वैद्य रजनी गोखले
सध्या अनेकींच्या चिंतेचा विषय काय तर वाढते वजन. अनेक आजारात मूळ कारण स्थुलता आहे. तर दुसरीकडे मूळ आजारात स्थुलतेचा, वाढलेल्या वजनाचा उपद्रव जाणवतो.
वाढलेलं वजन कसं कमी करायचं याविषयी बोलण्यापूर्वी वजन कशाने वाढते, हे पाहू. काही आजारांमुळे वजन वाढीची कारणं वेगळी. मात्र भूक नसताना खाणे, जेवणानंतर पुन्हा खाणे, शारीरिक श्रमांचा विचार न करता खाणे, सतत बैठे काम करणे, व्यायामाचा पूर्ण अभाव, दिवसा झोपणे या कारणांनी स्थुलता वाढत जाते. बदललेली लाइफस्टाइल हे तर वाढत्या स्थुलतेचे प्रमूख कारण.
आता आपलं वजन वाढलं आहे हे कसं ओळखायचं?
चालताना, जिना चढताना दम लागणे, घामाचे प्रमाण वाढणे, सतत भूक लागणे, भूक सहन न होणे, गुडघे किंवा टाचा दुखणे, याशिवाय मासिक पाळीची अनियमितता, रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी होणे, हे सारे होत असले तरी समजावे की आपले वजन वाढायला लागलेले आहे. वजन काट्यावर जरी वजन फार दिसत नसले किंवा कुणी म्हणत नसले की तुझे वजन वाढले आहे तरी ही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर समजावे की आपले वजन वाढते आहे. आपल्या शरीरात स्थुलतेची नांदी समजावी आणि त्वरित जागे व्हावे.
मग पुढचा प्रश्न येतो वाढलेलं वजन कमी करणं.
म्हणजे लोक डाएट करतात. अजिबात न खाणं सुरु करतात. किंवा कमी खातात. तसं न करता, वजन न वाढवणारा आहार घ्यायला हवा. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचे काटेकोर पालन व्हायला हवे.
त्यासाठी काय करता येईल?
१. रोज अंशापोटी अर्धा कप गरम पाणी प्यावे.
२. दोन्ही जेवणापूर्वी गरम पाणी प्यावे.
३. पाणी पिण्याचे प्रमाणही जास्त नसावे.
४. आवश्यक तेवढे आणि शक्यतो गरम पाणी प्यावे.
५. साखर-गुळ -गोड पदार्थ पूर्ण बंद करावे.
६. मीठही कमी करावे, समूद्री मिठाऐवजी शक्यतो सैंधव मीठ वापरावे.
७. आहारात भाज्यांचे सूप, सलाड, धान्यांचे कढण यावर विशेष भर द्यावा.
८. धान्य भाजून वापरावे.
९. कडू-तुरट चवीचा आहारात समावेश करावा. म्हणजे कारली, हळद, मेथ्या.
१०. स्निग्ध पदार्थांचा वापर कमी करावा.
११. बेकरी प्रॉडक्टस बंद करावेत.
१२. दुपारची झोप टाळावी.
१३. मधूमेह आहे का आपल्याला हे एकदा तपासून घ्यावे.
( लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)