Join us  

डाळ पालक खिचडी; परफेक्ट वन डिश मिल, प्रोटीन-पालक आणि चव तिहेरी चविष्ट मिलाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 4:10 PM

How to Make Dal Palak Khichadi? एकच पदार्थ सर्वांच्या आवडी निवडी आणि आरोग्याचा विचार करुन करायचा झाल्यास मोठं कोडंच पडेल स्वयंपाक करणाऱ्यासमोर. असा एकच एक पदार्थ पटकन आठवत नसला तरी असे पदार्थ आहेत जे केले की सगळ्यांच्याच आवडीचे होतात आणि सगळ्यांच्याच फायद्याचेही ठरतात. अशा यादीतला एक पदार्थ म्हणजे डाळ पालक खिचडी.

ठळक मुद्देडाळ पालक खिचडी ही कुकरमधे न करता बाहेर कढईत करावी. यामुळे खिचडीत पालकाचा स्वाद चांगला उतरतो.वजन कमी करण्यासाठी भात बंद केलेला असला तरी ही खिचडी खाल्लेली चालते. उलट वजन कमी करण्यासाठी ही खिचडी मदतच करते.  तयार खिचडीवर तुपात हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी द्यावी.  Main Photos: www,archanaskitchen.com

आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. आपल्या आरोग्यासाठी काय महत्त्वाचं त्याचा विचार आहार घेताना करायलाच हवा असं तज्ज्ञ सांगतात, तेव्हा एकदम पटतं. पण स्वयंपाक करताना ओट्याशी उभं राहिलं की केवळ आपला किंवा घरातल्या एकाच्याच आरोग्याचा, आवडी निवडीचा विचार करुन स्वयंपाक करुन चालत नाही.

घरात चार पाच माणसं असतील प्रत्येकाच्या आरोग्य आणि आवडीच्या गरजांना न्याय मिळायलाच हवा. हा विचार करुन आज ह्याच्या आवडीचा, उद्या तुझ्या आवडीचा, सकाळी नाश्त्याला मुलीच्या आवडीचे पदार्थ तर संध्याकाळी मुलाच्या आवडीचा स्नॅक्स. एकच पदार्थ सर्वांच्या आवडी निवडी आणि आरोग्याचा विचार करुन करायचा झाल्यास मोठं कोडंच पडेल स्वयंपाक करणाऱ्यासमोर. असा एकच एक पदार्थ पटकन आठवत नसला तरी असे पदार्थ आहेत जे केले की सगळ्यांच्याच आवडीचे होतात आणि सगळ्यांच्याच फायद्याचेही ठरतात.

Image: Google

अशा यादीतला एक पदार्थ म्हणजे डाळ पालक खिचडी. ऐकायला हा पदार्थ थोडा विचित्र वाटतो, पण चवीला भन्नाट गुणांच्या बाबतीत एकदम बेस्ट आहे.   कधी कधी भाज्या आमट्यांचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आलेला असतो, कधी स्वयंपाकाचाच कंटाळा आलेला असतो तर कधी वेगळं पण झटपट होईल, छान लागेल असं काही करण्याचा मूड असतो. कोणत्याही मूडबरोबर सहज खाल्ली जाईल अशी ही डाळ पालक खिचडी . ही खिचडी म्हणजे टू इन वन आहे. चविष्ट पण आणि पौष्टिकही.

Image: Google

डाळ पालक खिचडी कशी करणार?

डाळ पालक खिचडी करण्यासाठी अर्धा कप तांदूळ (धुतलेले),  अर्धा कप मुगाची डाळ, पाव चमचा हळद, 3 कप पाणी, 1 मोठा चमचा साजूक तूप, 1 छोटा चमचा जिरे, 2 वेलच्या, 1 इंच दालचिनी तुकडा, 1-2 तमालपत्रं, 1 लाल सुकी मिरची, एक कांदा बारीक चिरलेला, 1 हिरवी मिरची मधून कापलेली,  एक चमचा लसूण आल्याची पेस्ट, 1 टमाटा बारीक कापलेला, मूठभर पालकाची ताजी पानं आणि मीठ घ्यावं. 

डाळ पालक खिचडी करताना आधी डाळ तांदूळ वेगवेगळे धुवून घ्यावेत आणि स्वतंत्रपणे अर्धा तास भिजवावेत. पालकाची पानं स्वच्छ धूवून पाण्यात  एक मिनिटभर उकळून घ्यावीत.  पाण्यातून पानं काढून थोडी गार झाली की मिक्सरमधून काढून प्युरी करुन घ्यावी.  

Image: Google

कढईत तूप गरम करावं. त्यात जिरे, वेलची, दालचिनी, तमालपत्रं, सुकी लाल मिरची घालून सर्व जिन्नस चांगलं परतून् घ्यावं. यानंतर कांदा सोनेरी रंगावर परतावा. कांदा परतला  गेला की आलं लसणाची पेस्ट आणि मधोमध चिरलेली हिरवी मिरची घालावी. हे परतून घेतलं की चिरलेला टमाटा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा.  टमाटा मऊ झाला की मग त्यात पालकाची प्युरी टाकावी. ही प्युरी रंग बदलेपर्यंत परतून घ्यावी. प्युरीचा रंग बदलला की निथळून ठेवलेले तांदूळ आणि मुगाची डाळ घालावी. सोबतच आपल्याला जितकी घट्ट, पातळ हवी  त्याप्रमाणे पाणी घालावं. मिश्रण चांगलं हलवलं की मीठ घालून पुन्हा ते नीट मिसळून घ्यावं.  कढईवर झाकण ठेवून खिचडी शिजू द्यावी. मंद आचेवर 5-10 मिनिटात खिचडीत पालकाचा स्वाद उतरतो. तोपर्यंत कढईवरचं झाकण काढू नये. दहा मिनिटांनी खिचडी चांगली हलवून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास थोडा गरम पाण्याचा हबका मारावा. वरुन थोडं साजूक तूप घालून खिचडी पाच मिनीटं पुन्हा शिजवून घ्यावी. या खिचडीवर थोडं तूप गरम करुन थोडासा हिंग, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी घातली की ही डाळ पालक खिचडी आणखीनच छान लागते. 

Image: Google

डाळ पालक खिचडी का खावी?

1. डाळ पालक खिचडी खाल्ल्याने अ,ब, क, ई ही जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम ही खनिजं मिळतात. कारण  या खिचडीत पालक आणि मुगाच्या डाळीचा वापर केलेला असतो. त्यामुळे ही खिचडी खाल्ल्याने भरपूर प्रथिनं आणि इतर पोषक तत्त्वं मिळतात. 

2.  वजन कमी करायचं म्हणून आवडत असूनही भात खाणं बंद केलं असेल तर डाळ पालक खिचडी खाणं हा योग्य पर्याय आहे. या खिचडीत प्रथिनं आणि फायबर भरपूर असतात. तसेच ही खिचडी खाल्ल्याने भूक तर भागतेच आणि शिवाय शरीरा कॅलरीजही कमी जातात. वजन कमी करण्यासाठी अधून मधून डाळ पालक खिचडी खाणं हा चांगला उपाय आहे. 

3. डाळ पालक खिचडी परतताना, शिजवताना आणि खाताना तुपाचा वापर होत असल्यानं ही खिचडी तिच्यातील स्निग्धतेमुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

4. रक्तातील  जास्त कोलेस्ट्राॅलचं प्रमाण कमी करण्यासाठी डाळ पालक खिचडी फायदेशीर आहे. तसेच मुगाच्या डाळीमुळे बॅड कोलेस्ट्राॅल घटवण्यासाठीही ही खिचडी मदत करते.  

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य