Join us  

पावसाळ्यात सतत गरम पाणी पिणे तब्येतीसाठी चांगले की अपायकारक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 6:07 PM

सतत गरम पाणी पिण्याचा फायदा होतो की तोटा, आपल्या तब्येतीसाठी काय बरे?

ठळक मुद्देभूक लागली की खावे, तहान लागली की पाणी प्यावे. अतिरेक कुठलाही वाईटच.

-प्रियांका पारखे

सध्या पाऊस खूप आहे. वातावरणात दिवसभर गारवा आहे. अनेकांना सर्दी, घसा खवखवणे, भूक कमी, अंगदुखी असा त्रास होत आहे. अजूनही कोरोनाची भीती मनात आहेच. त्यामुळे जरा नाक वहायला लागलं की वाफ घेणं, सतत गरम पाणी पिणं अनेकजण सुरु करतात. तर पावसाळ्यात गरम पाणीच प्यायचं असाही काहीचं समज असतो. पण खरंच असं सतत गरम पाणी प्यावं का? त्याचा तब्येतीला फायदा होतो की तोटा? कोरोनाकाळात सतत वाफ घेल्यानं भाजल्याच्या घटना तर होत्याच, पण खूप गरम पाणी पिऊन कुणाचे वजन कमी झाले तर खूप गरम काढे पिऊन काहींना मूळव्याध, अपचन, पित्त यांचाही त्रास सुरु झाला. अतिरेक केल्यानं तब्येतीवर चांगल्या गोष्टींचाही वाईट परिणाम होण्याचा धोका असतोच.

(Image : google)

फक्त गरम पाणीच प्यावं का?

१. सतत गरम, कडक पाणी प्यायची काहीच गरज नाही.२. कोमट, घशाला बरं वाटेल असं पाणी सर्दी -खोकला असेल, घसा तडतडत असेल तर थोडं थोडं प्यायला हरकत नाही.३. ज्यांना खूप आणि सतत सर्दी होते त्यांनी स्वत:च्याच मनानं गरम पाणी फार पिऊ नये, डॉक्टरांना विचारुनच प्यावे.४. सकाळी उठल्या उठल्या चहा पितो तसे कडक गरम पाणी पिणे सगळ्यांसाठीच योग्य नाही. आपल्या डॉक्टरला विचारुनच त्यासंदर्भात निर्णय घ्यावा.५. गरम पाण्यानं गुळण्या करणं फायदेशीर. घशाला शेक बसेल इतपत पाण्यात थोडं मीठ आणि हळद घालून गुळण्या करणं योग्य.६. आलं,हळद, ओवा घालूनही काहीजण गरम पाणी पितात मात्र त्याचा अतिरेक ॲसिडीटी, पचनाचे त्रास यांना आमंत्रण देऊ शकतो. ७. रात्री झोपताना गरम पाणी पिण्यापेक्षा हळद-दूध घेणं चांगलं. मात्र दूधही सर्वांना पचत नाही, त्याचाही निर्णय आपली तब्येत आणि तज्ज्ञ यांच्या संमतीने घ्यावा.८. जेवताना गरम अन्न आणि अगदी कोमट पाणी हे उत्तम. ९. सोशल मीडियातली माहिती वाचून स्वत:वर पाण्याबाबतीत प्रयोग करणं टाळा.१०. भूक लागली की खावे, तहान लागली की पाणी प्यावे. अतिरेक कुठलाही वाईटच.

(लेखिका डायटिशियन आहेत.)

टॅग्स :आरोग्यअन्न