आपण जाड झाले म्हणतो म्हणजे शरीराच्या ठराविक भागांवर चरबी जमा व्हायला लागते. काहींची कंबर वाढते तर काहींचा माड्यांचा भाग वाढतो. मात्र वजन वाढणे म्हटल्यावर बहुतांश जणांचा पोटाचा भाग वाढायला लागतो. पोट एकदा वाढलं की ते कमी करणं म्हणजे मोठा टास्क असतो. महिलांमध्ये तर वाढलेले पोट म्हणजे सौंदर्यात बाधा आणणारी एक महत्त्वाची गोष्ट असते. पोट वाढले की ना फॅशनेबल कपडे घालता येतात ना आणखी काही. पोटाचा भाग वाढल्याने शरीर बेढब दिसायला लागते आणि मग अनेकदा आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता असते (How To get Rid From Belly Fat Fitness Tips).
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या शरीरात मेद आणि चरबी वाढत जाते. अनेकदा पोट, कंबर या भागांतील चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. वाढलेले पोट चांगले तर दिसत नाहीच पण आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसते. कधी बेल्ट वापरुन तर कधी कोणी सांगितलेले डाएट करुन आपण वाढलेला पोटाचा भाग कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण ही जमा झालेली चरबी कमी व्हायला बराच वेळ लागतो. पोट कधी कधी इतके वाढते की ते खालच्या बाजुने लोंबायला लागते. हे लटकणारे पोट कमी करण्यासाठी दिवसातून फक्त १० मिनीटं काढली तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. या १० मिनीटांत नियमितपणे कोणत्या व्याायम करायचे पाहूया...
१. पायाच्या टाचा मागच्या बाजूने सीटच्या भागाला लावण्याचा प्रयत्न करणे. दोन्ही पायांवर नीट उभे राहून एकदा एक पाय आणि मग दुसरा पाय अशा पद्धतीने दोन्ही पाय मागच्या भागाला लावावेत. एकावेळी किमान ३० सेकंद असे ४ राऊंड सलग केल्यास शरीरावर जमा झालेले अनावश्यक फॅटस जळण्यास चांगली मदत होते.
२. हात कोपरापासून जमिनीला समांतर ठेवावेत. पाय काटकोनात वर घेऊन गुडघा आणि मांडीचा भाग हाताला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हे करायला सोपे वाटत असले तरी काही सेकंद केल्यानंतर आपल्याला दम लागतो. मात्र नियमितपणे हे केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
३. उडी मारुन कंबरेतून खाली बसणे आणि मग पटकन वर उठणे. हे शक्य तितक्या वेगाने करावे. यामुळे सीट आणि पोटाचा भाग कमी होण्यास मदत होते. यावेळी हातांचीही मूव्हमेंट होईल असे पाहावे, म्हणजे शरीर स्विंग करणे सोपे जाते. एकावेळी २० वेळा असे किमान ४ राऊंड तरी करायला हवेत.