रोज तेच तेच रुटीन झालं की कधीतरी असा कंटाळा येतोच.. त्या दिवशी असं वाटत असतं की काहीच करू नये. अगदी टीव्ही बघायला, आवडती गाणी ऐकायलाही नको वाटतं. झोप काढावी तर ती ही येत नाही. खरंतर त्यामागे कारण काहीच नसतं, पण उगाच अस्वस्थ, उदास (depression), एकटं- एकटं (loneliness) वाटू लागतं. सुटीच्या दिवशी असा झटका आला, तर एकवेळ चालण्यासारखं आहे. पण रोजच्या कामात असा थकवा, असा आळस येणं अजिबातच परवडण्यासारखं नसतं. म्हणूनच तर जेव्हा केव्हा असं डाऊन, लो (feeling very low or down) वाटायला लागेल, तेव्हा तुमच्या शरीराला काही हॅप्पी हार्मोन्सची प्रकर्षाने गरज आहे, हे ओळखा.
कधी कधी असं का होतं याविषयी आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज यांनी HT Digital यांच्याशी बोलताना सांगितलं की आपला मूड, आनंद या गोष्टींचा आणि आपल्या शरीरात स्त्रवणाऱ्या हार्मोन्सचा जवळचा संबंध असतो. त्याच हार्मोन्सला बोली भाषेत आपण हॅप्पी हार्मोन्स म्हणून ओळखतो. सेरोटोनिन serotonin, एण्डोर्फिन्स endorphins, डोपामाईन dopamine आणि ऑक्सिटोसिन oxytocin हे ते चार हॅप्पी हार्मोन्स आहेत. हे चार हार्मोन्स आपल्या शरीरात सकारात्मक विचार आणण्यास, आपलं मन आनंदी, उत्साही ठेवण्यास आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करतात. काही अन्न पदार्थांमधूनही आपल्याला हे हॅप्पी हार्मोन्स मिळू शकतात. त्यासाठीच मूड ऑफ असल्यावर काही पदार्थ आवर्जून खावेत.
हॅप्पी हार्मोन्स देणारे पदार्थ
१. पाणी
रोजच्या रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर नक्कीच त्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याच्या आधी पाणी प्या. त्यानंतरही दिवसभर योग्य प्रमाणात पाणी घेत रहा. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि हॅप्पी हार्मोन्स स्त्रवण्यास मदत होते.
२. व्हिटॅमिन बी १२ असणारे पदार्थ
हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये अशी व्हिटॅमिन बी १२ असणारे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने डिप्रेशन, एन्झायटी असा त्रास कमी होतो.
३. सुकामेवा
बदाम, अक्रोड, सब्जा, जवस या पदार्थांमध्ये ट्रीप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ सेरोटोनिन या हार्मोनचं सिक्रिशन वाढवतो. त्यामुळे डिप्रेशनची पातळी कमी होते. त्यामुळे यापैकी काही पदार्थ तरी सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून खायला हवेत.
४. व्हिटॅमिन सी
लिंबू, संत्री, बेरी प्रकारची फळं, आवळा असे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले पदार्थही तुमचा मुड फ्रेश करण्याचे काम करतात. या पदार्थांमध्ये वेगवेगळी खनिजे, व्हिटॅमिन्स असतात. त्याच्यामुळे शरीरातील ऑक्सिटोसीनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी, निरोगी राहण्यास मदत होते.
५. डार्क चॉकलेट
कोको पावडरपासून डार्क चॉकलेट बनवले जाते. कोको पावडर एण्डोमॉर्फिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करते.
६. प्रोबायोटिक
दही, इडली- डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ, ताक असे प्रोबायोटिक पदार्थ खाल्ल्यामुळे ही मुड सुधारण्यास नक्कीच फरक पडतो.