-मंदार वैद्य
गावी सुट्टीला गेल्यावर उन्हा तान्हात हुंदडून, आंबट चिंबट खाऊन हमखास आजारी पडायला व्हायचं. दिवसभर शेतीच्या कामात आणि गायी गुरांची काळजी घेण्यात व्यस्त असलेल्या आजी आजोबांचे लक्ष आपल्या खोकाल्याकडे जाऊ नये अस कितीही वाटलं तरी पकडले जायचोच मग घरगुती औषध सुरु व्हायची. सहाणीवर उगाळलेल्या सुंठेचा लेप, तुरटी, हळद, आल्याचा रस, मध याचे चाटण आणि झोपताना कंपल्सरी हळद घातलेले दुध. असे अनेक उपचार. माझ्या आजोबांचे त्यांच्याच वयाचे एक मित्र आमच्याकडे आले की स्वतः सह सगळ्या मुलांना कडू लिंबाच्या काडीने दात घासायला लावायचे. आमच्या आजोबांनी लावलेला गावाठी गुलाब आता एखाद्या वृक्षासारखा झाला आहे. या गुलाबाची फुलं थोड्याशा साखरेसह काचेच्या बरणीत घालून आम्ही गुलकंद करायला ठेवायचो, पण तो गुलकंद मुरण्या आधीच आम्ही फस्त करायचो. आता त्या सुट्ट्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. आता आपण घरातल्या छोट्या जागेतल्या हिरव्या कोपऱ्यात असे काही औषधी प्रयोग करु शकतो का?१. हिरव्या कोप-यात औषधी वनस्पतींचा विचार करताना सर्व प्रथम तुळशीचे नाव पुढे येत. तुळस ही रोगनाशक शक्ती मानली जाते. विशेषतः सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये तुळस प्रभावकारी औषध आहे. राम तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस असे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. राम तुळस गडद हिरव्या रंगाची असते तर कृष्ण तुळस काळपट असते. कृष्ण तुळसेचा सुगंध राम तुलासेपेक्षा जास्त उग्र असतो. रान तुळसेच्या पानांचा वास अति उग्र असतो. तिच्या मंजुळांचा आकारही मोठा असतो. तुळशीचे रोप आठ इंची कुंडीत आगदी सहज वाढते. फक्त कुंडीतील मातीत सातत्याने शेण काला, गोमुत्र, कुजलेला काडी कचरा टाकत राहावा. तुळशीच्या मंजुळा ओल्या असतानाच खुडून टाकव्यात. आणि हो पूजेच्या निर्माल्याचे पाणी, दुध, दही या सारखे पदार्थ कुंडीत अजिबात टाकू नयेत. रोज तुळशीचे किमान एक पान तरी खावे, त्या निमित्ताने कुंडीची देखभाल ही करावी.तुळशीच्या बरोबरीनेच गावाती चहा आणि लांबट पानाचा पुदिनाही आठ इंची कुंड्यात लावावा. गावाती चहा, पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने एकत्रित रित्या उकळून छान उत्साहवर्धक पेय तयार होते. चहाची सवय कमी करण्यासाठी हे पेय म्हणजे उत्तम पर्यायच आहे.
२. हिरव्या कोप-याची शोभा वाढवणारी आणि तुलनेने अधिक कणखर वनस्पती म्हणजे कोरफड. हल्ली कोरफडीच्या वापरा बद्दल खूपच जाणीव निर्माण झाली आहे. आपल्या हिरव्या कोप-यात १२ इंची कुंडीमध्ये ही कोरफड छान वाढते. कोरफडीचा ताजा गर अंघोळी पूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरफडीचा रस घेतल्यास अपचनाच्या अनेक तक्रारी दूर होतात. कुंडीतील कोरफडीचे पान तोडताना सर्वात खालील पान धारदार सुरीने कापावे. कुंडीतील मातीचे सतत्याने पुनर्भरण करावे.३. आणखी एक औषधी वनस्पती म्हणजे अडुळसा. गर्द हिरवी पाने आणि पांढ-या फुलांचे घोस असलेले अदुळशाचे झाड हिरव्या कोप-यात १२ इंची अगदी सहज पणे वाढते. खोकला बरा होण्यासाठी अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस उपयुक्त असतो. अडुळशाची स्वच्छ धुतलेल्या पानांचा मंद आचेवर उकळलेला काढा खोकल्या साठी उपयुक्त असतो.
४. आणखी जागा असेल तर गावठी गुलाब नक्की लावावा. काचेच्या बाटलीत गावठी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि सम प्रमाणत खाडी साखर टाकून उन्हात मुरायला ठेवल्यास महिनाभरात छान गुलकंद तयार होईल. गुलकंद एक उत्तम पाचक आहे तसेच उष्णतेपासून होणारे विकार यावर गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. गावठी गुलाब लावताना मात्र किमान १६ इंची कुंडी वापरावी. कोणत्याही कुंडीतील माती सातत्यने हलवत राहून तिचे शेणखत, गोमुत्राने पुनर्भरण करावे. तसेच गुलाबाची यथा योग्य छाटणी करणेही आवश्यक असते. गावठी गुलाबावर पांढरा काळा मावा येतो. म्हणूनच नीम अर्क तसेच गोमुत्राची ही सातत्याने फवारणी करावी.नियम एकाच कोणतेच रासायनिक खत अजिबात वापरायचे नाही.
(लेखक सेंद्रीय आणि शहरी शेती तज्ज्ञ आहेत.)