सफरचंद आरोग्यासाठी चांगली म्हणून आपण आवर्जून सफरचंदाचा आहारात समावेश करतो. सफरचंद महाग असली तरी लहान मुलांना, आजारी व्यक्तींना आपण आवर्जून हे फळ खायला देतोच. अनेक जीवनसत्त्वे, खनिजे यांचा उत्तम स्त्रोत असलेले सफरचंद दररोज खाल्ल्यास आपल्याला आजारी पाडत नाहीत असेही आपल्याला वारंवार सांगितले जाते. बाजारात वर्षभर उपलब्ध असणारे हे फळ वेगवेगळ्या प्रकारात पाहायला मिळते. पूर्ण लालबुंद, लालसर हिरवे, लहान आकाराचे आणि पूर्ण हिरवे असे सफरचंदामध्ये बरेच प्रकार असतात. त्याच्या प्रजातीनुसार त्याच्या किमतीमध्येही बदल होतो. आपण बरेचदा बाजारात खरेदी करताना जे चांगले वाटेल ते सफरचंद आणतो. पण खाण्यासाठी लाल सफरचंद चांगले की हिरवे याबाबत मात्र आपल्याला माहित नसते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा कुमारी याबाबत आपल्याला काही खास टिप्स देतात, पाहूयात त्या काय सांगतात (Know Which Apples are More Healthier Green or Red)...
महत्त्वाचा फरक काय?
हिरवी सफरचंद चवीला थोडी तुरट असतात आणि त्यांची साले थोडी जाडसर असतात. तर लाल सफरचंद चवीला गोड, पाणीदार आणि पातळ सालाची असतात. याच गोडपणामुळे आपण साधारणपणे लाल सफरचंद खातो.
आरोग्यासाठी जास्त कोणती चांगली?
हिरव्या सफरचंदात व्हिटॅमिन ए, बी,सी,ई आणि व्हिटॅमिन के असतात. तसेच यामध्ये लाल सफरचंदापेक्षा लोह, पोटॅशियम आणि प्रोटीनही चांगल्या प्रमाणात असते. लाल सफरचंद गोड असल्याने ज्यांना वजन कमी करायचे किंवा आहारात साखर कमी खायची त्यांच्यासाठी हिरवी सफरचंद जास्त चांगली. पण लाल सफरचंदात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असतात आणि ती चवीलाही जास्त गोड असतात. हिरवी सफरचंद पोषणमूल्यांच्या बाबतीत अधिक चांगली असं आपण म्हणत असलो तरी दोन्हीही सफरचंदांमध्ये जवळपास सारखेच गुणधर्म असल्याने त्यात फारसा फरक असतो असे नाही. मात्र लाल सफरचंद गोड असल्याने आपल्याकडे तीच जास्त प्रमाणात खाल्ली जातात.