अर्चना रायरीकर, श्रेया जाधव
वर्षानुवर्षे तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारे, तजेला देणारे फळ म्हणजे शहाळे. देवाची करणी आणि नारळात पाणी असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत त्याला खुप मान आहे.नारळ, श्रीफळ, माडफळ, कल्पफळ अशी विविध नावे असून नारळ हे एक असे झाड आहे की त्याच्या सर्व भागांचा उपयोग होतो. शहाळे हे बाहेरून टणक आणि आतून गोड व पाणीदार असे असते. त्यामुळे त्यात जीवजंतूचा काही संबंध येत नाही. अगदी शुद्ध आणि निर्जंतुक. तसेच या पाण्यामध्ये कोणीही कसलीही भेसळ करू शकत नाही त्यामुळे आपल्याला अपाय होईल असे काही नाही. शहाळ्याचे पाणी शक्तिवर्धक , खनिजसंपन्न असते. त्यातून रोगप्रतिकारक शक्ती आपणास मिळते. निसर्गोपचार तज्ज्ञ शहाळ्याच्या पाण्याला नैसर्गिक सलाईन म्हणतात. कारण त्यात नैसर्गिक साखर, सोडीयम आणि पॉटेशियम हे दोन्ही असते. याला नैसर्गिक स्पोर्ट ड्रिंक असेही म्हणतात.नारळ जेव्हा ताजा आणि कोवळा असतो तेव्हा त्याला 'शहाळे' असे म्हणतात. तर इतर फळांपेक्षा या फळांमध्ये ९० टक्के पाणी असते. शहाळ्याचे आपणास अनेक फायदे होतात. एकतर आपल्याला हे कुठेही मिळू शकते आणि आपली पाण्याची तहान भागते. आपणास अपाय काहीच होत नाही. शहाळ्याचे पाणी हे कोल्ड्रिंक पेक्षा अतिशय उत्तम!
(Image : Google)
शहाळे पिणे कोणासाठी चांगले ?
१. डिटोक्स ड्रिंक म्हणून ज्यांना डिहायड्रेशन किंवा जुलाब होतात त्यांना याचे पाणी दिल्याने खुप फायदा होतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते त्वचा छान होते.
२. मधुमेहीनी शहाळ्याचे पाणी जरूर घ्यावे. त्यात अनेक क्षार आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो आणि लघवी साफ होते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.३. गरोदर स्त्रियांना- क्षारयुक्त आणि निर्जंतुक आणि लघवीला साफ होण्यासाठी, त्यामुळं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते४. आजारी व्यक्तीना- ज्यांना जास्त जेवण जात नाही त्यांना तरतरी येण्यासाठी किंवा ज्यांना ऑपरेशन नंतर काही खायला परवानगी नसते त्यांनी शहाळ्याचे पाणी प्यावे.५. शरीरात पोटॅशियम कमी झाले तर- डॉक्टर कधी कधी रोज एक शहाळ्याचे पाणी घ्या म्हणून सल्ला देतात.
(Image : Google)
शहाळ्याचे पाणी कुणी पिऊ नये?
१. शहाळ्याचे पाणी कोणाला चालत नाही तर ज्यांना किडनीचा त्रास आहे किंवा मूत्रपिंड निकामी झाले आहे त्यांनी शहाळ्याचं पाणी पिऊ नये. ज्यांचे चे पोटॅशियम वाढलेले आहे त्यांना शहाळ्याचे पाणी चालत नाही२. कधी कधी आपल्या व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये शहाळ्याचं पाणी दिवसभर प्या, भरपूर प्या असे मेसेज येतात आणि ते किती अद्भुत आहेत असे सांगितले जाते परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो ते कितीही चांगले असले तरी. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते सांगतील त्या प्रमाणात शहाळ्याचं पाणी प्या.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)