गोड पदार्थ हा अनेकांसाठी वीक पॉईंट असतो. एरवी गोडावर ताव मारणं वेगळं पण काहींना रोजची कामं करत असताना अचानक काहीतरी गोड खावसं वाटतं. कधीतरी कामाचा ताण घालवण्यासाठी कधी जेवण झाल्यावर किंवा काहींना तर अगदी रात्री झोपतानाही काहीतरी गोड खाऊन झोपण्याची सवय असते. गोड आवडणं ठिक आहे पण सतत गोड खायची इच्छा होत असेल तर मात्र त्यामागे काही नेमकी कारणं असू शकतात. वेळीच या कारणांचा शोध घ्यायला हवा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सतत गोड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. तसेच डायबिटीस, दाताचे विकार यांसाठीही गोड खाणे चांगले नसते (How To Control Sweet Cravings).
आपण रोज ६ चमचे गोड खात असू तर आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसते. यामुळे भविष्यात विविध तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. आता असं सतत गोड का खावसं वाटतं. तर प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रिधिमा बत्रा गोड खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात आणि जीवनशैलीत काय बदल करायचे याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. पाहूयात गोड कमी करण्यासाठी सहज करता येतील असे उपाय..
१. रक्तातील साखरेचे प्रमाणाचा समतोल
दिवसभर आपण ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करतो. या प्रत्येक मिलमध्ये प्रोटीन, भाज्या आणि कार्बोहायड्रेटस आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश असायला हवा. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार नाही.
२. आतड्यातील मायक्रोबायोम सुधारा
आतड्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्मजंतुंमुळे सतत गोड खाण्याची इच्छा होते. पण अशावेळी आपण जास्त गोड खाल्ले तर अनावश्यक बॅक्टेरीयांची वाढ होते. त्यामुळे ताक, दही, लोणचं, आंबवलेले पदार्थ यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवा.
३. शरीरात काही कमतरता नाही ना तपासा
झिंक, क्रोमियम, आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची शरीरात कमतरता नाही ना तपासा. आहारातून शरीराला जास्तीत जास्त घटक मिळतील असे पाहा. यासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४. ताणावर नियंत्रण ठेवा
आपण जेव्हा ताणात असतो तेव्हा आपल्या शरीरातील कोर्टीसोलची पातळी वाढते. त्यामुळे आपल्याला भूक लागते आणि गोड खावेसे वाटते. अशावेळी मटार, तीळ, ब्रोकोली, बदाम, पिस्ते, जवस, बेरीज यांचा आहारात समावेश ठेवावा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
५. पुरेशी झोप
तुम्ही ८ तासापेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमच्या शरीरातील भुकेचे हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे नकळत तुम्ही जास्त प्रमाणात खाता. त्यामुळे तुम्हाला नियमितपणे शांत ७ ते ९ तासांची झोप मिळते की नाही याकडे लक्ष द्या.