Join us  

इडली- सांबार, रस्सम- अप्पम खाऊन वेटलाॅस होतो? बेचव कशाला खाता, चविष्ट खाऊन वजन घटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 5:30 PM

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला साउथ इंडियन पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. साउथ इंडियन म्हणजे रोज इडली डोसे खाणं नव्हे. वजन कमी करण्यास फायदेशीर आणि पौष्टिक ठरणारे भरपूर पदार्थ आहेत. 

ठळक मुद्देओल्या नारळाची चटणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर असते. अल्लम पचडी आणि वाफवलेला भात हे काॅम्बिनेशनही नाश्त्यास पोटभरीचं आणि पोषक ठरतं. पोंगल आणि सांबार ही डिश नाश्त्यास खाल्ल्याने पचनास मदत करणारे विकर वाढतात.

वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत आहाराचे नियमही पाळावे लागतात. आहाराला नियम जोडले की खाण्या पिण्याच्या आवडीला गुंडाळून ठेवावं लागतं. चवीशी तडजोड करत वजन कमी होईल या विचारानं समाधान मानावं लागतं. वजन कमी करण्यासाठी काही चविष्ट उपाय नाहीत का? असा प्रश्नही डाएटला वैतागलेले कधी गंमतीनं , तर कधी गंभीरपणे विचारतात. डाएट करताना काही चविष्ट पर्याय आहेत का? या प्रश्नाला 'हो' असंच उत्तर आहे. आवडीचं खाऊन पोट भरायला हवं आणि सोबत वजन वाढायला नको, उलट कमीच व्हायला हवं असा उद्देश  पूर्ण करणारा पर्याय म्हणजे साउथ इंडियन डाएट. अख्खा आठवडा सकाळपासून रात्रीपर्यंत न आवडणारे पदार्थ खाण्यापेक्षा रोज आवडीचा पदार्थ खाऊन आपण वजन कमी करु शकतो असं लखनऊ येथील 'वेलनेस डाएट क्लीनिक'च्या आहारतज्ज्ञ डाॅ. स्मिता सिंह सांगतात. 

Image: Google

डाॅ. स्मिता सिंह म्हणतात की, वजन कमी करताना सकाळचा नाश्ता हा खूप महत्त्वाचा असतो. नाश्त्याला आपण काय खातो यावर आपली दिवसभराची ऊर्जा आणि पचनतंत्र अवलंबून असतं. सकाळचा नाश्ता केल्यावर पोट भरण्याचं समाधान मिळवायचं असेल आणि सारखी भूक लागून चटपटीत, वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ खायचे टाळायचे असतील तर नाश्त्याला इडली  सांबार , रवा डोसा आणि नारळाची चटणी, उत्तप्पा आणि अल्लम पचडी, पुट्टू आणि रस्सम, इडिअप्पम आणि भाज्यांचं स्ट्यू, पोंगल आणि सांबार, उपमा हे पदार्थ पोषणास आणि वजन कमी करण्यास  उत्तम ठरतात. नाश्त्याला दक्षिण भारतीय पदार्थ असल्यास पोषण आणि वजन यावर सकारत्मक परिणाम कसा होतो हे सांगतांना डाॅ. स्मिता यांनी त्या त्या पदार्थांचं वैशिष्ट्य  सांगितलं आहे. 

Image: Google

1.  डोसा आणि ओल्या नारळाची चटणी 

दक्षिण भारतीय आहारात ओल्या नारळाच्या चटणीला विशेष महत्त्व आहे. इडली, डोसा, उत्तप्पा आणि आप्पे या कशासोबतही ओल्या नारळाची चटणी लागतेच आणि चालतेही. ओल्या नारळाच्या सेवनानं अतिरिक्त चरबी कमी होते. ह्र्दयाचं आरोग्य जपण्यासाठी ओल्या नारळाची चटणी फायदेशीर ठरते. नारळाची चटणी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशकती वाढते. तसेच ओल्या नारळातील गुणधर्मांमुळे थायराॅइड या ग्रंथीचं काम नीट होतं. 

Image: Google

2.  इडली आणि सांबार

सांबार म्हणजे दक्षिण भारतातली भाज्यांची आमटीच. सांबार करताना तुरीची डाळ, वांगं, फ्लाॅवर, डांगर, टमाटा यासारख्या भाज्यांचा वापर केला जातो. म्हणूनच सांबार खाल्ल्याने प्रथिनं आणि फायबर दोन्हीही विपुल प्रमाणात मिळतात. सकाळी नाश्त्याला एक वाटीभर सांबार खाल्ल्यास संपूर्ण आहार घेतल्याचे फायदे मिळतात. सांबारामधे कर्बोदकांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे सांबार खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहाते. तसेच इडलीनं पोट भरतं, भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. इडलीतल्या आंबूसपणाचा फायदा पचनास मदत करणारे विकर वाढवण्यावर होतो. 

