Join us  

वजन कमी करायचं आणि फिटही राहायचं तर नागली खा! तज्ज्ञ सांगतात, नागली आणि वेटलॉसचं खास गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2022 3:59 PM

आरोग्यदायी पध्दतीनं वजन कमी (weight loss) करण्यासाठी आहारात नागलीच्या पदार्थांचा ( finger millet for weight loss) अवश्य समावेश करावा असं तज्ज्ञ सांगतात ते का?

ठळक मुद्देवजन कमी होण्यासाठी आणि आरोग्यास फायदा होण्यासाठी नागलीचे पदार्थ हे सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी जेवणात खावेत.नागलीचे पदार्थ खाल्ल्यानं भूक शांत होते.वजन कमी करण्यासाठी मिठाया खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो, पण नागलीच्या पिठाचे लाडू हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. 

वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा (diet for weight loss)  समावेश करावा असा प्रश्न आहार तज्ज्ञांना नेहेमी विचारला जातो. विशेषत: गव्हाच्या पोळीला पर्याय काय असा मुख्य प्रश्न असतो. याबाबत मार्गदर्शन करताना दिल्लीतल्या 'होली फॅमिली हाॅस्पिटल'च्या सनाह गिल यांनी नागलीचा पर्याय ( finger millet for weight loss)  सांगितला आहे. त्यांच्या मते आहारात नागली असल्यास वजन कमी होण्यासोबतच पोषण आणि आरोग्याचीही हमी मिळते. नागलीमुळे वजन कमी होण्यास, नियंत्रित होण्यास कशी मदत होते (how finger mileet helps to loose weight) याबाबत सनाह गिल यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.

Image: Google

नागलीत नेमकं असतं काय?

नागलीमध्ये अमीनो ॲसिड, प्रथिनं, आरोग्यदायी कर्बोदकं ही पोषक तत्वं भरपूर प्रमाणात असतात. ड जीवनसत्वासाठी आहारात नागली असणं आवश्यक आहे. नागलीच्या सेवनानं शरीरातील ड जीवनस्त्वाची कमतरता दूर होते. तसेच नागलीमध्ये क, ई ही जीवनसत्वं आणि कॅल्शियम, लोह ही खनिजं प्रामुख्यानं असतात. नागलीमध्ये 15 ते 20 टक्के डायटरी फायबर असतं.नागलीमुळे वजन कसं कमी होतं याबाबत सनाह गिल सांगतात की, नागलीमध्ये ट्रिपटोफन नावाचं अमिनो ॲसिड असतं. नागलीचे पदार्थ खाल्ल्यानं भूक शांत होते. म्हणूनच नागलीचे पदार्थ खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. नागलीमध्ये फायबर आणि पाॅलीफेनाॅल हे घटक असतात. या घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.  नागलीमुळे रक्तदाबही नियंत्रणात राहातो. मधुमेह, हायपर टेन्शन सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. 

Image: Google

वजन कमी होण्यासाठी आणि आरोग्यास फायदा होण्यासाठी नागलीचे पदार्थ हे सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी जेवणाला खावेत. रात्री नागलीचे पदार्थ खाऊ नये. कारण यामुळे गॅसेसची समस्या निर्माण होते. नागलीमध्ये प्रथिनं आणि कर्बोदकं असतात. त्यामुळे नागलीचे पदार्थ सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image: Google

नागलीचा विविध प्रकारे आहारात समावेश केला जातो. भाकरी, नागलीचा डोसा, आप्पे, नागलीची पेज, नागलीची खिचडी, इडली, नागलीच्या पिठाचा पॅनकेक , नागलीचे लाडू असे विविध पदार्थ केले जातात. जेवणात नागलीचा भाजलेला पापड, नागलीच्या पापडाची चटणी यांचा समावेश करावा. नागलीच्या सर्व पदार्थात नागलीची भाकरी आणि नागलीचे लाडू अधिक पौष्टिक असतात. 

Image: Google

नागलीचे लाडू कसे करावेत?

वजन कमी करण्यासाठी मिठाई खाऊ नका असा सल्ला सर्वसामान्यपणे दिला जातो. पण वजन कमी करण्यासाठी नागलीचे लाडू अवश्य खा असं सनाह गिल सांगतात. नागलीच्या पिठाचे लाडू करणं अतिशय सोपं आहे.  यासाठी आपल्या प्रमाणानुसार नागलीचं पीठ घ्यावं. तूप गरम करुन त्यात नागलीचं पीठ खमंग भाजावं. भाजलेल्या नागलीच्या पिठात बदाम, काजू, अक्रोड यांची पावडर करुन मिसळावी. या मिश्रणात चवीनुसार गूळ घेऊन तो तुपात विरघळून घ्यावा. विरघळलेला गूळ पिठात कालवून त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. काही गोड खाण्याची इच्छा झाल्यास वजन वाढण्यास कारणीभूत ठरतील अशा मिठाया न खाता नागलीचे लाडू खाणं हा आरोग्यदायी प्रकार असून वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गोड खाण्याचा सुरक्षित मार्ग आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजना