वाढते वजन ही जवळपास तिशीनंतर बहुतांश लोकांना सतावणारी गोष्ट. काहीही केले किंवा कितीही कमी जेवले, तरी वजन कसे काय वाढते, हाच खूप लोकांना समजत नाही. बऱ्याचदा काय होते की, वजन कमी करायचे म्हणून आपण कुणीतरी सांगितलेले काहीतरी लक्षात ठेवतो. त्यातल्या निम्म्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि काही गोष्टी विसरून जातो. या अशा अर्धवट माहितीच्या आधारावर मग वेटलॉस संदर्भात वेगवेगळे प्रयोग शरीरावर केले जातात. याचा नेमका उलटा परिणाम होतो आणि आपण वजन वाढू नये, म्हणून जेवढी काळजी घेऊ लागतो, तेवढा त्याचा उलटा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. म्हणूनच वेटलॉससाठी प्रयत्न करत असताना काही चूका करणे टाळले पाहिजे.
वेटलॉस करताना या गोष्टी टाळा
१. कमी प्रमाणात जेवणे
वजन कमी करून फिट ॲण्ड फाईन होण्यासाठी आपण अत्यंत आतूर झालेलो असतो. त्यामुळे लवकरात लवकर वजन कमी कसे होईल, यासाठी आपण काही चुकीच्या गोष्टींच्या मागे लागतो. जेवण कमी केले किंवा उपाशीपोटी राहिलो तर लवकर वजन कमी होईल, हा समज खूप जणींमध्ये असतो. पण उपाशी राहिल्यामुळे बऱ्याचदा कॅलरी बर्न होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढत जाते.
२. सगळे पदार्थ न खाणे
अमूक पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते, असे आपण अनेक जणांकडून ऐकलेले असते. त्यामुळे बऱ्याचदा वेटलॉस करणारे फक्त कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स खाण्यावर भर देतात. यामुळे शरीराला इतर आवश्यक असणारी खनिजे मिळत नाहीत. याचाही परिणाम वजन वाढीवर होते.
३. कमी झोप घेणे
जास्त झोपले की खाणे अंगी लागते आणि तब्येत सुधारते असे आपण ऐकलेले असते. त्या नादात अनेक जण कमी झोपतात. पण शरीराला ७ ते ८ तास झोप मिळणे गरजेचे आहे. झोप कमी झाली, तर त्याचा चयापचय क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही आणि अनावश्यक चरबी वाढू लागते.
४. व्यायाम करा
वेटलॉससाठी डाएट करतो आहोत, असे वाटून व्यायाम करणे टाळत असाल, तर ते चुकीचे आहे. वेटलॉस करत असतानाही व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यामुळे शरीराच्या सर्व प्रक्रिया सुरळीत होतात आणि पचनक्रिया, चयापचय क्रिया सुधारते.