-अर्चना रायरीकर
पाणी आपल्या रोजच्या आहारातील आणि जीवनातील एक प्रमुख अंग आहे. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालतं पण पाणी नाही मिळालं तर आपला जीव कासावीस होतो आणि खूप तहान लागल्यावर दोन घोट माठातील थंडगार पाणी पिण्याचा जो आनंद आहे तो कशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे . जेवल्यानंतर किंवा काही खाल्यानंतर आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं. असं का?
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरात ६० ते ६५ टक्के पाणी आहे पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियं आणि प्रत्येक पेशींना पोषक द्रव्यं पोहचवतं. म्हणजेच वहनाचं काम करतं.
आपल्या प्रत्येक पेशीला प्राणवायू पोहचवणं आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम देखील पाणी करतं.
रोज अगदी फार कष्टाचं काम नाही केलं तरी घामावाटे,त्वचेवाटे,उत्सर्जनामुळे शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.जी माणसं भारतासारख्या उष्ण प्रदेशात राहतात अशा ठिकाणी शरीरावाटे पाणी बाहेर पडण्याचं प्रमाण अजूनच जास्त असतं.चहा-कॉफी काही औषधं,अल्कोहोल आणि कोलायुक्त पेयं यामुळेही शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.
तहान लागली की आपण पाणी पितोच पितो, पण बरेचदा तहान लागण्या आधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे ते आपली वय,शारीरिक श्रम,भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचं तापमान यावर अवलंबून असतं .साधारणपणे २५ किलो मागे १ लिटर पाण्याची गरज असते.
पाणी कमी प्यायलं तर..
पाणी हे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. शरीराला पाणी कमी पडलं की त्याची लक्षणं दिसायला लागतात, जसं की थकल्यासारखं वाटणं आणि शरीरात उर्जेचा अभाव असणं ,हातापायात पेटके येणं इत्यादी!
परत येथे तुम्ही कुठल्या वातावरणात काम करता ( एसी ) किती शारीरिक श्रम करता या अनेक गोष्टीवर अवलंबून आहे.पाणी पुरेसं प्यायलं की लघवीचा रंग सफेद किंवा फिकट पिवळा राहतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ नीट बाहेर टाकले जातात.
अनेकदा लोक विशेष करून स्त्रिया बाहेर स्वच्छता गृहांची चांगली सोय नसल्यानं पाणी प्यायचंच टाळतात,तर काही व्यक्ती पाणी पिणं आणि स्वच्छतागृहात जाणं या दोन्ही गोष्टींचा कंटाळा करतात.यामुळे कधी कधी गंभीर त्रास जसे की किडनी स्टोन्स होऊ शकतात.
व्यायाम करणाऱ्या लोकांना ते किती वेळ व्यायाम करत आहेत आणि किती जोरात व्यायाम करत आहेत ,घाम गाळत आहेत यावर पाण्याचं प्रमाण ठरतं.
पाणी आणि पेयं
शरीराला लागणारं पाणी हे केवळ आपल्या पिण्याच्या पाण्यातून येत नाही तर अनेक पर्यायातून आपल्याला ते मिळतं.जसं की आपल्या रोजच्या आहारातून किंवा खाण्यातून आपल्याला एकूण पाण्यापैकी २०टक्के पाणी मिळतं.बाकीचं पिण्याच्या पाण्यातून आणि इतर तरल पदार्थ जसे की फळांचा रस ,ताक वैगेरेतून आपल्याला पाणी मिळतं . काही फळं आणि भाज्या जसं की टोमॅटो,कलिंगड यात निसर्गतःच पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं .
आपल्या रोजच्या आहारातील काही पेयं आणि त्यांचे गुणविशेष
१. पाण्याला पर्याय नाही! पिण्याचं पाणी हे ( सध्या तरी ) आपल्याला सहजासहजी मिळू शकतं.
२.चहा/कॉफी- बऱ्याच जणांची सकाळ चहा कॉफीने होते. ही उत्तेजक पेयं असून त्यांच्या अतिरेकानं पित्त होतं आणि खूप साखरही पोटात जाऊ शकते.यात टॅनीन आणि कॅफिन असतं. यात विशेष करून ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडण्टसचं प्रमाण मात्र लक्षणीय असतं.
