कतरिना कैफ आणि विकी कौशल (Kartina Kaif and Vicky Kaushal's marriage) यांच्या लग्नाची चर्चा गाजते आहे. अमूक मेहंदी, तमूक प्रोटोकॉल, ढमूक कपडे असं बरंच काही. आता या चर्चेत नवा विषय की, कतरिना लग्नाच्या आधी नो कार्ब्ज डाएट करते आहे. आता एवढी फिट, देखणी कतरिना ती का असे डाएट करतेय आणि त्यानं काय फायदा होणार असाही प्रश्न आहे. बरं आता मुद्दा असा की, लग्नापूर्वी फक्त डाएट कतरिनाच करते असंही नाही. आजकाल तर जिचं लग्न ठरेल ती लग्नाच्या दिवशी आपण स्पेशल दिसावं, फोटो उत्तम यावेत म्हणून लगेच डाएट करायला लागते. मोजून मापून खाते. सोशल मीडीयावर काहीबाही डाएट येतात ते करते किंवा मैत्रिणी आणि बहिणींचा सल्ला ऐकते. पण असं सारं काही करावं का?
आता सगळ्या कळते समजते बातम्या असं म्हणतात की कतरिना सध्या जे डाएट करतेय ते पुर्णपणे नो कार्ब्स डाएट आहे. कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश नसणे म्हणजे नो कार्ब्स डाएट प्लॅन. भात-पोळी-भाकरी-बटाटे-ब्रेड हे सगळे कार्बवाले पदार्थ ते ती अजिबात खात नाही. खरंतर कतरिना कैफ आधीपासूनच एकदम स्लिम ट्रिम आहे. मग तिने असा डाएट प्लॅन का करावा? (Who can do low carbs diet plan?)
पण हल्ली प्री वेडिंग डाएट प्लॅनमध्ये वेट लॉस (weight loss) पेक्षा इंचेस लॉस (inches loss) करण्यावर अधिक भर दिला जातो. लग्न, रिसेप्शन यासाठी असणाऱ्या आऊटफिट्समध्ये आपण अधिक छान दिसावं, आपली फिगर (figure) एकदम मेंटेन आणि परफेक्ट वाटावी, यासाठी अनेक नवऱ्या मुलींची लग्नाच्या काही दिवस आधी इंचेस लॉस करण्याची इच्छा असते. अशा मुली आजकाल प्री वेडिंग डाएट प्लॅन करतात आणि त्यात लो कार्ब्स किंवा नो कार्ब्स असं त्यांचं डाएट असतं. लो कार्ब्स म्हणजे कार्बाेहायड्रेट्स असणारे अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाणं आणि नो कार्ब्स म्हणजे आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ पुर्णपणे वर्ज्य करणं.
आता प्रश्न असा की असे लो कार्ब्ज किंवा नो कार्ब्ज डाएट करावं का? केलं तर त्याचे फायदे तोटे काय?
आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर सांगतात, लग्न ठरलेल्या अनेक तरूणी इंचेस लॉस करण्यासाठी सध्या प्री वेडिंग डाएट प्लॅन करतात. कुणाचं तरी ऐकून किंवा गुगलवर सर्च करून डाएटिंग करण्यावर मुलींचा भर असतो. लो कार्ब्स डाएट करताना कुणाचं तरी ऐकून किंवा मनानेच कार्बोहायड्रेट्स न खाणं किंवा कमी खाणं पुर्णपणे चुकीचं आहे. कारण मुळात प्रत्येकाचं आरोग्य, तब्येत आणि त्यानुसार प्रत्येकाची कार्बोहायड्रेट्सची गरज वेगवेगळी आहे. हे डाएट सुरू करण्यापूर्वी हे समजून घ्यायला हवं की आपल्या शरीराला किती कार्ब्जची गरज आहे.. जेवढी गरज आपल्या शरीराला आहे, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला पौष्टिक (healthy food) असं काही मिळालं पाहिजे. लो कार्ब्ज डाएट करताना कमी कार्बोहायड्रेट्स खाल्ले तरी ते भरपूर पोषण देणारे हवेत. कार्बोहायड्रेट्स न खाताही त्यांच्यातून मिळणारं पोषण दुसऱ्या कोणत्या अन्न पदार्थातून मिळेल, असं अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. असं केलं तरच तुमच्या डाएटिंगचा उपयोग होईल, अन्यथा अशक्तपणा येऊ शकतो. आणि अनेकींना लग्नात चुकीचे डाएट केल्यानं अशक्तपणा (weakness), पित्त होणं असे त्रास होतात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही असं एकदम मनानेच डाएटिंग सुरू केलं आणि मनानेच सोडून दिलं तर बाऊन्स बॅक (bounce back) प्रमाणे त्याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम दिसू शकतो. त्यामुळे डाएटिंग करण्यापुर्वी, करताना आणि बंद करतानाही आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.