भक्ती सोमण
चहा. तो वेळेला लागतोच. पाण्यात साखर, चहा, आलं घालून उकळल्यावर त्याच्या सुगंधानेच उत्साह संचारतो. तर चहा पिताना तो आणखी द्विगुणीत होतो. असा हा अमृततुल्य चहा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. म्हणून तर
जगात पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायला जातो तो चहाच. सकाळी उठल्या उठल्या पितानाचा चहा, घरचं काम आटोपताना मध्येच हुक्की आली म्हणून प्यावासा वाटणारा चहा, ऑफिसमध्ये गेल्यावर मिळणारा चहा आणि टपरीवरचा चहा. अशा कितीतरी रूपात हा चहा आपल्याला दिवसभर भेटत असतो. महत्वाचे म्हणजे या प्रत्येक चहाचा रंग-ढंग वेगळाच असतो. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर वेगळीच असते. टपरीवरचा चहा पिताना मजा येतेच. पण आता ग्लोबलायझेशनच्या काळात चहा शॉप्स सुरू झाले. चहाला ग्लॅमर प्राप्त झालं. टी कॅफे जागोजागी दिसू लागले. आणि आता तर चहा पिता का या ऐवजी चहा खाता का असाही नवा ट्रेण्ड आला आहे.
चहाच्या पानांचे सलाड, स्मुदी, आईस्क्रीम यासह अनेक पदार्थात हल्ली चहाची पाने वापरली जातात.
टी ट्रेल या चहा शॉप साखळीचे प्रोडक्ट हेड असलेले शेफ अमित तिवारी सांगतात, चहा पिण्यासाठी टपरी किंवा कॉफी शॉप्स सोडून दुसरा पर्याय मिळत नव्हता. चहा शॉप सुरू झाल्यावर त्यांना पर्याय मिळाला. पर्यायाने चहाचे असंख्य प्रकारही प्यायला मिळाले. सतत नाविन्याच्या शोघात असलेल्याना चहा शॉप्सची ही थीम आणि चव अत्यंत आवडली.
ग्रीन टी, उलॉंग टी, ब्लॅक टी असे चहा आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे प्रमाण वाढले असले तरीतो कसा करायचा हेच लोकांना माहित नसते. प्रत्येक चहा उकळण्याचं विशिष्ट तापमान (टेम्परेचर) असतं. तेवढाच तो उकळवला तर तो फक्कड जमतो. ते गणित जमावचं लागतं, असंही अमित सांगतात.
जगभरात हजार प्रकारचे चहा आहेत आणि ते करण्यासाठी विविध हर्बस, स्पाईसेस यांचा वापर केला जातो. ते आता भारतातही सहज मिळायला लागले आहे. आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा मसाला चहाही आता अनेकजण पिऊ लागले आहेत.
मसाला चाय, कुल्हड चाय, हनी लेमन टी, आइस टी, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, स्ट्रोबरी, मिंट, चॉकलेट, बबल टी अशा प्रकारांमध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत.
चहाच्या पानांचा उपयोग आता खाद्यपदार्थातही केला जात आहे. सलाडमध्ये ग्रीन टीच्या पानांचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी तर चहाचा उपयोग करून केलेले सूपही मिळते. तसेच डेझर्ट,आईस्क्रीम स्मूदीज, चहाचा कोल्ड शेक असे विविध प्रकार आता चहाच्या पानांपासूून मिळतात.