दोन जेवणांमधला काळ मोठा असतो. त्यामुळे मधे भूक लागतेच. पण मधल्या काळात काही खाल्लं तर वजन वाढेल या धाकानं अनेकजण खाण्याचं टाळतात. पण त्याचा उलटा परिणाम होतो. भूक अनावर होऊन एका क्षणी तोल ढळतो आणि एकाच वेळेस खूप खाल्लं जातं. तर अनेकजण मधल्या काळात काय खावं याचा विचार न करता पोषण मुल्यांचा अभाव असलेले जंक फूड खातात. त्याचा परिणाम म्हणजे थोडा वेळ भूक भागल्यासारखं वाटतं. पण पुन्हा भूक लागते. कामातलं लक्ष जातं.
आहारतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ यांच्या मते दोन जेवणांमधल्या वेळेत काही खाणं हे चूक नाही. पण आपण काय खातो, किती खातो? याचा विचार फार महत्त्वाचा आहे. स्नॅक्स म्हणजे तेलकट, अतीगोड, जंकफूड, बाहेरचे पदार्थ खाणं नव्हे. आरोग्य, वजन आणि ऊर्जा यांचा विचार करता स्नॅक्स अर्थात मधलं खाणं हे पोषणमूल्ययूक्त , भूक भागवणारंच असलं पाहिजे. तज्ज्ञ म्हणतात की मधल्या काळातला आहार हा १०० उष्मांकाच्या आसपासचा असला पाहिजे. ज्यात कर्बोदकं, प्रथिनं आणि आरोग्यदायी फॅटसचा समावेश असायला हवा. जेवण झाल्यानंतर आणि दुसऱ्या जेवणाच्या बरोबर मधल्या काळात हा आहार घेणं फायदेशीर असतं. या आहारानं जेवणापर्यंत गळपटल्यासारखं होत नाही. कामात उत्साह राहातो आणि कामासाठी या मधल्या काळातल्या खाण्यातून ऊर्जा मिळते. मधल्या वेळेतलं खाणं हे आवश्यकच असतं. त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. फक्त मधल्या वेळेतलं खाणं म्हणून आपण काय निवडतो याकडे लक्ष द्यायला हवं.
मधल्या वेळेतल्या खाण्याचे फायदे
- मधल्या वेळेतला आरोग्यदायी आहार हा शरीराची पोषणमुल्यांची गरज भागवू शकतो. जर मधल्या वेळेतलं खाणं म्हणून फळं आणि भाज्यांचं सॅलेड, कोशिंबीर यांचा समावेश होतो तेव्हा शरीरात रोग प्रतिकारशक्तीस आवश्यक अ आणि क जीवनसत्त्वं मिळतं. दात, हिरड्या उत्तम राहाण्यास , शिवाय शरीरावरच्या जखमा भरुन येण्यास मधल्या वेळेतलं पौष्टिक खाणं मदत करतं. शिवाय या खाण्यातून पचनक्रियेसाठी आवश्यक फायबर मिळतात. कॅल्शिअम आणि प्रथिनंयूक्त पदार्थांचा मधल्या वेळेतल्या खाण्यात समावेश केला तर त्याचा स्नायुंची ताकद वाढवण्यास. केस आणि त्वचेचं आरोग्य सांभाळण्यास फायदा होतो. लो फॅट डेअरी पदार्थांचा या खाण्यात समावेश केला तर हाडं देखील मजबूत होतात.
- भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मधल्या वेळेतलं खाणं खूप उपकारक ठरतं. मधल्या वेळेतल्या आहारामुळे भूक अनियंत्रित होत नाही. पोट भरल्यासरखं वाटतं. त्यामुळे प्रत्यक्ष जेवायला बसल्यावर प्रमाणाबाहेर खाण्यास अटकाव होतो. कर्बोदकं, कॅल्शिअम , क जीवनसत्त्वं आणि प्रथिनं यांचा समावेश असलेला आहार मधल्या वेळेचं खाणं म्हणून घेतल्यास भूक भागल्याचं समाधान मिळतं.
- पण साखरेचे पदार्थ खाल्ले तर ऊर्जेची पातळी एकदम वाढते आणि लगेच कमीही होते. कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ हे ऊर्जा मिळवून देण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांचा समावेश मधल्या खाण्यात करुन दोन जेवणादरम्यानच्या कामासाठीची ऊर्जा यातून मिळते.
- कामात लक्ष लागण्यासाठी मधल्या काळातलं पौष्टिक खाणं खूप महत्त्वाचं आहे. अमेरिकन डाएटिक असोसिएशन यांच्य मतानूसार दूपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणाआधी पौष्टिक आहार स्नॅक्स म्हणून खाल्ला तर कामं लवकर लवकर आवरण्यास, कामं प्रभावी होण्यास त्याचा फायदा होतो. यासाठी भाज्या, लो कॅलरी एनर्जी बार, पॉपकॉन्ंस यांचा समावेश असावा.
मधल्या वेळेत पोटभरीचं पण पौष्टिक पदार्थांचे पर्याय काय? मधल्या वेळेतल्या खाण्यासाठी शक्यतो घरात बनवलेल्या पदार्थांचाच समावेश असावा. विकतचे पदार्थ कमीत कमी किंवा क्वचित असावे, नसल्यास उत्तम.- बेक्ड ओटस पूरी- नाचणी डोसा- बाजरी पीठ, गाजर आणि कांदा यांचा उत्तप्पा- मूठियांचे आरोग्यदायी प्रकार- मोड आलेल्या कडधान्यं उकडवून किंवा त्यांची कोशिंबिर- भाज्यांचे सॅलेड- फळं- मूगाच्या डाळीचा ढोकळा- नागलीची उकड- पौष्टिक लाडू- खाकरा- सुका मेवा, खजूर- कुरमु-याचा चिवडा- साधे पॉपकॉर्न्स-साळीच्या लाह्यांचा/ गव्हाच्या लाह्यांचा चिवडा- राजगिरा लाडू, चिक्की- ज्वारीच्या लाह्या.