How to makes matar shorba and nimona :- हिवाळ्यात शरीराला ऊब देणारा सूप ह प्रकार खूप हवाहवासा वाटतो. घरी सूप करायचं म्हटलं तर फार मर्यादा असते. त्यामुळे कधी कधी चविष्ट आणि आरोग्यदायी असलेल्या नेहमीच्या सूपचाही कंटाळा येतो. असं होवू नये म्हणून घरच्याघरी सूपचे वेगळे पर्याय करायला हवेत. आरोग्य आणि चव असं दोन्ही सांभाळणारा सूपचा एक प्रकार ताज्या मटारापासून तयार करता येतो. ताजे मटार हिवाळ्यात खायलाच हवेत पण मटारमधील जास्तीत जास्त पोषक घटकांचा फायदा शरीराला करुन देण्यासाठी हिवाळ्यात मटार प्यायलाही हवेत. मटार खायचे असू देत किंवा प्यायचे दोन्हीसाठी वेगळे आणि आरोग्यादायी असे पर्याय आहेत. मटार शोरबा आणि मटार निमोना. शोरबा हा प्यायचा आणि निमोना पराठे आणि भात यासोबत खाण्याचा पर्याय आहे.
Image: Google
मटार शोरबा पिल्याने ताज्या मटार दाण्यातील फायबर, ॲण्टिऑक्सिडण्टस, मॅग्नेशियम या पोषक घटकाचा आरोग्यास फायदा होतो. तसेच मटार शोरबामधे कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे तो सेवन केल्यानं वजन वाढत नाही. उलट नियंत्रणातच राहातं. तसेच ताज्या मटारमध्ये पैलिमायोएथेलेनामाइड (PEA) हा घटक असतो. हा घटक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतो. शरीरावर असलेली सूज , शरीराचा होणारा दाह शमवण्याची क्षमता या घटकात असते. तसेच या घटकामुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो. या घटकाचा फायदा मटार शोरबा सेवन केल्यानं होतो. मटार शोरबा यात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात तर आहेच शिवाय हा शोरबा चवीलाही मस्त लागतो.
Image: Google
कसा करायचा मटार शोरबा?
मटार शोरबा करण्यासाठी 2 कप उकडलेले हिरवे मटार, 1 कप उकडलेला पालक, 1 बारीक चिरलेला कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचचा जिरे, 2 तमालपत्रं, 1 वेलची, 1 छोटा तुकडा दालचिनी, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी आणि तेल आणि 1 मोठा चमचा ताजी साय किंवा क्रीम एवढं साहित्य घ्यावं.
Image: Google
मटार शोरबा करताना सर्वात आधी मटार उकडून घ्यावेत. लसूण, आलं आणि मिरची मिक्सरमधून बारीक वाटून पेस्ट करावी. पालक पाण्यातून ब्लांच करुन पालक आणि उकडलेले मटार दाणे याची एकत्रित प्युरी करावी. कढईत तेल तापवावं. तेल तापलं की त्यात जिरे, वेलची, दालचिनी, आणि तमालपत्रं टाकून ते परतून घ्यावेत. जिरे तडतडले की कांदा परतावा. कांदा परतल्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी. हे सर्व तेलात चांगलं परतून घ्यावं. नंतर यात मटार-पालकाची प्युरी घालावी. ही प्युरी फोडणीत चांगली मिसळून घ्यावी. 5 मिनिटं ती शिजू द्यावी. शोरबा आपल्याला किती घट्ट/ पातळ हवा या प्रमाणात त्यात गरम पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर मीठ घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. मिश्रणाला उकळी येवू द्यावी. नंतर गॅस बंद करुन ताजी साय घालावी. मटार शोरबा तयार करायला इतका सोपा आहे.
Image: Google
मटार निमोना
मटार निमोना हा भाजीचा प्रकार आहे. ही भाजी म्हणजे चवीची मेजवानी आहे. मटार निमोना ही भाजी पराठा , पोळी, आणि भात यासोबत छान लागते.
कसा करायची मटार निमोना
मटार निमोना करण्यासाठी 2 कप ताजे मटार दाणे, 1 कप कांद्याची पेस्ट, 2 टमाट्याची प्युरी, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद,अर्धा चमचा जिरे, 1-2 तमालपत्रं, 3 छोटी वेलची, 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल, साजूक तूप किंवा बटर आणि बारीक चिरलेले कोथिंबीर घ्यावी.
Image: Google
मटार निमोना करताना सर्वात आधी ताजे मटार दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. आलं लसूण वाटून पेस्ट करुन घ्यावी. सर्व खडे मसाले मिक्सरमधून् जरा भरड स्वरुपात वाटून घ्यावेत. कढईत साजूक तूप किंवा बटर घालून ते गरम करावं. ते गरम झालं की त्यात हिंग घालावा. लगेच बारीक केलेले मटार घालावेत. मटार घातले की ते सतत परतत राहावेत. कढईला ते चिटकेनाशे झाले की मग गॅस बंद करावा. एका दुसऱ्या कढईत तेल गरम करावं. ते गरम झालं , की त्यात तमालपत्रं घालावं. लगेच कांद्याची पेस्ट घालावी. कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की मग त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ घालावं. हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. गॅसची आच मंद ठेवावी. हे परतल्यावर त्यात टमाट्यची प्युरी घालावी. प्युरी थोडी परतून घ्यावी. नंतर त्यात परतून ठेवलेलं वाट्याण्याचं मिश्रण घालावं. हे सर्व नीट मिसळून गरजेप्रमाणे गरम पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर मंद आचेवर भाजी 15-20 मिनिटं शिजवावी. गॅस बंद करुन शेवटी वरुन चिरलेली कोथिंबीर घालून भाजीवर थोडा वेळ झाकण ठेवावं. गरमागरम पोळ्या किंवा वाफाळता भात यासोबत मटार निमोना छान लागतो.