Join us  

ॲसिडिटीने हैराण, पुदिना है ना! पुदिन्याचा चहा, सरबत, ताक आणि रायते- पित्तावर करा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2022 4:03 PM

ॲसिडिटीच्या सुरक्षित उपायांमध्ये पुदिन्याचा (mint on acidity) समावेश होतो. पुदिन्याचं सेवन केल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. ॲसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याचं सेवन 5 ( how to use mint on acidity) प्रकारे करता येतं.

ठळक मुद्देपुदिन्याचा चहा आरोग्यदायी असतो. पुदिन्यामध्ये पोट थंड ठेवणारा मेन्थाॅल हा घटक असतो.पुदिन्याचं ताक ॲसिडिटी आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.पुदिना रायता खाल्यास जेवणानंतर होणारी ॲसिडिटी कमी होते. गॅस, अपचन या समस्या दूर होतात.

ॲसिडिटीचा त्रास (acidity) बहुतेक जणांना असतो.  भरभर खाणं, नीट पचन न होणं, अयोग्य आहार आणि दोषपूर्ण जीवनशैली यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. ॲसिडिटी झाली की त्यावरची औषधं घेतल्यास तेवढ्यापुरती बरं वाटतं. पण या औषधांचे साइड इफेक्टही खूप होतात, अशा वेळी ॲसिडिटी घालवण्याचा सुरक्षित उपाय करायला हवेत.  ॲसिडिटीच्या सुरक्षित उपायांमध्ये पुदिन्याचा (mint on acidity)  समावेश होतो. पुदिन्याचं सेवन केल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. ॲसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याचं सेवन (ways to use mint on acidity) 5  प्रकारे करता येतं. पुदिन्यामुळे ॲसिडिटीचा त्रास तर कमी होतोच शिवाय आरोग्यास इतर लाभही होतात. 

Image: Google

ॲसिडिटीसाठी पुदिना कसा सेवन करावा? 

1. पुदिन्याची पानं खावी: पुदिन्याची पानं चावून खाल्ल्यानं ॲसिडिटी तर कमी होतेच शिवाय पोटाला थंडावाही मिळतो. पुदिना जिवाणुविरोधक असल्यानं पोटात जिवाणुंचा संसर्ग टाळला जातो. पुदिना चावून खाल्ल्याने पोटातील किडे तर मरतातच सोबतच मौखिक आरोग्यही सुधारतं. ॲसिडिटीवर उपाय म्हणून पुदिन्याची पानं सकाळी उपाशी पोटी चावून चावून खावी. एका वेळेस 10-12 पानं स्वच्छ धुवून खावीत.

Image: Google

2. पुदिन्याचा चहा: पुदिन्याचा चहा आरोग्यदायी असतो. पुदिन्यामध्ये पोट थंड ठेवणारा  मेन्थाॅल हा घटक असतो. यामुळे शरीराचा पीएच बॅलन्सही सुधारतो. पुदिन्याचा चहा प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि अन्न नीट पचायला मदत होते. पुदिन्याचा चहा कोणत्याही कारणानं होणारं अपचन आणि ॲसिडिटीची समस्या दूर करतं. ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास सकाळी नेहेमीच्या दुधाच्या चहाऐवजी पुदिन्याचा चहा प्यावा. पुदिन्याचा चहा तयार करण्यासाठी पुदिन्याची 10-12 पानं, छोटा अर्धा चमचा काळे मिरे, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि 2 कप पाणी घ्यावं. सर्वात आधी पाणी मंद आचेवर उकळून घ्यावं. पाणी उकळलं की त्यात पुदिन्याची पानं, मिरे आणि सैंधव मीठ घालून पाणी पुन्हा 5 मिनिटं उकळावं. नंतर चहा गाळून घ्यावा. 

Image: Google

3. पुदिना सरबत: ॲसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याचं सरबतही फायदेशीर असतं. पुदिन्यामधील मेन्थाॅल या घटकामुळे ॲसिडिटी लगेच कमी होते. छातीत होणारी जळजळ कमी होते. पुदिन्याच्या सरबतानं चयापचय क्रिया वेगवान होवून वजन कमी होण्यास मदत होते. पुदिन्याचं सरबत करण्यासाठी  1 कप पुदिन्याची पानं, 1 लिंबू, 4 चमचे साखर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ घ्यावं. आधी पुदिना स्वच्छ धुवून , निथळून घ्यावा. मिक्सरमध्ये पुदिन्याची पानं, साखर, सैंधव मीठ, भाजेलेल्या जिऱ्यांची पूड , लिंबाचा रस आणि अर्धा कप पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. वाटलेलं मिश्रण गाळून घ्यावं. ग्लासमध्ये अर्धा ग्लास पुदिन्याचं मिश्रण आणि अर्धा ग्लास पाणी मिसळून ते हलवून घेतलं की पुदिन्याचं सरबत तयार होतं. 

Image: Google

4. पुदिन्याचं ताक: पुदिन्याचं ताक ॲसिडिटी आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पुदिना ताकामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. ॲसिडिटी कमी होते. पुदिन्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुदिन्यामध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण भरपूर असतं. पुदिन्यामध्ये असलेली जीवनसत्वं पेशींचं रक्षण करतात. पुदिन्यामुळे पचनास मदत करणारे विकर निर्माण होण्यास मदत होते.  पुदिन्याचं ताक तयार करण्यासाठी दही किंवा ताक , पुदिन्याची 15-20 पानं, आल्याचा छोटा तुकडा, कोथिंबीर, भाजलेले जिरे, सैंधव मीठ, साधं मीठ, 1 हिरवी मिरची आणि 2 ग्लास पाणी (दही घेतल्यास) घ्यावं. पुदिन्याचं ताक करताना मिक्सरमधून मिरची, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र वाटून घ्यावं. नंतर हे मिश्रण ताकात घालून त्यात सैंधव मीठ, साधं मीठ, भाजलेले जिरे घालून ताक चांगलं हलवून घ्यावं. 

Image: Google

5. पुदिन्याचा रायता: पुदिना रायता खाल्यास जेवणानंतर होणारी ॲसिडिटी कमी होते. गॅस, अपचन या समस्या दूर होतात. आतड्यात पाचक स्त्राव निर्माण होण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असल्यानं ॲसिडिटीमुळे होणारी पोटातली आणि छातीतली जळजळ कमी होते. पोटाच्या स्नायुंना आराम मिळतो. चयापचय क्रिया सुधारते.  पुदिन्याचा रायता करण्यासाठी  3 वाट्या पुदिन्याची पानं, 1 किसलेली काकडी, 2 वाट्या दही, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, सैंधव मीठ, भाजलेल्या जिऱ्यांची पूड, थोडी साखर आणि थोडं साधं मीठ घ्यावं.पुदिन्याचा रायता तयार करताना पुदिन्याची पानं , कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी. मिक्सरमधून पुदिन्याची पानं वाटून घ्यावी. मोठ्या भांड्यात दही घ्यावं. दह्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा आणि टमाटा घालाव. त्यात किसलेली काकडी घालावी. जिरे पूड, चाट मसाला,  चवीनुसार सैंधव मीठ, साधं मीठ आणि साखर घालून रायता चांगला हलवून घ्यावा. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालावेत. हा रायता थोडा वेळ फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवावा. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना