भूक लागलेली असेल, थकवा आलेला असेल, काम करुन कंटाळा आला असेल किंवा नवीन कामाला सुरुवात करायची असेल, टेन्शन घालवायचं असेल नाहीतर एखादा आनंदाचा क्षण झटपट साजरा करायचा असेल तर एक कप चहानं काम होतं. इतका चहा आपल्या सवयीचा आणि आवडीचा झाला आहे. चहा हे लोकप्रिय पेय असलं तरी त्यामुळे आरोग्यविषयक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे डॉक्टर अनेकांना चहा बंद करण्याचा सल्ला देतात. अनेकांसाठी चहा न पिण्याचं पथ्यं पाळणं हे अवघड होतं. आपला नेहमीचा चहा आरोग्यासाठी काही धोके निर्माण करणारा असला तरी आता चहा पिल्याने आरोग्याचा फायदा व्हावा म्हणून आरोग्यदायी चहाचे अनेक पर्यायही निघाले आहेत. या अनेक प्रकारातला चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर प्रकार म्हणजे गुळाचा चहा.
Image: Google
गुळाचा चहा आरोग्यदायी असतो असं आता वैद्य, आरोग्य तज्ज्ञ, आहार तज्ज्ञही सांगू लागल्यानं गुळाचा चहा पिण्याची क्रेझ वाढली आहे. म्हणूनच आज बाहेर अमृततूल्य चहाच्या दुकानांच्या बरोबरीनं गुळाचा आरोग्यदायी चहा देणारी दुकानंही सुरु झाली आहेत. चहा आवडतो, पण साखरेचा चहा नको म्हणून जे पर्याय शोधत असतील त्यांना गुळाच चहा नक्कीच आवडणारा आणि फायदा देणारा आहे. गोड पदार्थांसाठी साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून गुळाचा पर्याय दिला जातो. याला कारण साखरेने शरीरास जी हानी होते ती गुळाने होत नाही. उलट गुळातील आरोग्यदायी घटक हे शरीराच्या पोषणास लाभदायक ठरतात. अति चहा पिण्याची सवय म्हणजे व्यसनच. कोणत्याही व्यसनासारखं चहाचं व्यसन हे हानिकारकच. ते सोडवायचं असेल तर गुळाचा चहा पिणं हा उत्तम पर्याय आहे.
Image: Google
गुळाच्या चहाचे फायदे काय ?
1. गुळात फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही महत्त्वाची खनिजं , अ आणि ब ही जीवनसत्त्वं असतात. गुळाचा चहा पिल्याने गुळातील या आरोग्यदायी घटकांचा लाभ शरीरास होतो.
2. गुळाचा चहा पिल्याने पचन व्यवस्थित होतं. गॅस, अँसिडिटी हे त्रास दूर होतात. गुळात कृत्रिम गोडव्याचं प्रमाण कमी असतं.
3. गुळाचा चहा पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. गुळाची प्रकृती ही उष्ण असते.त्यामुळे थंड वातावरणानं होणार्या आजारांचा धोका कमी होतो. सर्दीमुळे घशात होणारा संसर्ग गुळाचा चहा पिल्याने दूर होतो. थंडीत शरीरात ऊब निर्माण करण्याचं काम हा चहा करतो. सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय म्हणून गुळाच्या चहाला महत्त्व आहे. तसेच गुळात महत्त्वाची खनिजं असतात जी हाडं आणि सांधे मजबूत करण्याचं काम करतात.
4. गुळाचा चहा पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते, तणाव आणि थकवा दूर होतो. शरीर डिटॉक्स करण्याचे गुणधर्म गुळाच्या चहात असतात.
5. गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं गुळाचा चहा पिल्यानं शरीरास लोह मिळतं आणि रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत मिळते.
6. गुळाचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहातो. शिवाय हा चहा मासिक पाळी सुरु असताना पिल्यास मासिक पाळीत पोटात, कमरेत, ओटीपोटात होणार्या वेदना कमी होतात.
7. गूळ जेव्हा कमी प्रमाणात सेवन केला जातो तेव्हा तो वजन नियंत्रित ठेवण्यास आणि कमी करण्यास मदत करतो. गुळाच्या चहामुळे चयापचय क्रिया सुधारते, त्यामुळे अन्नाचं पचन नीट होतं.म्हणून गूळ वजन कमी करण्यास विशेषत: पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यास मदत होते. गुळाचा चहा पिल्यानं सारखा चहा पिण्याचा मोह कमी होतो. साहजिकच गुळाचा चहा पिल्यानंही वजन कमी होण्यास मदत होते.
Image: Google
गुळाचा चहा आरोग्यदायी तरीही..
गुळाचा चहा आरोग्यदायी आणि फायदेशीर असतो हे तज्ज्ञ सांगतातच पण एक महत्त्वाची सूचनाही सांगतात, की गुळाचा चहा हा प्रमाणात घेतला तर तो खूप फायदेशीर असतो पण प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास त्याचे तोटेही होतात.
1. आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ सांगतात की, उन्हाळ्यात दिवसातून एकदा आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दिवसातून दोन वेळा गुळाचा चहा घ्यावा. एवढ्या प्रमाणात घेतलेला गुळाचा चहा फायदेशीर असतो. पण 4 कपापेक्षा जास्त कप चहा घेणं आरोग्यास त्रासदायक आहे.
2. गूळ उष्ण प्रकृतीचा असतो त्यामुळे जास्त वेळा गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील उष्णता वाढून नाकातून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
3. गुळाच्या चहानं अधिक वेळा चहा पिण्याचा मोह कमी होतो, त्यामुळे वजन नियंत्रित राहातं, कमी होतं हे खरं. पण अनेकजण आरोग्यदायी म्हणून गुळाचा चहा सारखा पित राहातात. त्याचा परिणाम उलटा होवून वजन वाढतं. कारण गुळात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. जितक्या जास्त वेळा गुळाचा चहा घ्याल तितक्या जास्त कॅलरीज शरीरात जातात.
4. 10 ग्रॅम गुळात 9.7 ग्रॅम साखर असते. त्यामुळे जास्त वेळा गुळाचा चहा घेतल्यास रक्तातील साखर वाढण्यास गुळाचा चहा कारणीभूत ठरतो.
Image: Google
गुळाचा चवदार-असरदार चहा कसा करणार?
गुळाचा चहा करण्यासाठी 3-4 मोठे चमचे किसलेला गूळ, 1 चमचा चहा पावडर, थोडी वेलची, 1 छोटा चमचा बडिशेप, अर्धा चमचा कुटलेले काळे मिरे आणि आवडत असल्यास अर्धा कप दूध. हा चहा दूध न घालता पिणं जास्त फायदेशीर मानलं जातं.
गुळाचा चहा करताना एका भांड्यात 1 कप पाणी गरम करावं. त्यात वेलची, बडिशेप, कुटलेले काळे मिरे आणि चहा पावडर घालावी. हे सर्व साहित्य घालून झाल्यावर पाण्याला चांगली उकळी येवू द्यावी. चहा उकळला की त्यात दूध घालावं. दूध घातल्यानंतर पुन्हा चहाला उकळी काढावी. कपामधे किसलेला गुळ घालावा आणि कपात गरम चहा गाळून घ्यावा. चमच्याने हलवून चहातला गूळ विरघळून घ्यावा. हा चहा मस्त गरम गरम प्यावा.