वजन कमी करणे हे अनेकांपुढचे एक आव्हान असते. बैठ्या जीवनशैलीमुळे वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी मग काही ना काही उपाय आवर्जून केले जातात. व्यायाम करणे आणि आहाराचे योग्य ते नियोजन यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. व्यायामासाठी कधी जीम, चालायला जाणे, योगा, अॅरोबिक्स किंवा सायकलिंग अशा काही ना काही अॅक्टीव्हीटीज केल्या जातात. तर डायटीशियनकडून डाएट प्लॅन घेऊन डाएट फॉलो करण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे सगळे व्यवस्थित करुनही २ ते ३ महिन्यांनी आपल्याला म्हणावे तसे रीझल्ट दिसत नाहीत (Hurdles and Reasons behind in Weight Loss Process).
अशावेळी आपलं नेमकं कुठे चुकतंय आणि इतकं सगळं नीट करुनही आपलं वजन का कमी होत नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतेच असे नाही. हेच लक्षात घेऊन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी या समस्येची नेमकी कारणं सांगितली आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अंजली मुखर्जी बऱ्याच अॅक्टीव्ह असतात. इतकेच नाही तर आपल्या फॉलोअर्सना त्या नेहमी काही ना काही माहिती देण्याचाही प्रयत्न करत असतात. आताही त्यांनी अशाचप्रकारे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती शेअर केली आहे.
१. पोट साफ न होणे
आपण व्यायाम करुन आणि योग्य तो आहार घेऊनही आपले वजन कमी होत नाही याचे एक कारण पोट व्यवस्थित साफ न होणे हे असू शकते. अनावश्यक घटक पोटात राहील्याने आपले वजन जास्त भरते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
२. ताण
अनेकदा आपल्याला विविध गोष्टींचा ताण असतो. समोरुन हा ताण दिसत नसला तरी तो असतो, त्यामुळेही आपल्या वजनावर परिणाम होत असून शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे वजन कमी होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ताणाचे योग्य नियोजन करणे ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे हे समजून घ्यायला हवे.