Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दुपारी तीनच्या आत जेवा, 3 गोष्टी करा; वेळ नाही म्हणून उशिरा जेवाल तर वजनवाढीचा धोका

दुपारी तीनच्या आत जेवा, 3 गोष्टी करा; वेळ नाही म्हणून उशिरा जेवाल तर वजनवाढीचा धोका

दुपारच्या जेवणाच्या वेळेकडे आणि त्यात आवश्यक असणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केलं तर वजन कमी होत नाही असं तज्ज्ञ म्हणतात. दुपारी 3च्या आत जेवण आणि जेवणात 3 पदार्थ असल्यास वजन कमी होतं, नियंत्रित राहतं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 05:12 PM2022-02-11T17:12:00+5:302022-02-11T17:21:48+5:30

दुपारच्या जेवणाच्या वेळेकडे आणि त्यात आवश्यक असणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केलं तर वजन कमी होत नाही असं तज्ज्ञ म्हणतात. दुपारी 3च्या आत जेवण आणि जेवणात 3 पदार्थ असल्यास वजन कमी होतं, नियंत्रित राहतं. 

Lunch after 3 pm without 3 things create a risk of weight gain. | दुपारी तीनच्या आत जेवा, 3 गोष्टी करा; वेळ नाही म्हणून उशिरा जेवाल तर वजनवाढीचा धोका

दुपारी तीनच्या आत जेवा, 3 गोष्टी करा; वेळ नाही म्हणून उशिरा जेवाल तर वजनवाढीचा धोका

Highlights'अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन' यात प्रसिध्द झालेला अभ्यास सांगतो की दुपारी 3 नंतर जेवल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो.दुपारी 3नंतर जेवणं करणं म्हणजे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी. यामुळे इन्शुलिनप्रती शरीर कमी संवेदनशील होतं.दुपारचं जेवण टाळून काहीबाही खाणं किंवा दुपारच्या जेवणात खूप खाणं या दोन्ही गोष्टी तज्ज्ञांच्या मते चुकीच्याच.

एकीकडे वजन कमी होण्यासाठी काय काय करता येईल याचा शोध घेत रहायचा आणि दुसरीकडे जे हातात आहे, जे करणं शक्य आणि आवश्यक आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष करायचं, यामुळे वजन कसं कमी होईल. वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यासोबतच दुपारच्या जेवणाकडे लक्ष देणं, दुपारचं जेवण वेळेत करणं आणि दुपारच्या जेवणात आवर्जून 3 गोष्टी खाणं आवश्यक आहेत असं तज्ज्ञ म्हणतात.  तज्ज्ञ म्हणतात शरीरात जैविक घड्याळ असतं. या घड्याळीप्रमाणे झोपणं उठणं हे जसं महत्त्वाचं तसंच या जैविक घड्याळानुसार नाश्ता, दुपारचं जेवण , रात्रीचं जेवण करणं महत्त्वाचं असतं. कामाची गडबड, घाईगर्दी यामुळे वजन कमी करण्याचं उद्दिष्ट असतांनाही नाश्त्याप्रमाणे दुपारच्या जेवणाकडे, दुपारच्या जेवणाच्या वेळेकडे आणि त्यात आवश्यक असणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळच नाही म्हणून दुपारच्या जेवणाला काही बाही डब्यात घेतलं जातं, डब्बा नेला तरी तो वेळेवर खाल्ला जात नाही, वेळ गेली टळून म्हणून व्यवस्थित न जेवता चटपटीत खाऊन  वेळ भागवली जाते. अशा स्थितीत वजन कमी होत नाही. उलट ते वाढतं आणि सोबत आरोग्याशी निगडित समस्याही निर्माण होतात. 

