनी उन्हाळ्यात नियमितपणे कच्चा कांदा खावा. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण संतुलित राहण्यास मदत होते.४. उन्हात खूप फिरणे झाले की अंगाची आग होते. त्वचा जळजळते. हा त्रास थांबविण्यासाठी अंगाला कांद्याचा रस लावावा. अर्ध्या तासाने आंघोळ करून टाकावी.५. कांद्यामध्ये साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई, सोडिअम, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी कच्चा कांदा खावा.
६. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कच्च्या कांद्याचा रस काढून तो मस्तकावर लावण्याचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे डाेकं शांत, थंड होतं आणि ऊन लागल्याने होणारा त्रास कमी होतो.७. उन्हाळ्यात कच्चा कांदा नेहमी पर्समध्ये किंवा खिशात ठेवावा. कारण जर उन्हाचा त्रास होऊ लागला तर कांदा फोडून त्याचा वास घेतल्यानेही ऊन बाधत नाही.