Image: Google

3. रस्सम- भात

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता रस्सममध्ये असते. रस्सम म्हणजे दक्षिण भारतीय सूपचा प्रकार. रस्सम पिल्यानं पचन व्यवस्था नीट काम करते. रस्सममधून अ, ब3, झिंक, तांबं, लोह यांचं प्रमाण भरपूर असतं. रस्सम करताना चिंचेचा वापर जास्त केला जातो. चिंचेमधे फायबरचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा पोट स्वच्छ राहाण्यास होतो. 

Image: Google

4. उत्तप्पा आणि अल्लम पचडी

गाजर, सिमला या भाज्या घालून केलेला उत्तप्पा आणि सोबत अल्लम पचडी असल्यास खाण्याचा आनंद तर मिळतोच सोबतच शरीरास पोषक गुणधर्मही मिळतात. पोषणासाठी अल्लम पचडी हा प्रकार फायदेशीर ठरतो. अल्लम पचडी म्हणजे आल्याची चटणी. ही आल्याची चटणी तोंडाची चव वाढवते, मळमळ सारख्या समस्या दूर करते. हाडांचं आरोग्य नीट राखण्यास, श्वसन यंत्रणा सुरक्षित ठेवण्यास, ॲलर्जी, दमा यासारख्या विकारात ही चटणी उपयुक्त ठरते.  

अल्लम पचडीत आल्यासोबत भाजलेल्या डाळी, परतलेला कांदा, ओलं खोबरं, चिंच, गूळ यांचा समावेश असल्यानं चटणीची पोषकता आणि चव वाढते. अल्लम पचडी आणि वाफवलेला भात हे काॅम्बिनेशनही नाश्त्यास पोटभरीचं आणि पोषक ठरतं. 

Image: Google

5. पुट्टु आणि सांबार/ भाज्यांचं स्ट्यू

तांदळाचं पीठ मळून आणि वाफवून केला जाणारा पुट्टू यात कर्बोदकं असतात. पुट्टू खाल्ल्याने शरीराची ऊर्जा वाढते. पुट्टू करताना त्यात थोडं नागलीचं पीठ , मिलेट पीठ घातल्यास त्याचा फायदा वजन कमी करण्यास होतो. पुट्टू सोबत सांबार खाल्ल्याने यातून शरीरास आवश्यक फायबर मिळून पचन सुधारतं. कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सकाळी पुट्टू आणि सांबार खाल्ल्यास मदत होते. 

Image: Google

इडिअप्पम आणिनारळाचं दूध 

इडिअप्पम हा पदार्थ तांदळाचं पीठ मळून नंतर शेवयासारखे उकडून इडिअप्पम हा पदार्थ केला जातो.

इडिअप्पम करताना ओलं खोबरं, तांदळाचं पीठ यांचा वापर प्रामुख्यानं केला जात असल्यानं इडिअप्पम खाल्ल्याने कर्बोदकं आणि चांगले फॅटस , जीवनसत्त्वं खनिजं आणि फायबरही मिळतं. इडिअप्पम सोबत भाज्यांचा स्ट्यू केला जातो. तसेच हा पदार्थ नारळाच्या दुधासोबतही छान लागतो. 

Image: Google

पोंगल

तांदूळ, मुगाची डाळ, मिरे, आलं यांचा समावेश असलेल्या पोंगलमधून प्रथिनं मिळतात. पोंगल आणि सांबार ही डिश नाश्त्यास खाल्ल्याने पचनास मदत करणारे विकर वाढतात. क्लोरोफिल, जीवनसत्त्वं, खनिजं आणि अमिनो ॲसिड असतात. हा पदार्थ खाल्ल्याने कोलेस्टेराॅल नियंत्रणात राहातं. मिऱ्यांमुळे बध्दकोष्ठता होत नाही. पोंगल खाल्ल्याने शरीरास आवश्यक ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. कफ आणि दमा या विकारांवर पोंगल उपयुक्त असून संसर्गाचा धोका टाळण्याची आणि पचनास मदत करण्याची क्षमता पोंगलमध्ये असते.  

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.