Image: Google

'अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन' यात प्रसिध्द झालेला अभ्यास सांगतो की दुपारी 3 नंतर जेवल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. या प्रक्रियेची गती मंदावते. अभ्यास सांगतो की मानवाच्या शरीरातील पेशींमधे पेरिलिपिन प्रोटिन असतं ( स्निग्ध प्रथिनं) ते शरीरातील चरबी जाळण्याच्या काम करतं. पण दुपारी 3 वाजल्यानंतर चरबी जाळण्याची ही प्रक्रिया मंद होते. तसेच अभ्यास सांगतो, की शरीरातील जैविक घड्याळानुसार शरीराच्या आत विविध स्त्राव, ग्रंथी स्त्रवत असतात. या जैविक घड्याळीनुसार शरीरात इन्शुलिन स्त्रवत असतं. दुपारी 3नंतर जेवणं करणं म्हणजे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी. यामुळे इन्शुलिनप्रती शरीर कमी संवेदनशील होतं. इन्शुलिन नीट स्त्रवलं नाही तर वजन कमी होण्यात अडचणी निर्माण होतात.

Image: Google

दुपारचं जेवण अवेळी करणं, उशिरा करणं या सवयी वजन कमी करण्यास प्रतिकूल ठरतात त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणात जास्त खाणं ही सवयही वजन कमी करण्याच्या दृष्टीने अयोग्य समजली जाते.  एकाच वेळेस जास्त कॅलरीयुक्त खाण्यानं वजन कमी होत नाही. यासाठी तज्ज्ञ म्हणतात  की रोजच्या शरीराच्या कॅलरीच्या गरजेच्या 50 टक्के कॅलरी दुपारच्या जेवणात, 15 टक्के कॅलरी सकाळचा नाश्ता, 15 टक्के कॅलरी संध्याकाळचा स्नॅक्स आणि उरलेले 20 टक्के कॅलरी रात्रीच्या जेवणात असल्या तरच वजन कमी होतं आणि नियंत्रित राहातं.

काय असावं दुपारच्या जेवणात?

वजन कमी करण्यासाठी दुपारचं जेवण वेळेत जेवणं, आहाराचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आणि दुपारच्या जेवणात 3 गोष्टी असणं आवश्यक आहेत. 

Image: Google

1.  भाज्या- पालेभाज्या

दुपारच्या जेवणात भाज्यांचं प्रमाण जास्त असावं. भाज्यांमुळे शरीरात पोषणाचं संतुलन राहातं. दुपारच्या जेवणात पालेभाज्या खाव्यात. त्यातून लोह, कॅल्शियम, अ जीवनसत्त्व मिळतं. या घटकांनी वजन कमी करण्यासोबतच इतर आरोग्यविषय समस्या दूर होतात. शिजवलेल्या भाज्यांसोबतच  कच्च्या भाज्यांचं सॅलेड खाणं महत्त्वाचं असतं. यामुळे पोट भरत, भरलेलं राहातं. शरीराला जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात.  भाज्यांमधून शरीराच्या पोषणास आणि वजन कमी करण्यास आवश्यक असलेले फायबर मिळतात. 

Image: Google

2. डाळ-आमटी-उसळी

दुपारच्या जेवणात पोळी भाजी इतकंच डाळ-उसळी असणं महत्त्वाच. डाळीच्या वरणातून/ आमटीतून, उसळीतून शरीरास आवश्यक प्रथिनं , लोह आणि झिंक मिळतात. डाळीतील पाण्यामुळे शरीरात आर्द्रता आणि ओलावा टिकून राहाते. पोषणासाठी रोज दुपारच्या जेवणात वेगवेगळ्या डाळींचा- कडधान्यांचा समावेश करावा. 

Image:  Google

3. दही-रायतं-कोशिंबीर

दही खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणात घरी विरजलेलं दही असावं. दह्यातून पचनास मदत करणारे विकर असतात. आतड्यातील मित्र जिवाणुंची वाढ यातून होते. पचनास मदत करणाऱ्या दह्यातील गुणधर्मांमुळे शरीराकडून अन्नातील पोषक घटक शोषली जातात. पचन सुधारल्यानं वजन कमी होतं, नियंत्रित राहातं.  दही, दह्याची कोशिंबीर, रायतं खाणं याद्वारे दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करता येतो. 
  

Web Title: Lunch after 3 pm without 3 things create a risk of weight gain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.