Join us  

डाएट-फिटनेससाठी ‘मोटिव्हेशनच’ हवं असं वाटतं ना, मग हे घ्या लाइफटाइम मोटिव्हेशन, व्हा फिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 3:42 PM

कसे काय लोक एवढे फिट होतात, कोण देतं त्यांना प्रेरणा, कशाच्या जोरावर बदलतात आपली लाइफस्टाइल?

ठळक मुद्दे एखाद्याला वजन कमी करायचे असेल तर आधी आपण कुठं चुकतोय, आपल्याला नेमकं काय हवंय हे स्वत:ला समजलं की सुरूवात कुठं करायची हे लक्षात येऊ लागतं.

- स्वप्नाली बनसोडे

फिटनेस आणि फॅटलॉस बद्दल चर्चेत तुम्ही हे ऐकलं असेल किंवा म्हणलंही असेल की फिट व्हायचंय ना, वजन कमी करायचंय ना मग मला 'मोटिव्हेशन' पाहिजे. पण खरंच हे सो कॉल्ड 'मोटिव्हेशन' इतकं महत्त्वाचं असतं का? एक सिक्रेट सांगू का? फिटनेससाठी सर्वात महत्त्वाचं काही असेल ते म्हणजे- सातत्य. आपल्याला वाटत असतं की खूप फिट दिसणारी माणसं कशी काय बुवा चोवीस तास मोटिव्हेटेड राहत असतील?खरंच आहे हे- कुणीच २४ तास मोटिव्हेटेड राहू शकत नाही. प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणी, संकटं, भावनिक चढउतार असतात, कंटाळा सगळ्यांनाच येतो, कधी कधी असं वाटतं- नको यार आज व्यायाम, आज काहीच करायला नको, आज नुसती झोप काढावी. आणि हे सगळं असं वाटणं नॉर्मल आहे, कारण आपण माणूस आहोत. मग तरीही ती लोकं इतकी फिट कशी असतात याचं सिक्रेट उत्तर सांगू? आपल्याला कधी जेवण्याचा, सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्याचा, चहा- कॉफी प्यायचा, श्वास घ्यायचा वगैरे कंटाळा येतो का? तुम्ही म्हणाल काहीही काय? आपल्याला या गोष्टींचा कंटाळा येत नाही कारण या गोष्टी आपण सातत्याने रिपीटेटीतव्हली करत असतो, त्यामुळे त्या आयुष्याचा अविर्भाज्य भाग होऊन जातात, व्यायामाचं पण तसंच आहे की मग !

जर एखाद्याला वजन कमी करायचे असेल तर आधी आपण कुठं चुकतोय, आपल्याला नेमकं काय हवंय हे स्वत:ला समजलं की सुरूवात कुठं करायची हे लक्षात येऊ लागतं. उदा. सोनाली नाईट शिफ्टमध्ये काम करते, तिची झोप अजिबात नीट होत नाही, कामाचा ताण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जेवण्याखाण्याच्या वेळा आणि प्रकार खूपच बदललेले आहेत. काही महिन्यात तिला हे ही जाणवलं की आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत आणि वजन सुद्धा वाढतंय. जेव्हा तिला जाणवेल की ती स्वत:कडे लक्षच देत नाहीये, आपलं काहीतरी- कुठंतरी चुकतंय, हीच सोनालीसाठी खरी सुरूवात असेल.मग सोनालीला आपलं चुकतंय कठंतरी याची जाणीव झाली, तेव्हा तिने काही बदल करायचे ठरवले. कामाप्रमाणे रूटीन ठरवलं आणि खाण्याच्या वेळा सांभाळल्या. आणि आधी सांगितलेल्या १-२-३  मेथडप्रमाणे जेवणातलं भाज्यांचं प्रमाण वाढवलं, प्रत्येक जेवणात प्रोटीन आणि सिझनल फळं नियमित खाऊ लागली आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी पिण्याचं प्रमाण पण वाढवलं. हे बदल सोनालीने हळूहळू अंमलात आणले, पण शिस्तीने सांभाळले. आता तिला असं जाणवतंय की ॲसिडिटीसारख्या शारीरिक तक्रारी कमी होऊ लागल्या आहेत आणि मुख्य म्हणजे एनर्जी लेव्हल खूपच चांगली राहतेय.

