Join us

चेहऱ्यावरचा ग्लो न घालवता वजन कसं कमी कराल? सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांनी सांगितला खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:44 IST

Weight Loss Tips: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकदा ही समस्या बघायला मिळते की, काहींचं वजन कमी होण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होतो.

Weight Loss Tips: करीना कपूर सोबतच बॉलिवूडमधील कितीतरी सेलिब्रिटींच्या डायटिशिअन ऋजुता दिवेकर सोशल मीडियावर नेहमीच फिटनेससंबंधी वेगवेगळ्या टिप्स देत असतात. सेलिब्रिटींच्या स्लीम फिगरचं रहस्य त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे इतर लोकही त्यांच्या टिप्स फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय सांगितले आहे. जे तुम्ही जर योग्य पद्धतीनं फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

आता चेहऱ्यावरील ग्लो न गमावता वजन कसं कमी कराल, याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकदा ही समस्या बघायला मिळते की, काहींचं वजन कमी होण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होतो. अशात असं होऊ नये म्हणून काय करावं ते जाणून घेऊया.

ग्लो न गमावता वजन कमी करण्याचा फंडा

ऋजुता दिवेकर सांगतात की, अनेकदा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला किंवा तरूणी त्यांना विचारतात की, चेहऱ्याचा ग्लो कमी न होऊ देता वजन कसं कमी करता येईल? वजन कमी करत असताना चेहराही बारीक होतो, पोट फुगतं आणि आर्म्स जाड दिसू लागतात. अशात ऋजुता त्यांच्या क्लाएंट्सना काही टिप्स देतात.

किती दिवसांचं ठेवाल टार्गेट?

ऋजुता सांगतात की, असे व्हिडीओ आणि सल्ल्यांपासून दूर रहा ज्यात २० दिवसात १० किलो वजन कमी केल्याचं दाखवलं जातं. त्याऐवजी अशा व्हिडिओंवर लक्ष द्या ज्यात १ वर्षात १० किलो वजन कमी करण्याचा फंडा सांगितला आहे. एक संतुलित वेग ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्ही एका वर्षात ५ ते १० टक्के वजनही कमी केलं तरी तुमची फिटनेस चांगली राहील आणि चेहऱ्याची चमकही जाणार नाही.

किती एक्सरसाईज?

वजन काही झटपट कमी होत नसतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घाई किंवा महिन्यातील ३० चे ३० दिवस एक्सरसाईज करण्याच्या फंद्यात पडू नका. उलट महिन्यातील ७ दिवस किंवा कधी २० दिवसही एक्सरसाईज केली तरी चालू शकतं. 

संतुलित आहार

ऋजुता दिवेकर सांगतात की, कार्ब्स किंवा शुगर कमी करण्याऐवजी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि सोबतच पॅकेट फूड टाळायला हवेत. असं केल्यास वजन कमी होईल आणि चेहऱ्याचा ग्लो सुद्धा कायम राहील.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स