भात म्हणजे अनेकांचा आवडीचा पदार्थ. मग तो साधा भात-वरण असो किंवा मसालेभात, खिचडी, बिर्याणी. भात खाल्ला की पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि छान वाटतं. थंडीच्या दिवसांत तर पोळी-भाजी गार आणि कोरडी वाटत असल्याने अनेकदा गरम भात खाणं छान वाटतं. आता यातही भात किती प्रमाणात खावा, कोणता तांदूळ खाणं आरोग्यासाठी जास्त चांगलं, भात कोणत्या वेळला खावा असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतात (Know Difference Between Brown Rice and White Rice )
कारण भाताने रक्तातील साखर वाढते, भात लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत असतो असं आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. मग बरेचदा ब्राऊन राईस चांगला म्हणून आपण तो खातो आणि पांढरा भात खाणे बंद करतो. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक काय हे मात्र आपल्याला माहित असतेच असे नाही. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी या दोन्हीतील नेमका फरक आपल्याला समजावून सांगतात. स्टार्च हा भातातील मुख्य घटक असून कोणत्याही प्रकारच्या भातात स्टार्च असतोच.
दोन्ही तांदळात नेमका फरक काय?
१. पांढरा भात लवकर शिजतो आणि पचायला हलका असतो तर ब्राऊन राईसमध्ये फायबर जास्त असल्याने तो शिजायला वेळ लागतो आणि त्यामुळे पचायला थोडा जड असतो.
२. पांढऱ्या भातात ब्राऊन राईसच्या तुलनेत पोषक घटक कमी असतात, म्हणून अनेकदा ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला दिला जातो. ब्राऊन राईसमध्ये मॅग्नेशियम, मँगनीज हे घटक जास्त प्रमाणात असतात.
३. पांढरा भातामध्ये अर्सेनिक हा घटक जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे भात हा जेवणातील मुख्य घटक असेल तर पांढरा भात खायला हवा. पण डायबिटीस, कोलेस्टेरॉल यांसारख्या तक्रारींमुळे तुम्ही कधीतरीच भात खात असाल ब्राऊन राईस खाल्लेला चांगला, यामध्ये अर्सेनिक जास्त प्रमाणात असते.
४. दोन्ही प्रकारचे भात आरोग्यासाठी चांगले असून आपली तब्येत आणि आपल्या शरीराला पोषकतत्वांची असणारी आवश्यकता यानुसार आपण भाताची निवड करायला हवी. त्यामुळे वरचे फरक लक्षात घेऊन आपल्या आहारात भाताचा समावेश केलेला केव्हाही चांगला.