सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर आपल्या चाहत्यांना नेहमीच चांगल्या जीवशैलीशी निगडीत टिप्स देत असतात. मागच्या काही दिवसात त्यांनी वजन वाढणं, लठ्ठपणाविषयीच्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. अलिकडेच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून शरीरात जमा होणारं कोलेस्ट्रॉल आणि त्याबाबत लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिवेकरांनी लोकांना समजावलं की, लोकांच्या मनात कॉलेस्ट्रॉलबाबत अनेक गैरसमज आहेत. ज्यामुळे लोकांनी तूप, साय, लोणी यांसारखे पदार्थ खाणं पूर्णपणे बंद केलं.
करीना कपूरच्या डायटिशियन रुजूता दिवेकर यांनी सांगितले की, ''बरेच लोक कोलेस्टेरॉलबद्दल चिंतित असतात. त्यांना भीती वाटते की कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.'' दिवेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोलेस्टेरॉलचे विविध प्रकार सविस्तर सांगितले.
कोलेस्ट्रॉल काय आहे?
बऱ्याच वेळा आपण विचार करतो की कोलेस्टेरॉल फक्त चरबी आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण रक्त चाचणी करतो तेव्हा हा कोलेस्टेरॉल रिपोर्ट लिपिड प्रोफाइलच्या स्वरूपात येतो. अनेकांना असं वाटतं की, आपले वजन जास्त असेल तर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. पण अनेकदा सड पातळ लोकांनाही कोलेस्टेरॉलची समस्या असते. कोलेस्टेरॉल फक्त चरबी नाही, ते एक स्टेरॉल आहे. त्याचे वास्तविक नाव लिपो-प्रोटीन आहे.
कोलेस्टेरॉल फॅट-प्रोटीन या दोन गोष्टींपासून बनलेले असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोलेस्टेरॉलचे तीन प्रकार आहेत - खराब कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल आणि अतिशय वाईट कोलेस्टेरॉल. एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलला हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणतात. असं दिवेकर यांनी स्पष्ट केले. त्यात जास्त प्रथिने आणि कमी चरबी असते जी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. अँटिऑक्सिडंट्सचा एक भाग असल्याने हार्मोन्स बनवण्यापासून ते तुमच्या व्हिटॅमिन डी चे साठवण्यापर्यंत शरीरात अनेक भूमिका निभावल्या जातात. . हृदयाच्या रुग्णांसाठी अँटीऑक्सिडंट्स चांगले असतात.
धोकादायक ठरतं वीएलडीएल कोलेस्ट्रॉल
दिवेकरांच्या मते, लोकांनी खरोखर व्हीएलडीएल (व्हेरी लो डेंसिटी लिपो-प्रोटीन) कोलेस्टेरॉलला गांभिर्यानं घ्यावे. त्यात भरपूर चरबी आणि खूप कमी प्रथिने असतात. यकृतामध्ये चरबी म्हणून साठवल्या जाणाऱ्या ट्रायग्लिसराइड्सबद्दलही त्यांनी सांगितले. त्यांनी कोलेस्टेरॉल संदर्भात लोकांनी वारंवार विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दिली.
१) काजू, शेंगदाणे, काजू, नारळ खाणे टाळावे का?
उत्तर- नाही, 'हे नैसर्गिक पदार्थ आहेत, ते शाकाहारी अन्नपदार्थ आहेत आणि त्यात कॉलेस्ट्रॉल शुन्य प्रमाणात आहे.
२) समोसे, पकोडे आणि भज्या किती हानिकारक आहेत?
उत्तर- 365 दिवसांपैकी जर तुम्ही 300 दिवस चपाती, भाजी, डाळ, भात खाल्ला आणि 60 दिवस तुम्ही लग्न समारंभ आणि सणांच्यावेळी तळलेले पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीराला आणि हृदयाला इजा होणार नाही.
जेव्हा आपण चरबीयुक्त अन्नाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला त्याचे दोन भाग करावे लागतात - नैसर्गिक चरबीयुक्त अन्न आणि पॅकेज केलेले. जर तुम्ही दूध, अंडी, कोळंबी, ऑयस्टर, रेड मीट खात असाल तर त्यात कोलेस्टेरॉल असेल. नैसर्गिक गुड फॅट्स घ्यायला हरकत नाही पण पॅकेज केलेले सर्व अन्न पदार्थ खाणं टाळायला हवं.
कोणतीही शारीरिक क्रिया न करणे, धूम्रपान, मद्यपान, अनुवांशिक घटक, वय, लिंग, आहार व्यवस्थित नसणं या कारणांमुळे कॉलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते. दिवेकर म्हणतात की, ''हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला दर आठवड्याला किमान 3 तास व्यायाम करणे आवश्यक आहे. फिटनेस रूटीनमध्ये योग, चालणे, सायकलिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश असावा. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायची सवय ठेवावी.''