वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला ओट्स खाणं हा उत्तम पर्याय आहे. ओट्स फक्त नाश्त्यालाच खावेत असा काही नियम नाही. ते सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्री हलका फुलका आहार म्हणूनही खाता येतात. ओट्समधे फायबर,मॅग्नेशियम, कॉम्पलेक्स कर्बोदकं असतात. ओट्सअसतील तर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. जास्त खाण्याचा मोह टळतो. ओट्स अशा प्रकारे वजन कमी करायला मदत करतात.
ओट्स हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असला तरी नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ओट्सचा ढोकळा करावा. ओट्सच्या ढोकळा म्हणजे कमी उष्मांक असलेला चविष्ट पदार्थ आहे. आतापर्यंत बेसन, तांदळाचं पीठ, रवा यांचा वापर करुन होणारा ढोकळा आपण खाल्ला असेल पण ओट्सचा ढोकळा हा नेहेमीच्या ढोकळ्यांपेक्षा चवीला छान आणि पचायला उत्तम आहे.
Image: Google
कसा करायचा ओट्सचा ढोकळा?
ओटसचा ढोकळा करण्यासाठी अर्धा कप ओटसची पावडर , अर्धा कप दही, अर्धा कप रवा, अर्धा चमचा किसलेलं आलं, अर्धा कप उकडलेल्या मिक्स भाज्या, चवीनुसार मीठ, एक चमचा फ्रूट सॉल्ट, एक मोठा चमचा तेल, चिमूटभर हिंग, मोहरी, 4 बारीक कापलेल्या मिरच्या, तीळ, चिरलेली कोथिंबीर, आणि एक कप पाणी घ्यावं.
Image: Google
ओट्सचा ढोकळा करण्यासाठी ओटस हे मिक्सरमधून बारीक करुन त्याची पावडर करुन घ्यावी. रवा भाजून घ्यावा. एका भांड्यात ओट्स पावडर, रवा, मीठ, आलं , दही, पाणी घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. नंतर त्यात फ्रूट सॉल्ट घालून तेही चांगलं मिसळून घ्यावं. या मिश्रणाला फेस येईपर्यंत ते फेटावं. नंतर एक ताटली घ्यावी. तिला तेल लावावं. नंतर फेटलेलं मिश्रण ताटलीत ओतावं. हे मिश्रण 10-12 मिनिटं वाफवून घ्यावं.
ढोकळा थोडा थंड झाला की त्याचे तुकडे करावे. या ढोकळ्यावर तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग , मिरच्या , तीळ घालून त्याचा तडका द्यावा. चिरलेली कोथिंबीर ढोकळ्यावर पेरावी. हा ढोकळा कोथिंबीरच्या चटणीसोबत छान लागतो.