Join us  

वेटलाॅस करायचाय तर नाश्त्याला बिनधास्त खा पोहे; वजन कमी होण्यासोबतच पोहे खाण्याचे 3 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 1:56 PM

पोहे खाऊन वजन वाढतं हा गैरसमज आहे, आहारतज्ज्ञ सांगतात पोह्यांमधलं वेटलाॅस सीक्रेट

ठळक मुद्देपोहे सकाळी नाश्त्यालाच खायला हवेत असा काही नियम नाही!

सकाळी नाश्त्याला दुसरं काहीच सूचलं नाही तर पोहे केले जातात. पोहे बळजबरीनं नव्हे तर आवडीनं खाल्ले जातात. पण अनेकांना रोज पोहे खाण्याची भीती वाटते. पोहे खाऊन वजन वाढलं तर.. पोह्यांबद्दल अशी भीती बाळगणाऱ्यांसाठी एक गूड न्यूज आहे.  पोह्यांनी वजन वाढत नाही तर उलट वजन कमी करण्यासाठी पोहे खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.  आहार तज्ज्ञांनी पोह्यांमधलं वेटलाॅस सीक्रेट सांगितलं आहे. 

Image: Google

पोहे का खावेत?

पोषण तज्ज्ञ सीमा सिंह यांनी पोह्यांबद्दलचा हा गैरसमज दूर करुन वजन कमी करण्यासाठी पोहे कसे खावेत, किती खावेत याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.  सीमा सिंह सांगतात की, पोह्यांमुळे शरीराला आवश्यक पोषणमुल्यं मिळतात. वजन कमी करायचं असल्यास अथवा वजन नियंत्रित करण्यासाठी सकाळच्या आहारात अवश्य पोहे खायला हवेत. हेल्दी वेटलाॅससाठी नाश्त्याला पोहे हा उत्तम पर्याय आहे. पोह्यातून शरीराला आवश्यक कर्बोदकं मिळतात. तसेच पोह्यातून लोह, फायबर, जीवसत्व आणि ॲण्टिऑक्सिडण्टसही मिळतात. पोह्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं.  त्यामुळे पोहे खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. पोहे खाल्ल्यानं फसवी भूक लागून अरबट चरबट खाणं टाळलं जातं.  पोह्यातील या गुणधर्मामुळे पोहे खाल्ल्यानं वजन कमी होतं/ नियंत्रित ठेवता येतं. 

Image: Google

सीमा सिंह सांगतात की, पोह्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आणि कर्बोदकांचं जास्त असतं. पोह्यात लोह, क आणि अ जीवनसत्व असतं. 100 ग्रॅम पोह्यांमध्ये 67.6 मायक्रोग्रॅम अ जीवनसत्व, 1.9 मिलीग्रॅम क जीवनसत्व, 6.1 मिलीग्रॅम लोह आणि 79.7 मिलीग्रॅम फाॅस्फरस असतं. पोहे ज्या पध्दतीनं तयार केले जातात त्यामुळे ते आरोग्यास फायदेशीर होतात. पोह्यांमधलं पोषणमुल्यं आणखी वाढण्यासाठी पोहे करताना त्यात विविध भाज्या घालायला हव्यात. 

पोहे खाल्ल्यानं शरीराला पोषणमुल्यं मिळण्यासोबतच पचन व्यवस्थाही सुधारते. पोह्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पोह्यांमुळे पोट साफ राहातं. तसेच पोह्यांमध्ये ग्लुटेन नसतं त्यामुळे पोहे खाऊन पचनाच्या आणि वजन वाढीच्या समस्या निर्माण होत नाही.

पोहे किती खावेत?

वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी पोहे खाण्याचं विशिष्ट प्रमाण आहे.  नाश्त्याला डिश भरुन पोहे न खाता पाव डिश पोहे खावेत. पोहे सकाळी नाश्त्याला खाणं ही आदर्श पध्दत असली तरी दिवसातल्या कोणत्याही वेळी प्रमाण सांभाळून  ते खाल्ले तरी चालतात.संध्याकाळी खूप भूक लागते. तेव्हा इतर काही खाण्यापेक्षा पोहे खाल्ले तरी चालतं. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात एखाद्या पदार्थाला पर्याय म्हणून पोहे खाता येतात. पोह्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं त्यामुळे पोहे खाताना त्यात भाज्या अवश्य घालाव्यात.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाअन्न