Join us  

पाऊस लांबला, रोगट वातावरणात ५ गोष्टी अजिबात खाऊ नका, पोट बिघडेल-आजारी पडाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 3:14 PM

लांबलेला पाऊस, रोगट हवा याकाळात आहार सांभाळायला हवा नाहीतर तब्येत बिघडणारच.

ठळक मुद्देऋतू स्थिरावत नाही तोपर्यंत आहाराकडे विशेष लक्ष द्या.

परतीचा म्हणत म्हणत पाऊस लांबला आहेच. कधी जोरदार पाऊस पडतोय तर कधी कडक ऊन. ऑक्टोबर हीट. हवा सारखी बदलते आहे. अशा वातावरणात भूक मंदावते. रोजचं जेवण नको वाटतं पण काही चटकमटक खावंसं वाटतं. मात्र ऋतूबदलाच्या या काळात तब्येतीची अधिक काळजी घ्यायला हवी. पचनावर परिणाम झालेला असतोच त्यामुळे चांगली थंडी पडून ऋतू स्थिरावत नाही तोपर्यंत आहाराकडे विशेष लक्ष द्या. जिभेचे चोचले पुरवायला जाल तर पोटावर ताण येईल आणि तब्येत बिघडेल. असं आहारतज्ज्ञ कविता निस्ताने सांगतात.

या हवेत काय खाऊ नये?

(Image : google)

भजी

पावसाळी हवेत भजी खावीशी वाटतात. पण ही हवा भजी खाण्यायोग्य नाही. घरी तळलेलीही भजी या हवेत खाऊ नयेत. रस्त्यावर, हॉटेलात मिळणारी तर नाहीच नाही, पोट बिघडण्याचा धोका आहे.  तेच वड्यांच्या संदर्भातही बटाटेवडे, वडापाव टाळणंच योग्य.

(Image : google)

भेळ/ पाणीपुरी 

सायंकाळी भूक लागते. तेव्हा भाजीपोळी खावीशी वाटत नाही. मात्र चाट पदार्थ खावेसे वाटतात. भेळ, पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटिस, हे सगळे पदार्थ म्हंटलं की तोंडाला पाणी सुटतंच. मात्र या हवेत बाहेरचे चाटचे पदार्थ खाणे धोक्याचे. पाण्यातून होणाऱ्या इन्फेक्शनचा धोका वाढतो. पोट बिघडतं. त्यात पित्ताचा त्रासही अशाच हवेत अनेकांना जास्त होतो. त्यामुळे चाट थंडीत खाण्यासाठी रा‌खून ठेवावे.

(Image : google)

चायनीज पदार्थ

चायनिज कुणाला आवडत नाही. मात्र त्यातले कृत्रिम रंग, अजिनोमोटो, मीठ, तेल खूप, यासाऱ्यामुळे पचनाचा त्रास वाढतो. अस्वस्छ ठिकाणी खाणं तर जास्त धोक्याचं. त्यातून मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी, जळजळ असे आजार होऊ शकतात.

(Image : google)

पालेभाज्या

पालेभाज्या शरीरासाठी उत्तमच. मात्र पावसाळ्यात पालेभाज्या सडतात. अनेकदा खूप पावसामुळे शिळ्या भाज्या बाजारात येतात. याकाळात भाज्या महागही होतात. आणि अनेकांना पालेभाज्या खाऊन पचनाचा त्रास होतो. त्यामुळे पावसाळी कुंद हवेत पालेभाज्या खाणं टाळा. वेलवर्गीय भाज्या खाणं जास्त चांगलं.

(Image : google)

कोल्डड्रिंक

पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होत असल्याने किमान पावसाळ्यात तरी बाजारात मिळणारी शितपेयं पिणं टाळावं. त्यानं शरीराला अपाय होतोच, वजन वाढही होते. 

टॅग्स :अन्नआरोग्य