Join us  

वाढलेल्या कोलेस्टेराॅलवर पौष्टिक ज्यूसचा उपाय, डाळिंब-संत्री-टमाटा-ओटस आणि डांगर -प्या पौष्टिक ज्यूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 2:10 PM

शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेराॅल (LDL) कमी करण्यासाठी, कोलेस्टेराॅलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी (for controlling cholesterol) डाळिंब,संत्री, टमाटा, ओट्स आणि डांगराचं पौष्टिक ज्यूस पिणं हा प्रभावी घरगुती उपाय आहे. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी तर होतंच सोबतच चांगलं कोलेस्टेराॅल (HDL) वाढण्यासही मदत होते. 

ठळक मुद्देसमजा खाण्यात तेलकट-तुपकट पदार्थ आले तर कोलेस्टेराॅल वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी डाळिंबाचं ज्यूस प्यावं.टमाट्यामध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो. या घटकामुळे शरीरातील खराब कोलेस्टेराॅल कमी होतं.डांगरामधील गुणधर्म धमन्यांमध्ये कोलेस्टेराॅल साठण्यावर नियंत्रण ठेवतात.

हदयाचं आरोग्य जपण्यासाठी कोलेस्ट्रेराॅल नियंत्रित ठेवणं, वाढलेलं बॅड कोलेस्टेराॅल कमी करणं (controlling cholesterol)  महत्वाचं असतं. आपल्या आहारातील अनारोग्यकारक फॅट्सचं प्रमाण कमी करणं, नियमित व्यायाम करणं, वजन कमी करणं, वजन नियंत्रित ठेवणं या मार्गांनी कोलेस्टेराॅल नियंत्रित करता येतं. तसेच कोलेस्टेराॅल कमी करण्याचा आणखी एक घरगुती उपाय आहे, तो म्हणजे डाळिंब,संत्री, टमाटा, ओट्स आणि डांगराचं पौष्टिक ज्यूस पिणं.  ग्रेटर नोएडा येथील GIMS या हाॅस्पिटलमध्ये कार्यरत आहारतज्ज्ञ डाॅ. आयुषी यादव शरीरातील एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्टेराॅल कमी करण्यासाठी ज्यूस पिण्याचा (juice for lowering cholesterol)  सल्ला देतात. आपल्या आहारात अनारोग्यकारक असे पदार्थ खाण्यात आले तर या पाच पैकी कोणतंही ज्यूस प्यायलं तरी कोलेस्टेराॅल वाढण्याचा धोका कमी करता येतो.  या ज्यूसमुळे शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी तर होतंच सोबतच एचडीएल म्हणजे चांगलं कोलेस्टेराॅल वाढण्यासही मदत होते.  हे पाच प्रकारचे ज्यूस केवळ कोलेस्टेराॅल नियंत्रित ठेवतात असं नाही तर एकूणच आरोग्यासाठी त्यांचा फायदा होतो. 

Image: Google

1. डाळिंबाचं ज्यूस

इतर फळांच्या तुलनेत डाळिंबाच्या ज्यूसमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं. हे ॲण्टिऑक्सिडण्ट्स शरीरातील बॅड कोलेस्टेराॅलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. डाळिंबाच्या रसामुळे रक्तदाब कमी होतो. हदयाच्या धमन्यांमधला अडथळा निघून जातो. रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळे हदयाचं आरोग्य निरोगी राहातं. समजा खाण्यात तेलकट-तुपकट पदार्थ आले तर कोलेस्टेराॅल वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी डाळिंबाचं ज्यूस प्यावं.

Image: Google

2. संत्र्याचा ज्यूस

आरोग्यासाठी संत्र्याच ज्यूस फायदेशीर असतो. हे ज्यूस फॅट फ्री आणि सोडियममुक्त असतं. जीवनसत्व  आणि खनिजांनी समृध्द असणारं संत्र्याचं ज्यूस शरीरातील वाढलेलं कोलेस्टेराॅल कमी करतं.  संत्र्याच्या ज्यूसनं शरीरातील वाईट कोलेस्टेराॅल कमी होण्यासोबतच शरीरातील चांगलं कोलेस्टेराॅल वाढण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. लघवीतलं पीएचचं प्रमाण वाढतं. किडनीशी निगडित समस्यांचा धोका कमी होतो. 

Image: Google

3. टमाट्याचं ज्यूस

टमाट्यामध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो. या घटकामुळे शरीरातील खराब कोलेस्टेराॅल कमी होतं. तसेच यातील नियासिन हा घटकही कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. टमाट्याच्या ज्यूसमधील फायबरमुळे पोटाचं रोग्य निरोगी राहातं. पचन व्यवस्था नीट काम करते. 

Image: Google

4. ओट्स ड्रिंक

ओट्समध्ये बीटा ग्लूकेन्स असतं. यामुळे आतड्यात एक जेलीसारखा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ शरीरातील पित्तासोबत परस्परक्रिया करुन बॅड कोलेस्टेराॅल कमी करतं. ओट्स ड्रिंकमुळे पचन व्यवस्था व्यवस्थित काम करते. यावर झालेलं संशोधन सांगतं की रोज 3 ग्रॅम बिटा ग्लूकेन्सचं सेवन केल्यास बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. सकाळी नाश्ता  झाला की ओट्स ड्रिंक घ्यावं. यासाठी रात्रभर ओट्स पाण्यात भिजवावेत. सकाळी भिजलेले ओट्स मिक्सरमधून बारीक करुन घ्यावेत. यात गाईचं दूध घालून स्मूदी सारखं ओट्स ड्रिंक तयार करता येतं. 

Image: Google

5. डांगराचं ज्यूस

डांगराच्या ज्यूसमध्ये शक्तीशाली ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. यात पाॅलीफेनाॅलिक आणि बीटा केरोटीन हे महत्वाच घटक असतात. डांगरामधील हे सर्व घटक धमन्यांमध्ये कोलेस्टेराॅल साठण्यावर नियंत्रण ठेवतात. डांगराचं ज्यूस दिवसभरात कधीही प्यायलं तरी चालतं. डांगराचं ज्यूस तयार करण्यासाठी डांगराचे तुकडे करुन ते उकडून घ्यावेत. उकडलेलं डांगर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटावं. हे ज्यूस ग्लासमध्ये काढून त्यात थोडं मीठ घालून ते प्यावं.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाहोम रेमेडी