३.दूध- आपण दररोज गायीचं किंवा म्हशीचं दूध पितो.दुधामध्ये उत्तम दर्जाच्या प्रथिनांखेरीज कॅल्शियम असतं.याखेरीज हा असा एक शाकाहारी (प्राणीजन्य असला तरी) पदार्थ आहे आणि जीवनसत्व ब १२ असतं जे इतर कुठल्याही शाकाहारी पदार्थात मिळत नाही.
४.ताक-दुधामध्ये लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते जी बऱ्याच जणांना पचत नाही . दुधाचं दही लावल्यानंतर ताक केल्यामुळे आंबवण्याची जी क्रिया होते त्यामुळे या लॅक्टोजचं रुपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि ते पचण्यास सोपं होतं. याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो.याचा उपयोग पोटात आरोग्यदायी जीव जंतूंची पैदास होण्यात आणि त्यामुळे चांगलं पचन आणि जीवन सत्वाचं उत्तम अभिशोषण यासाठी होतो.शिवाय यात दुधापेक्षा फॅट्सचं प्रमाण देखील कमी असतं.ताकासारखेच सोया मिल्कमधे देखील लॅक्टोज नसतं आणि ज्यांना लॅक्टोजची ॲलर्जी आहे त्यांना हे चांगलं असतं.
५.फळांचा रस - फळं चावून खाणं हे फळांचा रस पिण्यापेक्षा खरतर जास्त चांगलं कारण फळांमध्ये जास्त तंतुमय पदार्थ असतात.पण सरबत ,कोलायुक्तपेयणं यापेक्षा फळांचा नैसर्गिक रस पिणं कधीही चांगलं! यात पोषक तत्वं भरपूर असतात.यात कृत्रिम साखर घालणं आणि
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील रस पिणं टाळलेलं बरं ! कधीतरी मग टेट्रा पॅकमधील ज्यूस प्यालेलं बरं!
६.शहाळ्याचं पाणी -याला नैसर्गिक सलाइन असं म्हटलं जातं. यात अनेक क्षार असतात.यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फॅट्सही नसतात.शिवाय नारळातून हे प्यायला सेफ असतं आणि यामुळे लघवीला साफ होतं आणि युरीन इन्फेक्शन होत नाही .
७. नीरा- ही ताडीपासून मिळवली जाते.यात नैसर्गिक गोडवा असतो आणि अनेक क्षार असतात.
८.भाज्यांचं सूप - विविध भाज्या वापरून त्या उकडून त्याचं सूप करता येतं.शक्यतो सूप गाळू नये,त्यात अजिनोमोटो ,क्रीम,बटर ,मक्याचं पीठ आणि तत्सम पदार्थ वापरू नयेत.त्यात मिरीपूड,जीरा पूड,आलं आणि थोडंसं मीठ वापरावं.सूप बनवलं की लगेच प्यावं परत परत उकळू नये.
९.कोलायुक्त पेय- यात साखर आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे हाडांतील आणि दातातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन त्यांना नुकसान होऊ शकतं.
१०.उसाचा रस -रसायनयुक्त आणि केवळ कॅलरिज व्यतिरिक्त कुठलंही पोषक तत्व नसलेल्या पांढऱ्या साखरेपेक्षा हे नक्कीच चांगलं. कारण त्यात नैसर्गिक साखर असते.यात अनेक क्षार असतात.बाहेर मिळणाऱ्या उसाच्या रसात अनेक मार्गांनी जसे की मशीन,हात,बर्फ यामाध्यमातून जीवाणू शिरू शकतात.त्यापेक्षा उस चावून त्याचा रस चोखता आला तर फारच छान!
११.कैरीचं पन्हं- हे एक नैसर्गिक कुलिंग ड्रिंक आहे. यात काही जीवनसत्त्वं, पोटॅशियम सारखे खनिजं आणि इतर क्षार असतात म्हणजे हे नैसर्गिक इलेक्ट्रॉलाईटच असतं. साखरेपेक्षा गूळ घालून केलं तर उत्तम. यामुळे हिट स्ट्रोक आणि डी हायड्रेशन पासून रक्षण होतं.
१२.कोकम सरबत - हिट स्ट्रोक आणि डी हायड्रेशन , पित्त आणि डोकेदुखीसाठी चांगलं शिवाय पाचक देखील असतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची भांडी, मटका यातलं पाणी उत्तम. प्लॅस्टिक नकोच त्यातल्या त्यात तांबं, स्टील चालेल
( लेखिका आहार तज्ज्ञ आणि सत्त्व आहार सल्ला केंद्राच्या संचालक आहेत.)