आपल्या प्रत्येकाची एक विशिष्ट प्रकृती असते. त्या प्रकृतीनुसार आपला आहार-विहार असायला हवा असं डॉक्टर आपल्याला सांगतात. आयुर्वेदामध्ये वात, कफ आणि पित्त अशा ३ प्रकृती सांगितल्या असून काहींमध्ये २ प्रकृतींचे मिश्रणही पाहायला मिळते. आपल्या प्रकृतीला न झेपणारा आहार आपण घेतला तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसते आणि मग आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात (Know Which Is Best Grain According To Your Gut Status).
म्हणूनच प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अलका विजयन आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. धान्य हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असून पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये धान्याची महत्त्वाची भूमिका असते. आपल्या देशाच्या विविध भागात ठराविक धान्य खाल्ले जाते. मात्र तसे न करता आपली प्रकृती लक्षात घेऊन त्यानुसार धान्याची निवड केली तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
१. वात प्रकृती
वात प्रकृतीच्या लोकांना सतत गोड खायची इच्छा होते. या लोकांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो, तसेच पोटात सूज येण्याचीही समस्या या लोकांना उद्भवते. वातामुळे अनेकदा पोटात दुखणे, हाडे ठणकणे, गॅसेसचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. या प्रकृतीच्या लोकांना तांदूळ आणि गहू ही धान्ये प्रामुख्याने आहारात घ्यायला हवीत. ही धान्ये वात प्रकृती असणाऱ्यांना पचायला चांगली असल्याने आहारात त्याचा अवश्य समावेश करु शकतो.
२. पित्त प्रकृती
ही सामान्यपणे दिसणारी प्रकृती आहे. पित्त असलेल्यांना एकदा पित्त खवळले की काहीच सुधरत नाही. पोटात जळजळ होणे, आग होणे, अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या उद्भवतात. पित्त प्रकृतीचे लोक साधारणपणे सतत भुकेले असतात, तसेच त्यांना जुलाब किंवा अतिसारासारखी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या लोकांना पोटात जळजळ होण्याचाही त्रास असतो. त्यामुळे पित्त होऊ नये यासाठी या प्रकृतीच्या लोकांनी गहू, बार्ली आणि ज्वारी या धान्यांचा आहारात प्रामुख्याने समावेश करायला हवा.
३. कफ प्रकृती
कफ प्रकृती असलेल्या लोकांना खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास वेळ लागतो. तसेच या लोकांचे वजन झटपट वाढते. तसेच या लोकांना होणाऱ्या गॅसेसला दुर्गंधी असते. त्यामुळे कफ असणाऱ्या लोकांनी कमी प्रक्रिया केलेली बार्ली, बाजरी आणि नाचणी यांचा आहारात समावेश वाढवायला हवा.
आपल्या प्रकृतीनुसार आपण योग्य ते धान्य खाल्ले तर आपल्याला वजन वाढण्याचा त्रास होत नाही. इतकेच काय यामुळे गोड खाण्याची इच्छाही कमी होते.