How To Make Methi Ladu: थंडी वाढली की सांधेदुखीचा त्रास जाणवतो तो फक्त प्रौढांनाच असं नाही तर पोषणमुल्यांच्या अभावाने हा त्रास आता तरुण वयातल्या मुला-मुलींनाही होतो आहे. तसेच स्तनदा माता यांना तर थंडीत कंबरदुखी, पाठदुखी यांचा त्रास होतो. बाळंतपणानंतर जर नीट काळजी घेतली नाही तर मात्र पुढे संधीवाताचा त्रास होवू शकतो. हा उपाय फक्त औषधं घेऊन होत नाही. असा उपाय तात्पुरता ठरतो. थंडीत सांधेदुखीचा त्रास होत असल्यास, हाडंकाडं दुखत असल्यास किंवा भविष्यात संधिवातासारखा त्रास होवू नये म्हणून प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मेथीचे लाडू करायचे आणि खायचे. मेथीचे लाडू हा सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे . या मेथीच्या लाडूतून शरीराला पोषक मूल्यं आणि हवी असलेली ऊब मिळते.
Image: Google
कडू न लागणारे मेथीचे लाडू कसे करणार?
मेथीचे लाडू तयार करण्यासाठी 100 ग्रॅम मेथ्या, अर्धा लिटर दूध, 300 ग्रॅम कणिक, 250 ग्रॅम साजूक तूप, 100 ग्रॅम डिंक, 30-35 बदाम, 300 ग्रॅम गूळ किंवा साखर, 8-10 काळी मिरी, 2 लहान चमचे जिरे पावडर, 2 लहान चमचे सूंठ पूड, 10 वेलच्या, 4 तुकडे दालचिनी आणि 2 जायफळ घ्यावीत.
मेथीचे लाडू तयार करताना आधी मेथ्या निवडून घ्याव्यात आणि मेथ्या मिक्सरमधे बारीक वाटून घ्याव्यात. वाटलेली मेथी किमान 12 तास दुधात भिजत ठेवाव्यात. बदाम कापून घ्यावेत. काळी मिरी, वेलची, जायफळ बारीक वाटून घ्यावेत. कढईत अर्धा वाटी साजूक तूप घालून त्यात दुधात भिजवलेली मेथी पूड तळून घ्यावी. वाटलेल्या मेथ्या तुपात तळताना गॅसची मध्यम आच हवी. मेथीपूडचा रंग हलकासा तपकिरी होईपर्यंत त्या तळाव्यात. मेथीपूड तळली गेली की ती बाजूला काढून ठेवावी. उरलेल्या तुपात डिंक फुलवून घ्यावा. तोही बाजूला ठेवावा. त्याच कढईत उरलेले तूप घालून कणिक भाजावे. कणिकही हलकीशी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर भाजावी.
Image: Google
एका कढईत एक चमचा तूप घालावं. ते तापलं की त्यात चिरलेला गूळ घालून तो वितळून घ्यावा. गुळ वितळला की यात जिरेपूड, सूंठ पूड, बारीक चिरलेले/ मिक्सरमधे ओबडधोबड बारीक केलेले बदाम, काळी मिरी, दालचिनी, जयफळ आणि वेलची यांची पूड घालावी. गुळाच्या पाकात हे सर्व चांगलं मिसळून घ्यावं. नंतर त्यात तळलेली मेथीची पूड, भाजलेली कणिक आणि तळलेला डिंक मिक्सरधून थोडा फिरवून यात घालावा.
Image: Google
हे सर्व मिश्रण हातानं किंवा मोठ्या चमच्यानं चांगलं हलवून आणि मिसळून घ्यावं. आपल्या लहान मोठे ज्या आकाराचे लाडू आवडतात त्याप्रमाणे मिश्रणाचे लाडू वळावेत. हा लाडू रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरतो. यामुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं शिवाय थंडीच्या दिवसात हा लाडू रोज खाल्ल्यास कंबरदुखी, सांधेदुखी आणि पाठदुखी या दुखण्यांवर खूप आराम मिळतो. भविष्यात होणारा सांधेदुखीच्या समस्येचा धोका या मेथीच्या लाडूच्या सेवनानं टळतो. अशा प्रकारे केलेलाअ मेथीचा लाडू कडूही लागत नाही अगदी लहान मुलं देखील चवीनं हा लाडू खाऊ शकतात. हे लाडू शक्तीवर्धक असतात. थंडीचा मुकाबला करण्यास आवश्यक असणारी ऊब शरीराला देतात. यामुळे गार हवा लागून होणारी सर्दीही बरी होते. किंवा वारंवार सर्दी होत असल्यास मेथीच्या लाडूच्या सेवनानं हा त्रास खूप कमी होतो.