Join us  

वजन कमी करायचं तर रात्री नो कार्ब्ज, बंद भात-पोळी, हे खरं की खोटं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 3:47 PM

वजन कमी करताना लाख सल्ले मिळतात, भात बंद, गहू बंद,  फास्टिंग, प्रोटीन डाएट त्यावेळी कुणाचं ऐकाल, खरंतर ऐकावं विज्ञानाचं

ठळक मुद्देआवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं नाही ना? इतकंच दिवसाअखेर मॅटर करतं.तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज खाताय, तुमचे कार्ब्ज, प्रोटीन आणि फॅटस तुम्ही पूर्ण केले ना?

- स्वप्नाली बनसोडे

तुम्ही नुसतं वजन कमी करायचंय असं म्हणा, कुटुंब, मित्र- मैत्रिणी ते ऑनलाईन सल्ला देणारे अनेकजण धावून येतील. ''वजन कमी करायचंय ना, मग पहिल्यांदा भात सोड, फार वाईट भात!", "अरे मूर्खा बटाटा बंद नाही केलास, तर कसं होईल वजन कमी तुझं?", "मी सांगू का वजन कमी करायचं असेल तर पोळी- भात- भाकरी सगळंच सोडा, कार्ब्ज बंद कर, किटो कर- फक्त प्रोटीन आणि फॅट्स खा, मग बघ कशी पटापट बारीक होतेस ते!" - हे सगळं ऐकून तुम्ही आणखीन भांबावून जाता, की आता मग मी नेमकं खाऊ तरी काय? कुणाचं ऐकू नक्की?कुणाचं ऐकायचं?- मी सांगते फक्त विज्ञानाचं ऐका, शास्त्र काय? सांगतंय ते पाहा. हे सगळं ऐकून टेन्शन येणं स्वाभाविक आहे. मुळात आपला भारतीय आहार हा कर्बोदके प्रधान अर्थात जास्तीत जास्त कार्ब्ज असणारा असतो. जेवण म्हणजे चारीठाव- वरण भात, भाजी पोळी खायची आपली सवय. मुळात वजन कमी करायचं तर तुम्हांला 'डेफिसिट' मध्ये राहावं लागणारच आहे, म्हणजे आवश्यक त्या कॅलरीज पेक्षा कमी कॅलरीज घ्याव्या लागणार आहेत, तरच तुमचं वजन कमी होणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. पण मग करायचं काय? वजन कमी करण्यासाठीचे एकेक मिथ आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य पाहूयात.

रात्री कार्ब्ज खायचे नाहीत? (रात्री भात- पोळी - ब्रेड खाऊ नका.)

रात्री भात किंवा पोळी, ब्रेड असले कार्ब्ज खाऊ नकात, त्याने तुमचे वजन लवकर कमी होणार नाही, असं तुम्ही कित्येकांकडून ऐकलं असेल. आता यात कितपत तथ्य आहे ते सांगू? उत्तर आहे- तुम्ही तुमचा आवडता भात- वरण, खिचडी, किंवा एखादा पराठा हा आहार रात्रीही घेऊ शकता, If your macros allows! एक मुख्य फॅक्ट लक्षात घ्या, की वजन कमी करायचे असेल तर तुम्हांला नेहमी खाताय त्यापेक्षा नक्कीच कमी खावं लागणार आहे, अर्थातच भारतीय कार्ब्जप्रधान पोटभर जेवण करता येणार नाही. शिवाय आहारातल्या कार्ब्ज, प्रोटिन आणि फॅटस या तिन्ही घटकांपैकी कार्ब्ज तसेही आहारात जास्त असतात, आणि त्यातून तुलनेने अधिक कॅलरीज मिळतात, त्यामुळे वजन कमी करताना तुम्हांला कार्ब्ज कमी करावेच लागणार आहेत, हे सत्य आहे. पण म्हणूनच इथं दिवसभराचे आहार नियोजन हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. एक ग्रॅम कार्ब्जपासून सुमारे चार कॅलरीज मिळतात. तुम्हांला तुमच्या डाएटनुसार किती कॅलरीज आणि कार्ब्ज खाता येणार आहेत, ते बघून तुम्ही दिवसभरात किती भात, पोळी किंवा ब्रेड खायचाय हे ठरवायचं आहे. त्याचा हिशोब करून तुम्ही रात्रीसुद्धा आवडती खिचडी, बिर्याणी किंवा पराठा/सॅन्डविच खाऊ शकता. तुम्ही रात्री हे पदार्थ खाल्ले म्हणून त्याच्या कॅलरीज दुपटी- तिपटीने वाढत नाहीत. शेवटी तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज खाताय, तुमचे कार्ब्ज, प्रोटीन आणि फॅटस तुम्ही पूर्ण केले ना? आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं नाही ना? इतकंच दिवसाअखेर मॅटर करतं.असेच प्रश्न भात बंद, फक्त ब्राऊन राईस खा, इंटरमिजिएट फास्टिंग करा या सल्ल्यांसंदर्भातही निर्माण होतात. त्या प्रश्नांचं उत्तर काय..त्याविषयी पुढील भागात नक्की बोलू..

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fithttps://www.facebook.com/fittrwithswapnali

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्य