आज इंटरनॅशनल नो डाएट डे आहे. (International No Diet Day). आज जगभरातल्या माणसांनी डाएट न करण्याला पूर्ण मुभा असते. मुळात डाएट करा कराच्या गजरात कुणी डाएट करू नका, डाएट तोडा असं म्हणत असेल तर तेच आजच्या वेलनेस मार्केटसाठी किती धक्कादायक आहे. मात्र हा दिवस एक खास गोष्ट सांगतो. एकेकाळी गोलमटोल असलेल्या एका तरुणीची आणि डाएटच्या नावाखाली, बारीक होण्याच्या नावाखाली मार्केटने अनेकांना न्यूनगंड दिल्याची. म्हणून हा इंटरनॅशनल नो डाएट डे साजरा होतो. तो म्हणतो, बारीक असण्यावर नाही तर हेल्दी असण्यावर भर द्या. सर्वप्रकारच्या बॉडी टाइप्स सुंदरच असतात, ते स्वीकारा. फक्त बारीक असणं म्हणजे फिट आणि सुंदर असणं नव्हे. त्यापेक्षा हेल्दी लाइफस्टाइलचा विचार करा, डाएटिंग करकरुन स्वत:ला कमी लेखत आपल्या न्यूनगंडावर इतरांना पैसे कमावू देऊ नका. आपण आहोत तसे हेल्दी आहोत का हा प्रश्न आहे. तेव्हा डाएटला नाही म्हणा, फिटनेसला हो..
(Image : Google)
खरंतर हा दिवस सुरु झाला ती एका तरुणीची गोष्ट आहे. मेरी इव्हान्स यंग तिचं नाव. ब्रिटिश तरुणी. कायमच जाडजूड. तिला शाळेत जाडी जाडी म्हणून खूप त्रासही दिला मुलांनी. त्याकाळी आणि आजही तरुण मुलींमध्ये जो आजार प्रचलित आहे ॲनाक्सेरिया नर्व्होआ. म्हणजे खाल्लेलं अन्न उलट्या करुन ओकून काढणे. तो आजार मेरी यंगलाही झालाच होता. बारीक होण्यासाठी तिनंही खूप प्रयत्न केले. पण मग तिनं स्वीकारलं की आपण जाड आहोत तर आहोत पण आपला फिटनेस कसा आहे, आपलं आरोग्य उत्तम आहे ना. त्यानंतर काही समविचारी मित्रांना एकत्र करुन तिनं डाएट ब्रेकर्स हा ग्रुप सुरु केला. त्यांनी १९९२ पासून ६ मे हा दिवस नो डाएट डे म्हणून साजरा करणं सुरु केलं. सांगणं सुरु केलं की, डाएट तोडा. सर्व खा. फिट होण्यावर भर द्या. बारीक होण्याच्या मागे लागू नका.
यंग तर तरुण मुलामुलींना एकच प्रश्न कायम विचारते की, तुम्ही जितका वेळ बारीक होण्यावर, जितकी ऊर्जा डाएटवर, स्वत:ला कमी लेखण्यात वाया घालवता तेवढा जर फोकस तुम्ही करिअरवर केला असता तर आज तुम्ही कुठं असता?
डाएट करकरुन कंटाळलेले, अनेक पदार्थ आवडत असूनही न खाणारे, मार्केट आणि जाहिरातींना भुलून स्वत:ला छळणारे अनेकजण असतातच. यंग म्हणते, किती काळ माणसांनी मन मारुन जगायचं. सर्व बॉडी टाइप्स सुंदरच असतात हे आपण मानवी समाज म्हणून कधी स्वीकारणार?
या प्रश्नाचं उत्तर आपणही आपल्याला द्यायला हवं.
आपण फिट असावं पण डाएटच्या नावाखाली वाट्टेल ते खूळ स्वीकारून स्वत:ला छळणं योग्य नव्हे.
तेव्हा आजतरी बिंधास्त खा, डाएट तोडा. ब्रेक द डाएट.
आणि म्हणा मी सुंदरच आहे, मी बारीक नाही तर फिट होणार आहे. आय विल हॅव इट ऑल!