Join us  

चहा आवडतो पण चहातल्या कॅफिनच्या दुष्परिणामांचं काय? कॅफिन फ्री चहाचा पर्याय माहिती आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2022 4:30 PM

चहा पिऊनही शरीरावर कॅफिनचा होणारा प्रभाव टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे कॅफिन फ्री चहा... कसा करायचा हा कॅफिन फ्री चहा?

ठळक मुद्देचहातील कॅफिनमुळे झोपेवर, हार्मोन्सवर दुष्परिणाम होतात. रेड बुश टी हा कॅफिन फ्री चहाचा मुख्य घटक.कॅफिन फ्री चहात साखरेऐवजी आपल्या आवडीचं स्वीटनरही घालता येतं. 

चहा आवडणाऱ्यांसाठी चहा ही गरज असते आणि सवयही. चहाने दिवसाची सुरुवात होणं ही अनेकांसाठी सामान्य बाब आहे. मात्र चहाची आवड असणाऱ्यांना चहा केवळ सकाळीच लागतो असं नाही. तर जेव्हा जेव्हा लहर येईल, कंटाळा येईल तेव्हा तेव्हा चहा प्यायला जातो.पण अति चहा पिणं ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. अति चहा पिल्याने शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं. चहा पिल्यानंतर शरीरात ऊर्जा निर्माण होते पण आरोग्यास घातक असलेल्या कॅफिनचं प्रमाणही वाढतं. 

Image: Google

अति चहा पिल्यानं कॅफिनचं प्रमाण वाढून झोप विस्कळीत होते. रात्री अस्वस्थ झोप येते. चहाच्या अति सेवनानं ॲस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं.. रक्तदाब कमी असेल तर चहातील कॅफिनमुळे तो नियंत्रित होतो पण रक्तदाब हा जास्त असल्यास कॅफिनच्या जास्त प्रमाणामुळे तो अनियंत्रित होतो . चहातील कॅफिनमुळे चिंता, भीती, हदयाची धडधड वाढण्ं यासारख्या समस्या निर्माण होतात. तणाव वाढण्याचा धोकाही कॅफिनमुळे निर्माण होतो. कॅफिनचं प्रमाण शरीरात जास्त झाल्यास शरीरातील पोषक तत्त्व शोषून घेण्याची शरीराची  क्षमता नष्ट होते.  म्हणून कॅफिनयुक्त चहा कमी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.  

Image: Google

अनेकांना आपण जेवढ्या प्रमाणात चहा पितो ते आरोग्यास घातक असल्याचं माहीत असतं. त्यांना चहा सोडावासाही वाटतो.  पण चहासारखा ऊर्जा देणारं चविष्ट पेय सापडत नसल्याने चहा सोडला जात नाही. यासाठी तज्ज्ञ चहा पिऊनही शरीरावर होणारा कॅफिनचा प्रभाव टाळण्याचा उपाय सांगतात. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ  नीति सेठ कॅफिन फ्री चहाचा पर्याय सूचवतात. हा कॅफिन फ्री चहा पिऊन चहा प्यायला नाही याची खंत वाटत नाही आणि  चहा पिण्याचं समाधान आणि ऊर्जा मिळवूनही शरीरात कॅफिन वाढत नाही. कॅफिन फ्री चहाचं हेच वैशिष्ट्य असल्याचं नीति सेठ सांगतात. 

Image: Google

कसा करायचा हा कॅफिन फ्री चहा ?

कॅफिन फ्री चहा करण्यासाठी पाऊण कप पाणी, 1 मोठा चमचा ताजं किसलेलं आलं, 3 रेड बुश टी बॅग्ज, 1 कप दूध आणि वेलची पूड घालावी.  या चहात साखरेऐवजी आपल्या आवडीचं दुसरं स्वीटनरही घालता येतं. 

कॅफिन फ्री चहा करताना एका भांड्यात पाणी, आलं, गवती चहा एकत्र करुन पाणी उकळण्यास ठेवाव. 2-3 मिनिटं पाणी उकळावं. पाणी उकळलं की त्यात रेड बुश टी बॅग्ज घालाव्यात आणि पाणी पुन्हा 1-2 मिनिटं उकळू द्यावं. नंतर त्यात दूध आणि वेलची पूड घालून पुन्हा 1-2 मिनिटं मिश्रण उकळून त्याचा काढा तयार करावा. गॅस बंद केल्यानंतर त्यात साखर/ आपल्या आवडीचं इतर कोणत्ंही स्वीटनर घालता येतं.  हा चहा गाळून घेऊन पिल्यास चहा पिण्याचं समाधान वाटतं, ऊर्जा मिळते आणि कॅफिनचे शरीरावरचे दुष्परिणमही टाळले जातात. 

कॅफिन फ्री चहाचा रेड बुश टी हा मुख्य घटक आहे. या घटकामुळे या चहाला कॅफिन फ्री चहा म्हटलं जातं आणि चहा पिण्याचं समाधानही मिळतं. गेल्या कित्येक शतकांपासून दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय, चवदार पेय म्हणून रेड बुश टी ओळखला जातो. रेड बुश टी हा ब्लॅक/ ग्रीन टीला पर्याय म्हणून ओळखला जातो.

Image: Google

ग्रीन टी/ ब्लॅक टी हे आरोग्यदायी चहा म्हणून ओळखले जातात. मात्र ते अति प्रमाणात पिल्यास शरीराला कॅफिनचा धोका असतोच. तो टाळण्यासाठी रेड बुश टी हा कॅफिन फ्री चहा पिण्याचा सल्ला नीति सेठ देतात.  रेड बुश टी रंगाला लाल असतो. त्यात दूध घालून किंवा तो दुधाशिवय प्यायला तरी चालतो. 

टॅग्स :अन्नआहार योजना