Join us  

वजन कमी करायचं तर स्वत:ला लावून घ्या ५ सोप्या सवयी; पाहा स्वत:त झालेला सुंदर बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 9:51 AM

How To loose weight Quickly Follow Simple Eating Habits : सगळ्यांनीच आरोग्यदायी राहावे आणि चांगले आयुष्य जगावे यासाठी काही किमान सवयी लावून घ्यायला हव्यात

ठळक मुद्देज्या लोकांना वजन वाढण्याची समस्या असते असे लोक इतर लोकांच्या तुलनेत अन्न कमी चावतात. झोपण्याच्या ३ तास आधी खायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

आपला आहार आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यांचा आपल्या आरोग्यावर खूप परीणाम होत असतो. हल्ली खूप बारीक असणे किंवा खूप लठ्ठ असणे अशा समस्या सर्रास दिसून येतात. कामाचे ताण, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांचा आरोग्यावर चुकीचा परीणाम झालेला दिसून येतो. लहानपणापासून आपल्याला खाण्याच्या बाबत योग्य त्या सवयी नसतील तर मोठेपणी या सवयी लागणे अवघड होऊन बसते. अनेकदा लहानपणी चांगल्या सवयी असतात पण कॉलेजला गेलो किंवा शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर राहायला लागलो की आपल्या खाण्याच्या वेळा, पद्धती आणि एकूणच पॅटर्न बदलतो. यामुळे लठ्ठपणा, पाळीच्या तक्रारी, अपचनाच्या तक्रारी यांसारख्या समस्या वारंवार भेडसावतात. इतकेच नाही तर यातून भविष्यात डायबिटीस, हृदयरोग किंवा आणखी काही तक्रारींचा सामना करण्याची वेळ येते. मात्र असे होऊ नये आणि आपण सगळ्यांनीच आरोग्यदायी राहावे आणि चांगले आयुष्य जगावे यासाठी काही किमान सवयी लावून घ्यायला हव्यात, या सवयी कोणत्या ते पाहूया (How To loose weight Quickly Follow Simple Eating Habits)...

(Image : Google)

१.  काय आणि किती खावं ? 

वजन कमी करायचं म्हणून आपण अनेकदा मनानेच कमी खातो. पण असे केल्याने आपल्या शरीराचे पोषण होत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी योग्य त्या प्रमाणात खाल्ल्या तर तब्यात चांगली राहते. याबरोबरच प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेटस, स्निग्ध पदार्थ अशा सगळ्या गोष्टी आहारात योग्य प्रमाणात असायला हव्यात.

२. खाताना केवळ खाण्यावर लक्ष हवं..

हल्ली आपण इतके घाईत असतो की खातानाही आपण कधी फोनवर बोलणे, लॅपटॉपवर काम करणे, मोबाईलवर मेसेज टाईप कऱणे अशा गोष्टी करत असतो. इतकेच नाही तर आपण संध्याकाळी घरी आल्यावर रिलॅक्स असू तर आपण टिव्ही पाहत किंवा काहीतरी ऐकत खातो. यामुळे आपले जेवणावरचे लक्ष विचलित होते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो, हे योग्य नाही. 

३. रात्री उशीरा खाणे 

सध्या आपल्या कामाच्या पद्धती, जीवनशैली सगळेच खूप बदलले असल्याने त्याचा आपल्या आहार-विहारावर परिणाम होतो. रात्री उशीरापर्यंत चालणारे काम, त्यामुळे उशीरा जेवणे, जागरणे आणि त्यामुळे जेवण झाले तरी मध्यरात्री काहीतरी खाण्याची इच्छा होणे याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. उशीरा खाल्ल्याने शरीराला खाल्लेल्या गोष्टी पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, त्याचा पचनशक्तीवर ताण येतो. त्यामुळे झोपण्याच्या ३ तास आधी खायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

४. अन्न नीट चावून खावे

वजन कमी करायचे असेल तर अन्न नीट चावून खायला हवे. यामुळे आपण किती कसे खातो यावर आपले नियंत्रण राहते. त्यामुळे नकळत वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या लोकांना वजन वाढण्याची समस्या असते असे लोक इतर लोकांच्या तुलनेत अन्न कमी चावतात. 

५. बाहेरचे पदार्थ खाऊ नका 

बाहेरचे पदार्थ आपल्या सगळ्यांच्याच जीभेला चांगले लागतात. मात्र ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतात. जंक फूड, तळलेले पदार्थ यांमुळे आरोग्याला हानी पोहोचते. हे वेळीच लक्षात घेऊन कमीत कमी बाहेरचे खाणे केव्हाही चांगले. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइलआरोग्य