Join us  

फणसाच्या आठळ्यांची पारंपरिक भाजी खाणं जुनाट वाटतं? आठळ्यांचे इम्युनिटी बुस्टर फायदे वाचा, मग बोला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 3:18 PM

आठळ्या म्हणजे आपल्या फणसाच्या बिया. या आठळ्यांचे वेगवेगळे पदार्थ करणं, या आठळ्या विविध पध्दतीनं आपल्या आहारात समाविष्ट करणं ही आपली पारंपरिक पध्दत आहे. या आठळ्या शिजवून त्यांची भाजी, आमटी करुन भातासोबत खाता येते. शिवाय या आठळ्या वाफवून किंवा भाजून त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड टाकून चटपटीत स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो.

ठळक मुद्देआपले डोळे, त्वचा आणि केसांचं आरोग्य आठळ्यांच्या मदतीनं जपता येतं चेहेऱ्यावर सुरकुत्या पडू नये म्हणून आठळ्यांचा वापर करता येतो.आठळ्यांच्या सेवनातून लोह मिळतं. त्यामुळे अ‍ॅनेमियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

आपल्या शरीरात जन्मत:च नैसर्गिक रोगप्रतिकारक तत्वं असतात. यालाच जन्मजात रोगप्रतिकारशक्ती असं म्हणतात. ही जन्मजात रोगप्रतिकारशक्ती ही अगदी आघाडीवर राहून सर्व प्रकारच्या विषाणू, जिवाणू आणि इतर घातक घटक जे आपल्या शरीराच्या संपर्कात येतात त्यांच्याशी लढत असते. ही जन्मजात रोगप्रतिकारकशक्ती पुढे आपली जीवनशैली कशी आहे त्यानुसार वाढते किंवा कमी होते. आहारात विविधता , साधी सरळ शिस्तबध्द जीवनशैलीचा अवलंब या महत्त्वाच्या बाबी जन्मजात रोगप्रतिकारशक्तीला दृढ आणि बळकट करत असतात.गेल्या दोन दशकांपासून मात्र आपल्या आहारातील विविधता हळू हळू कमी होत आहे. हंगामी फळं, पारंपरिक शिजवण्याच्या पध्दती या इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांवरील विदेशी पदार्थ आणि बेकिंग प्रक्रिया यामुळे हरवत चालल्या आहे. मागे पडत आहेत. त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकार आपल्यावर होत आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होणं हा त्या अनेक परिणामांमधला एक महत्त्वाचा परिणाम.

असं असलं तरी आपण पुन्हा मागे वळू शकतो. होणाऱ्या चुका सुधारु शकतो. साधं सरळ जगणं आणि आहारातील पदार्थ , घटक याबद्दल विशेष संवेदनशील दृष्टिकोन ठेवल्यास आतापर्यंत आपण केलेल्या चुका नक्कीच सुधारु शकतो. हीच ती वेळ आहे  आपल्या मुळांकडे पुन्हा परतण्याची. अर्थातच हे एका दिवसात घडणार नाही. ही एक प्रक्रिया आहे .

आज या निमित्तानं आठळ्यांबद्दल आवर्जून  सांगावसं वाटतं. आठळ्या म्हणजे आपल्या फणसाच्या बिया. या आठळ्यांचे वेगवेगळे पदार्थ करणं, या आठळ्या विविध पध्दतीनं आपल्या आहारात समाविष्ट करणं ही आपली पारंपरिक पध्दत आहे. या आठळ्या शिजवून त्यांची भाजी, आमटी करुन भातासोबत खाता येते. शिवाय या आठळ्या वाफवून किंवा भाजून त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड टाकून चटपटीत स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. या आठळ्यांचा आहारात समावेश करुन आहारात वैविध्यता आणू शकतो. चवीमधे आलेला तोचतोचपणा घालवू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या जगण्याच्या पध्दतीबद्दल वचनबध्दता पाळायला लागेल. हा प्रवास खूप आव्हानात्मक आहे पण त्याचे फायदेही नक्की दिसतील. योग्य वेळी टाकलेलं पाऊल , घेतलेला पुढाकार आपल्याला आहारातून हरवलेल्या पदार्थ आणि प्रक्रियांकडे नक्कीच घेऊन जाईल.

- ॠजूता दिवेकर

( प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ) 

आठळ्या आरोग्यास फायदेशीर कशा? आठळ्यांमधे थियामिन आणि रिबोफ्लेविन नावाचे घटक असतात जे आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रुपांतर करतात. आपले डोळे, त्वचा आणि केसांचं आरोग्य आठळ्यांच्या मदतीनं जपता येतं. या आठळ्यातून शरीरास झिंक , लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजं मिळतात. आठळ्यांमधे अतिसूक्ष्म जीवाणूंविरूध्द लढणारे घटक असतात. जे अन्नाद्वारे होणाऱ्या आजारापासून वाचवू शकतात. पचनासंबंधित विकारांवर औषध म्हणून पारंपरिक औषधांमधे आठळ्यांचा समावेश केलेला आहे.

- चेहेऱ्यावर सुरकुत्या पडू नये म्हणून आठळ्यांचा वापर करता येतो. त्यासाठी आठळ्या या थोड्या गार दुधासोबत चांगल्या मऊ वाटून घ्यायच्या.ही पेस्ट रोज चेहेऱ्यावर लावल्यास सुरकुत्या पडत नाहीत. त्वचा तरुण दिसण्यास आठळ्या मदत करतात. आठळ्यांच्या वापरानं त्वचेचा पोत सुधारतो. यासाठी आठळ्या थोडं दूध आणि मधात भिजत घालाव्यात. मग त्याची मऊ पेस्ट बनवावी. ती चेहेऱ्यास लावावी. हा लेप सुकला की चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा.

-आठळ्यांमधे प्रथिनं आणि इतर सूक्ष्मपोषण मुल्यं असतात. त्याचा उपयोग मानसिक ताणाचं व्यवस्थापन करण्यास होतो.

- आठळ्यांच्या सेवनातून लोह मिळतं. त्यामुळे अ‍ॅनेमियासारख्या आजारांचा धोका कमी होतो. शिवाय रक्तातील इतर दोष जाण्यासही मदत होते, यासोबतच आठळ्यांच्या सेवनानं आपला मेंदू आणि हदय तंदूरुस्त होतं.

- केस चांगले होण्यास, दृष्टी सुधारण्यास आठळ्यांचा उपयोग होतो. आठळ्यांत अ जीवनसत्त्वं असल्यानं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं सोबतच रातआंधळेपणाही येत नाही. अ जीवनसत्त्वाचा उपयोग हा केस राठ होण्यापासून रोखतो.

- पचनाशी संबंधित विकारांना आठळ्या प्रतिरोध करतं. आठळ्यांची पावडर अपचनात तात्काळ आराम देते. यासाठी उन्हात या आठळ्या वाळवाव्यात. त्याची बारीक पावडर करावी. अपचन झाल्यास घरगुती उपाय म्हणून आठळ्यांची पावडर उत्तम मानली जाते. तसेच आठळ्या शिजवून, भाजून नुसत्या खाल्ल्या तरी बध्दकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात. कारण आठळ्यांमधे तंतूमय घटक विपूल प्रमाणात असतात.- आठळ्यांमधील प्रथिनं हे कोलेस्टेरॉल फ्री असल्या कारणानं आठळ्यांच्या सेवनानं स्नायुंना आकार मिळतो.