Join us  

हाडं होतील मजबूत-वजनही होईल कमी, ४ डाळी फक्त आहारात हव्या! प्रोटीन डाएटची चिंता विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 7:13 PM

High Protein Pulses For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा नियमित समावेश करायला हवा याविषयी...

वजन कमी करणे हा अनेकांपुढील सध्या एक महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. सतत बैठ्या कामाने आणि व्यायामाच्या अभावाने वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जंक फूड, ताणतणाव यांमुळे यामध्ये आणखी भर पडत आहे. वजन कमी करण्यात व्यायामाचा जितका सहभाग असतो तितकाच किंवा त्याहून जास्त आहाराकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते. वजन कमी करायचं म्हणजे कमी खायचं असं नाही. कारण त्यामुळे शरीराचे पोषण न होता वजन कमी होते. त्यामुळे कमीत कमी कॅलरीज घेऊन जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबरचा आहारात समावेश केल्यास पोषणही होते आणि वजनही कमी होते. डाळ हा असाच एक पदार्थ असून त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डाळींमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असून प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल-शर्मा सांगतात वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा नियमित समावेश करायला हवा (High Protein Pulses For Weight Loss). 

१. हिरवे मूग

हिरव्या मूगात फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या डाळीचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असल्याने मूगाची उसळ खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते. 

(Image : Google)

 

२. मसूर डाळ

आपण वरण किंवा आमटी करण्यासाठी नियमितपणे तूरीची आणि मूगाची डाळ वापरतो. पण मसूराची डाळ आपण वापरतोच असे नाही. मात्र लालसर रंगाची दिसणारी ही मसूर डाळ फायबरयुक्त असल्याने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी ही डाळ फायदेशीर असते. या डाळीत पोटॅशियम, फोलेट आणि लोह चांगल्या प्रमाणात असते. 

(Image : Google)

३. छोले

छोले खाल्ल्याने गॅसेस होतात म्हणून अनेक जण छोले खाणे टाळतात. पण यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असल्याने वजन कमी करायचे असेल आणि पोषण व्हायचे असेल तर छोले खायला हवेत.

(Image : Google)

४. राजमा 

वजन कमी करण्यासाठी राजमा हा उत्तम पर्याय आहे. राजमा-चावल ही प्रसिद्ध डीश उत्तरेकडे आवर्जून खाल्ली जाते. यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने राजमा आवर्जून खायला हवा. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी राजमा उपयुक्त ठरतो. 

(Image : Google)

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य