करीना कपूरचा फिटनेस हा जेवढा चर्चेचा विषय तितकीच तिच्या खाण्यापिण्याच्या आवडींचीही जोरदार चर्चा होते. शुटिंगमध्ये असताना देखील ती आपल्या सहकाऱ्यांसमवेत खाण्याचा आनंद घेते. करीना कपूरनं नुकताच इन्स्टाग्रामवरील स्टोरीतून सहकाऱ्यांसमवेत बिर्याणीचा घेतलेला आनंद शेअर केला. तर दुसऱ्याच दिवशी तिनं आपल्या सहकाऱ्यांसाठी घरुन मुगाच्या डाळीचा हलवा देखील आणला. याविषयीचा अनुभव सांगतांना तिनं मात्र फोटो राजमा सॅलेडचा टाकला. आपण केवळ बिर्याणी आणि मुगाच्या डाळीचा हलवाच खातो असं नाही हे सांगण्यासाठी तिनं राजमा सॅलेडचा फोटो टाकून फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीला आपण किती महत्व देतो हे दाखवून दिलं आहे. राजमा सॅलेडच्या फोटोला करीनानं 'इट वेल बी वेल' हे कॅप्शन दिलं आहे.
Image: Google
करीना खाण्याची आवड जपतानाच संतुलित आहाराला महत्व देते. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पोष्टिक आणि चटपटीत पदार्थ म्हणून ती राजमा सॅलेड खाण्याचा सल्ला देते. हे करीना स्पेशल राजमा सॅलेड आहे एकदम भारी आणि करायला सोपे. शिवाय कोणत्याही हवामानात खाल्ल्यास ते शरीराला पोषकच ठरतं. तोंडाला चव आणणाऱ्या या सॅलेडमध्ये उकडलेला राजमा, घेवडा, सिमला मिरची या पौष्टिक भाज्यांचा समावेश केलेला असतो. राजमा सॅलेडमधून शरीरास प्रथिनं, फायबर आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. राजमा सॅलेड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. या सॅलेडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. म्हणजे राजमा सॅलेड खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. या सॅलेडमध्ये प्रथिनं जास्त असल्यानं हे सॅलेड खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. शरीराल ऊर्जा मिळते. यातील फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं ते पचायला सहज जातं. शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. राजमा सॅलेडमधून शरीरास लोह भरपूर प्रमाणात मिळत असल्यानं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
Image: Google
राजमा सॅलेड कसं करणार?
राजमा सॅलेड करण्यासाठी अर्धा कप जाडसर चिरलेले चेरी टमाटे, जाडसर चिरलेली काकडी, जाडसर चिरलेला कांदा, सिमला मिरची ( थोडी उकडून घेतली तरी चालते.), अर्धा कप जाडसर चिरलेला घेवडा ( थोड शिजवून घेतलेला) पाऊण कप शिजवलेला राजमा, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कांद्याची पात, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, गरजेनुसार चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर मिरेपूड, 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि चिमूटभर सैंधव मीठ घ्यावं.
Image: Google
राजमा सॅलेड करण्यासाठी आधी राजमा भिजवून आणि उकडून घ्यावा. उकडलेला राजमा निथळून घ्यावा. एका मोठ्या भांड्यात उकडलेला राजमा घेऊन त्यात चिरलेला टमाटा, काकडी, सिमला मिरची, घेवडा, कांद्याची पात आणि कांदा घालावा. सर्व नीट मिसळून घ्यावं. यात कोथिंबीर घालून पुन्हा मिसळावं. चाट मसाला मिरे पूड आणि सैंधव मीठ घालून ते नीट मिसळून घ्यावं. सर्वात शेवटी या सॅलेड ड्रेसिंग करावं. त्यासाठी एका वाटीत 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल त्यात लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घालून ते मिसळून मग ते सॅलेडवर टाकून सॅलेड चांगलं हलवून घ्यावं,. हे चविष्ट, कुरकुरीत सॅलेड खाऊन आनंद मिळतो, ऊर्जा मिळते आणि पोषणही होतं.
राजमा सॅलेड केल्याबरोबर लगेच खावं. ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाऊ नये. कारण या सॅलेडमध्ये चिरलेला कांदा घातलेला असल्यानं त्याची चव नंतर चांगली लागत नाही. हवं तर राजमा उकडून आणि नीट निथळून हवाबंद डब्यात 2-3 दिवस फ्रिजमध्ये ठेवता येतो. जेव्हा राजमा सॅलेड करायचं तेव्हा त्यात भाज्या मिसळून घालता येतात. रात्रीच्या जेवणाचा हलका फुलका तरीही पोटभरीचा मेन्यू म्हणून राजमा सॅलेड खाता येतं. जेवणाआधी गरमागरम सूपसोबत हे सॅलेड खाता येतं. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी राजमा सॅलेड उत्तम ठरतं.