खरं पाहायला गेलं तर आपण कुठं चुकतोय किंवा आपल्याला काय करायची गरज आहे, हे जाणवणे ही पहिली पायरी आहे. कारण हे जाणून घेऊनच, त्यावर काहीतरी उपाय म्हणून काही पावलं उचलणं ही दुसरी पायरी असते. मग जेव्हा तुम्ही काहीतरी ॲक्शन घेता तेव्हा तुम्हांला अपेक्षित रिझल्टस दिसू लागतात, ही अर्थातच तिसरी पायरी आहे. आणि मग तुम्ही ज्याला मोटिव्हेशन म्हणता ना, ते खरोखर इथून मिळतं, कारण आपल्या शरीरात, जीवनशैलीत, वजनात घडलेला बदल आपल्याल सर्वात जास्त मोटिव्हेट करतो. म्हणजे कळलं का? नुसते काही 'मोटिव्हेशनल कोटस' वगैरे वाचून तेवढ्यापुरतं बरं वाटेल, पण जर खरोखरच काही बदल घडवायचा असेल तो तुम्हीच घडवावा लागतो. त्यात रेग्युलर आहार आणि व्यायाम यांचे रूटीन पाळणे, याला पर्याय नाही. आणि मग जे बदल तुमच्यात घडतील ते पाहून तुम्हांलाच नव्हे, इतरांना पण मोटिव्हेशन मिळेल. फिटनेसमध्ये हेच मोटिव्हेशन महत्त्वाचं असतं.आणि जर 'फिटनेस' ही तुम्हांला जीवनशैली बनवायची असेल, तर तुम्हांला पोषक आणि आवश्यक तेवढाच आहार, नियमित व्यायाम ही जीवनशैली बनवावी लागेल. चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकवणे ही सोपी गोष्ट नसते, त्यासाठी तुम्हांला मेहनत घ्यावी लागेल. सातत्य ही एकमेव गोष्ट आहे की जिच्यामुळे तुम्ही तुमचे फिटनेस गोल लवकर आणि उत्तम प्रकारे अचिव्ह करू शकता. मात्र तुम्ही ३-४  महिने खूप शिस्तीत, व्यायाम केला नीट आहार घेतला आणि तुमचं एक ठराविक ध्येय पूर्ण झालं की सगळं सोडून दिलंत, तर त्याला तुम्ही 'फिट' झालात असं म्हणता येणार नाही. कारण फिटनेस हे फक्त काही दिवसांपुरते ध्येय अथवा 'शॉर्ट टाईम गोल' नसतो, ती तुमची जीवनशैली व्हायला हवी, तर त्यातून हवे असणारे फायदे मिळतील. आणि मुळात जेव्हा तुम्ही ३-४  महिने सगळं स्ट्रिक्ट फॉलो करून नंतर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं खाल, व्यायामाला दांड्या माराल तर तुमचं घटवलेलं वजन नक्की परत येणार आहे, हे खात्रीने लिहून घ्या.म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगतेय, एक्स्ट्रीम काही करायला जाऊ नका, त्याने शरीराला आणि तुमच्या मेटॅबोलिझमला शॉक बसतो, आरोग्याचे नुकसान होतं. त्यापेक्षा रोजच्या आहारात आयुष्यभर टिकवता येतील असे साधे- सोपे बदल, (ज्याविषयी आपण गेल्या काही लेखांतून बोलत आहोत), नियमित व्यायाम हे अंमलात आणलंत, तर फायद्यात राहाल, वजन कमी होईल, कामं करण्याचा उत्साह राहील. या छोट्या- छोट्या बदलांनीच आपल्याला सवयी लागतात आणि त्या चांगल्या सवयी आपली फिटनेसची जीवनशैली घडवतात.लोकांना डाएट म्हणजे उपासमार आणि व्यायाम म्हणजे दिवसभरात तीनेक तास घाम गाळणं, ट्रेडमिलवर पळणं हा व्यायाम वाटतो. खरं तर हे आहे, आहारातले छोटे- छोटे बदल, आवश्यक ते सर्व घटक आहारात घेणं आणि आठवड्यातून चारच दिवस का होईना पण नियमित अर्धा तास तरी व्यायाम करणं हे सुद्धा तुम्हांला फिट बनवण्यासाठी पुरेसं आहे.  गैरसमज दूर करून आपल्या चुका होत आहेत, हे मान्य करा आणि छोटे-छोटे बदल घडवून आणायचा निश्चय करा. नुसता निश्चय आणि विचार नको, तो कृतीत आणा, तेच जास्त महत्त्वाचं. Start slow and stay consistent.

 

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fithttps://www.facebook.com/fittrwithswapnali

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्य