घरी बसून काम करत असाल तर आधी खाण्याला शिस्त लावा असं आरोग्य आणि आहार तज्ज्ञ म्हणत आहेत. घरी बसून काम ही गोष्ट आपल्या दिनचर्येत व्यत्यय आणते. खाण्या पिण्याच्या केवळा वेळाच नाही तर सवयी देखील बदलते. एरवी ऑफिसमधे बसून काम करताना खाण्या पिण्याला मर्यादा असतात. त्यामूळे घरी नाश्ता , दुपारी डबा आणि रात्री जेवण असं एक खाण्याचं शेड्यूल ठरलेलं असतं. पण घरुन काम कारताना खाण्या पिण्याचे पर्याय सहज उपलब्ध असल्यानं येता जाता खाल्लं जातं. शिवाय ऑफिसच्या कामाचा ताण घालवण्यसाठी घरी चटपटीत पदार्थांची मदत घेतली जाते. या चुकीच्या आहार सवयींमुळे वजनावर मात्र विपरित परिणाम होत आहे. म्हणूनच घरी असला तरी खाण्या पिण्याला शिस्त हवी अशी गरज निर्माण झाली आहे.
घरी बसून काम करताना खाण्याला शिस्त कशी लावणार?
- घरीच बसून काम करणार तर भूक लागली साहजिकच घरात उपलब्ध असलेले पदार्थच खाल्ले जाणार. मग घरात जर जास्त मसालेदार आणि चटपटीत चिवडे असतील तर मधल्या वेळेत खाण्यासाठी लाह्यांचा चिवडा, राजगिरा असे आरोग्यदायी आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ खावेत.
- आपण जेव्हा घरुनच काम करणार असू तर आपल्या हालचालींवर मर्यादा येतात. कमी हालचाली होत असतील तर आपल्या आहारातील कर्बोदकांचं प्रमाण एरवीच्या तुलनेत कमी करावं. चपाती, भात, बटाटा यांचं सेवन नेहेमीच्या तुलनेत कमी करावं. जर भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही अशी तक्रार असेल तर भाताचं प्रमाण कमी आणि डाळीचं प्रमाण जास्त असेल याची काळजे घ्यावी. भाजी जास्त प्रमाणात सेवन करावी. जास्त कर्बोदकं असलेले पदार्थ सेवन केल्यास तयार होणाऱ्या कॅलरीज ( उष्मांक) वापरले गेले नाहीत तर त्याचे फॅटसमधे रुपांतर होते. ते टाळण्यासाठी कमी कर्बोदकं असलेल्या पदार्थांचा समावेश जाणीवपूर्वक करावा.
- घरीच आहोत तर कधीही नाश्ता आणि जेवण केलं तर चालेल, काहीही खाल्लं तरी निभावून जाईल अशी सवयच वजन वाढण्यास प्रोत्साहन देते. म्हणून आधी आपल्या खाण्याच्या सवयींकडे काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. मधल्या वेळेत चटपटीत नाश्ता टाळायलाच हवी. घरी बसून कामाचा ताण आल्यास एकाच वेळी खूप खाण्याची सवय लागते. खाल्लं की ताण जातो असा अनूभव असला तरी हा अनुभव तात्पुरता असतो. त्यामुळे एकाचेवेळी खूप खाण्याचं टाळावं. नाश्ता आणि दोन जेवणाच्या वेळेस पौष्टिक खाण्यावर भर द्यावा. रात्रीचं जेवण हलकं आणि कमी करावं. वेळेवर नाश्ता आणि जेवण करण्याची सवय लावल्यास बरोबर त्याचे वेळेस भुकेची जाणीव होण्याची सवय मेंदूला लागते.
- घरी राहून काम करताना बऱ्याचदा वेळा इकडे तिकडे होतात. कामाला वेळ झाला की स्वयंपाकाला वेळ होतो. कंटाळा येतो. म्हणून रेडी टू कूक सारखे इन्स्टंट पर्याय निवडले जातात. हे पदार्थ पटकन होणारे आणि पोटभरीचे असले तरी पौष्टिक नसतात. त्यातले घटक कॅलरीज आणि पर्यायानं फॅटस वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे हलकं फुलकं का होईना पण ताजं करुन खाल्ल्यास समाधानाची भावना लवकर येते.
- कामाच्या जागीच ताट आणून जेवलं जातं. काम करत करत जेवलं जातं. त्यामुळे कधी कधी किती खाल्लं याकडे लक्ष राहात नाही. त्यामुळे जेवणाच्या वेळेस किंवा खाताना कामातून ब्रेक घ्यावा. आणि आपण काय आणि किती खातो याकडे सजगतेनं बघावं. काम करुन बोअर झालं की तो कंटाळा घालवण्यासाठी म्हणून खाल्लं जातं. अशा वेळेस सजग राहून आपण नक्की बोअर झालो आहोत की आपल्याला भूक लागली आहे हे नीट तपासावं. बोअर झालं असल्यास कामातून थोडा ब्रेक घेऊन पाय मोकळे करावेत, चालत चालत कोणाला फोन करायचे असल्यास ते करावेत. यामुळे कंटाळा जातो आणि भूक नसतानाच खाणं टाळलं जातं . जास्तीचं, भूक नसताना खाणं , चुकीच्या वेळेस चुकीचं खाणं या गोष्टींमुळे वजन वाढतं. ते टाळायचं असल्यास सजग राहून आपल्या भावना ओळखा, गरज ओळखा आणि त्यानुसार कृती करा असा सल्ला अभ्यासक देतात.
- बाहेर जाऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून घरी बसून काम करण्याचा पर्याय आपल्याला व्यवस्थेनं उपलब्ध करुन दिला आहे याचं भान ठेवावं. म्हणूनच घरी बसून काम करताना आपली तब्येत सांभाळणं, स्वत:ला फिट ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.त्यामुळे घरी बसून काम केल्यानं वजन वाढलं अशी तक्रार करावी लागणार नाही याची काळजी घेतल्यास नक्कीच वजन वाढणार नाही याची शाश्वती आहार तज्ज्ञ देखील देतात.